Monday, August 31, 2026

पुष्पाचे प्राक्तन : अनुप्रास अलंकारातील दीर्घांक


 

निर्मिती : उद्गार पुणे, मज्जासंस्था , नाट्यसंपदा  प्रकाशित, पुष्पाचे प्राक्तन. 

इतिहास घडवायचा तर त्यासाठी एक वेडेपणा लागतोच. वेडी माणसं इतिहास घडवतात असे म्हटलेच आहे. मिलिंद शिंत्रे लिखित आणि दिग्दर्शित, 'पुष्पाचे प्राक्तन' हा अभिनव प्रयोग पाहताना याचा अनुभव आला. प्रत्येक शब्द ' प '  या अक्षराने सुरू होणारे, पुष्पाचे प्राक्तन ,  अनुप्रास अलंकाराचा अनोखा प्रयोग, रंगमंचावर आणताना, त्याचा हेतूच इतिहास घडवणे, जागतिक विक्रम करणे हा असेल तर, तो हेतू निर्विवादपणे सिद्ध झालेला आहे. साधारण दीड तास सुरू असलेल्या या सलग प्रयोगामध्ये अनेक गोष्टी, दाद द्याव्यात अशाच आहेत.


पैकी संशोधन, त्या मागची मेहनत, याचे श्रेय मिलिंद शिंत्रे यांचे. त्यानंतर त्याच्या नाट्यरूपाचे स्वप्न पाहणे, हा वेडेपणाही त्यांचाच आणि त्यानंतर जीवतोड मेहनत घेऊन प्रयोग सिद्ध करण्यामागची मेहनतही त्यांचीच आणि ध्यासही त्यांचाच. वेगळे काही करण्यामध्ये, 'धाडस' लागत असेल, तर ते धाडसही त्यांच्यात आणि निर्माता चमू मध्ये नक्कीच आहे. हे सारे कौतुकास पात्र.


प्रयोग सादर करणारा कलाकार संघ, हे आणखी एक कौतुक करण्याजोगे कारण. सादर करण्यास अतिशय कठीण असलेला हा प्रयोग, संपूर्ण चमू उत्साहाने सादर करतो आणि दीड तास तो उत्साह कायम ठेवतो. संपूर्ण नाटक कोरसमध्ये सादर होते, हा कोरस एकमेकात मिसळण्यासाठी, गीतामध्ये लय आणि ठेका असतो. इथे ज्याला पार्श्वसंगीत म्हणावे, ते देखील, मौखिक आहे. म्हणजेच, एकच वेळी संवाद आणि पार्श्वसंगीत येऊ शकत नाही. कारण संगीतावर संवाद सुपर इम्पोज न होता, ते नॉईस क्रिएट करतील. त्यामुळे संपूर्ण नाटकाचे संवाद कोरस मध्ये, लयबद्ध सादर करताना, सामुदायिक लय  सिंक  होण्यासाठी संगीताची साथ नाही. म्हणूनच गद्य कोरस सूर -लयीत  म्हणणे अतिशय कठीण. त्यासाठी किती वेळ, एकाग्रता आणि तालमी लागल्या असतील याची कल्पना येते.


अनुप्रास संवादी शब्द, हे प्रेक्षक परिचित नसल्याने, ते अर्थासहित स्क्रीनवर प्रोजेक्ट केले आहेत, त्यामुळे प्रेक्षकांची प्रोसेस, वाक्य श्रवण करणे, त्यातील कठीण शब्दाचा अर्थ स्क्रीनवर पाहणे, आणि समजून घेणे, अशी होते. अर्थात हे एक प्रकारचे परफॉर्मन्स डिस्ट्रॅक्शन होते. ही या निवडलेल्या फॉर्ममधील कमकुवत बाजू.


सादरीकरणाचा फॉर्म शोधणे, सुचणे आणि त्यानंतर तो रचणे या सर्वात एक अभिनवता नक्कीच आहे. त्यामुळे अशा प्रयोगाचे स्वागत करायला हवे.

- आभास आनंद


No comments:

Post a Comment