Monday, August 31, 2026

खो - द आफ्टरमॅथ... एकल दीर्घांक

 



खो - द आफ्टरमॅथ... एकल दीर्घांक निर्मिती : माध्यम मुंबई

रंगमंचावर दोन फुटाच्यावर काहीही नाही. नेपथ्याची उंची फक्त दोन फूट, त्यातील एक तृतीयांश भाग, फ्लोरवर आहे. व्हर्टिकल थिएटर कसे वापरले जाऊ शकते, याचा वस्तुपाठ आपल्या नाटक, एकांकिकेतून देणारा दिग्दर्शक, फ्लॅट नेपथ्य मांडून घेतोय. त्याला नेपथ्यातून नाटकाविषयी काही सुचवायचंय. ही रचनाच, नाटक समीप रंगमंचासाठी डिझाइन केले आहे, हे सांगतेय. दोन फूट उभे नेपथ्य, मध्यभागी वर्तमान. दोन बाजू, पिलर्स किंवा पोल्स. हे दोन ध्रुव, दोन पुरूष आपल्याकडे पाहतायत. फ्लोरवर, एक व्हाइट स्ट्रिप, त्यावर वेडीवाकडी उमटलेली पावले. दोन ध्रुवांमध्ये झालेला वावर दाखवतोय. बस, इतकंच.


आयुष्यात घडलेल्या एखाद्या भीषण, दारूण घटनेचा उत्तरप्रवास हाच असतो की. मात्र वर्तमानाची चटकदार बातमी वाचण्यापुरता, आपला अश्या घटनांशी संबंध येतो. आफ्टरमॅथ आपल्याला कधीच दिसत नाही, जोवर आपला त्याच्याशी थेट संबंध येत नाही. आणि ज्यांचा त्याच्याशी काही अंतरावरून संबंध येतो. ते ध्रुव बनतात. दोन खांब. इथे दोन्हीचे जेंडर पुरुष. मेल शोविनिजम. समाजाच्या  दृष्टिकोनाचा अविभाज्य भाग. मग त्या समाजातील स्त्री चा विचारही पुरूषी दृष्टिकोनातूनच घडतो. (८० च्या दशकात जो स्त्री वाद मराठी साहित्य - रंगभूमीवर आला, तो हेच सुचवत होता.)


'
खो ' हा माध्यम, मुंबई निर्मित‍, प्रवीण धोपट लिखित आणि डॉक्टर अनिल बांदिवडेकर दिग्दर्शित दीर्घांक, प्रथमदर्शनी हे इंप्रेशन देतो. एक कथा, लिनियर , ऑरगॅनिकली, कोणतीही भूमिका न घेता, मांडतो. आपण दीड तास ती एकाग्रपणे पाहू शकतो. शेवटाकडे एक अस्वस्थता, बधिरता किंवा सुन्नपणा अनुभवतो. प्रयोग यशस्वी झाला, याची ती पावती असते.

नाटकाच्या कोलॅबरेटिव व्हॅल्यूज बद्दल नेहमी बोलले जाते. ते इथे राबवलेले दिसते. आणि जेव्हा नाटक असे सादर होते, तेव्हा एक उत्तम अनुभव ते देते, देणारच.


प्रवीण धोपट यांची कथा संहिता, मुळात उत्तम क्राफ्ट झालेली आहे. त्यामुळे तीवर अनावश्यक संस्कार करत राहण्यापेक्षा , त्यात पूरक मूल्यवर्धन केले की, नाटक उत्तम होईल, हे दिग्दर्शक म्हणून, डॉ. अनिल बांदिवडेकर जाणतात. त्यामुळे आशय - विषयाला धक्का न लावता, त्यांनी नाटक सादर केले आहे. याने दोन गोष्टी झाल्या. एक - संहितेची बलस्थाने सादरीकरणात हलली नाहीत, दोन - दिग्दर्शकाचे पूर्ण लक्ष मांडणीतील मूल्यवर्धनाकडे राहिले. यामुळे सूचक रचनेवर लक्ष राहून, मिनिमलिस्टिक मांडणी शक्य झाली.


नाटक तांत्रिक अंगाने, खुलते जेव्हा, नेमके पूरक नेपथ्य, पार्श्वसंगीत आणि प्रकाशयोजना, संहितेला उठाव देते. सर्व ॲप्रोच मिनिमलिस्टिक. देवेंद्र प्रभुदेसाई यांचे नेपथ्य, शरद वेटे यांचे आलापी पार्श्वसंगीत, (स्वर - श्रद्धा वेटे - मोकाशी), उन्मेष वीरकर यांची प्रकाशयोजना नाटकाला बॅलन्स आणि उठाव देते. या नाटकाच्या उभे राहण्यामागे, थॉट प्रोसेसमध्ये, सह - दिग्दर्शक, विलास पागार यांचे योगदानही महत्वाचे.

कलाकार, हा कोणत्याही कलाकृतीतील अंतिम शब्द. या सर्व सायासानंतर, नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारा थेट संपर्क बिंदू. तो योग्यच हवा. इतका की, त्या शिवाय नाटक होणे अशक्य वाटावे. जान्हवी दरेकर ही तरूण, गुणी अभिनेत्री हे काम इतक्या सहजपणे करते की, त्या मागे तिने घेतलेली प्रचंड मेहनत, जाणवू देखील नये. कलाकार, त्याचा कस लागेल अशा भूमिकेसाठी कायम तहानलेला असतो. पण असे काम त्याच्याकडे, दुर्मिळपणे येते. ही भूमिका तशीच आहे आणि जान्हवी, तिला न्याय देण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. तिला शुभेच्छा.


देर आए  दुरुस्त आए, अशी हिंदीमध्ये कहावत आहे. माध्यम मुंबईचे, एका विरामानंतर आलेले हे एकल नाट्य, आपल्याला असेच म्हणायला लावते. या नाटकापाठी उभ्या असलेल्या सर्व माध्यम चमूचे अभिनंदन आणि ' खो ' च्या यशस्वी प्रयोगांसाठी शुभेच्छा!

- आभास आनंद




No comments:

Post a Comment