‘निर्वासित’ ही एकांकिका पहायला जाण्यापूर्वी काही
शंका मनात होत्या. त्या पैकी पहिली- या अभिजितला झालंय तरी काय? आधी ‘दर्दपोरा’ मग ‘दोजख’ आणि आता ‘निर्वासित’? हा बॉर्डरवरच का रेंगाळतोय? अर्थात हे रेंगाळणे काही सुंदर
नाट्यानुभव देते आहे हे तर खरे.
निर्वासित या विषयावर आपल्याकडे कमीच
काम झालेले आहे. भालेराव आदींची पुस्तके डॉक्युमेंटेशन पलिकडे जात नाहीत. या
विषयावर काहीकाळ काम केलेले असल्याने उत्सुकताही होती की पाहू , हा विषय अभिजित
आणि त्याची टीम कुठे नेतेय? शेवटी दिग्दर्शक हा त्याच्या टीम इतकाच चांगला असू
शकतो, हे सत्य अभिजित इतके ओळखलेला जनरेशन नेक्स्ट दिग्दर्शक माझ्या पाहण्यात
नाही.
उत्तुंग एकांकिका स्पर्धेत, सिडनेहम
कॉलेजने केलेली, स्वप्नील जाधव लिखित एकांकिका सुरू होताच लक्षात आले की, ‘निर्वासित’ हे शीर्षक ‘गिमिकी’ आहे. म्हणजे दर्दपोरा- दोजख-
निर्वासित? असे काही नाही. या एकांकिकेचा टोन नवा नाही, तरीही वेगळा आहे.
लेखक स्वप्नील जाधवने निवडलेला विषय, त्याची पार्श्वभूमी, व्यक्तिरेखा, घटनासुद्धा परिचित म्हणता येतील. त्यांची भाषाही अपरिहार्यपणे कोकण-रत्नागिरी पट्ट्यातील येते. खरंतर रचनेत मेलोड्रामाकडे जाण्याचा धोका आहे, जो अर्थातच नियंत्रणात ठेवला आहे. पण या परिचित पार्श्वभूमीतून लेखक स्वप्नील जाधव, दिग्दर्शकाच्या सहयोगाने जे नाट्यात्म विधान करतो, जो आशय मांडतो/ जे भाष्य करतो, तो वरचा क्लास आहे. इथेच निर्वासित जिंकते. स्टेटमेंट आणि ट्रीटमेंट हा तिचा आत्मा आहे. या दोहोंच्या सहाय्याने जो नाट्यानुभव ‘निर्वासित’ देते, तो मोठा आहे. प्रेक्षकांनी स्वत: अनुभवण्यासारखा आहे.
मुंबईच्या चाळवजा खुराड्यात हे नाट्य घडते पण त्याच्या रचनेपासूनच अभिजित आणि टीम, कल्पकतेचे एका पाठोपाठ एक सुखद धक्के देऊ लागतात. चाळीच्या सरळसोट खुराड्यात, विस्कळीत, अनियोजित कनिष्ठ मध्यमवर्गीय जगण्याचे जे तपशील भरलेले आहेत, ते कमाल आहेत. अगदी चाळीतील खोल्यांतून आज दिसू लागलेल्या लॅपटॉप ते वॉटर फिल्टरपर्यंत. या घरातील रंग उडालेल्या भिंती, दारे, टेबल, ओटा, सोफा अगदी स्वीचबोर्डसुद्धा, हे त्या घराचे अविभाज्य भाग झालेत. खुराड्याचा बाह्य जगातील प्रगतीशी संबंध नाही. पण ते त्याच आसमंतात जगते आहे, म्हणून तो असणे नाटकाच्या दृष्टीने आवश्यक आहे. यासाठी घराच्या भिंतींना स्कायलाइन कट्स देण्याची कल्पना मस्तच आहे. ती स्कायलाइन धरली तर पाठीमागे दिसणारे अवाढव्य टॉवर्स खुराड्यातील लोकांचा अवकाश व्यापून उरले आहेत, असे म्हणता येईल. बॅकड्रॉपला गिरणगावातून आज दिसणारे टोलेजंग टॉवर्स दिसतात. मुंबई शहर हे अखंड सळसळणारे चैतन्य आहे, मात्र दिग्दर्शक तो पार्श्वभागीचा अवाढव्य अजगर जाणून-बुजून निद्रिस्त ठेवतो. तो जिवंत झाला तर कदाचित खुराड्याला गिळून टाकेल. ही रचनाच एक मोठे भाष्य आहे. इथेच सानिक यांचे नेपथ्य नाट्याचा एक भाग होते. प्रेक्षकांशी संवाद साधू लागते. नियोजित ध्वनी-प्रकाशाच्या। सहाय्याने ते आपल्याशी बोलू लागते. म्हणजे पार्श्वभूमीवर सुस्त निद्रिस्त अजस्त्र शहर आणि त्या पुढे बोलके खुराडे, अशी ही अप्रतिम नेपथ्य रचना ‘निर्वासित’मध्ये योजली आहे. हॅट्स ऑफ टू टीम अभिजीत!
स्वप्नील
जाधवने एकांकिका लिहिताना परिचित वातावरणात, मर्यादित स्पेसमध्ये आहे म्हणून तीत
नाट्य घडवायचा अजिबात अट्टाहास केलेला नाही, ही जमेची बाजू. त्याने प्रवेशांतील
नाट्य शक्य तेवढे सटल ठेवले आहे, जे जरूरी होते. कारण ‘निर्वासित’ मधील संघर्ष हा व्यक्तींमधील नाही तर
तो परिस्थिती सोबत आहे. हे लक्षात घेतले नसते तर या नाट्याचा क्षणात मेलोड्रामा
होऊन बसला असता. मग या साध्या, आपल्या घरात रोज घडू शकतील अशा
प्रसंगांतून स्वप्नीलने एक कठीण काम सहज करून ठेवले आहे. ते म्हणजे कनेक्ट. या
नाट्यातील मुख्य पात्रां सोबत प्रेक्षक चटकन कनेक्ट होतो. त्यातील मुलगा मयूर क्षणात
प्रेक्षकांशी कनेक्ट करतो, जेव्हा तो घर शोधायच्या धडपडीला
लागतो. काही वेळात प्रेक्षक बापही होतात,
जेव्हा संतोष हसोळकर आपली हतबलता सांगू लागतात. ते तेव्हा बाहेरगावाहून मुंबईत जगण्यासाठी
निर्वासित झालेल्या करोडो लोकांचे प्रतिनिधी होतात. आई हे खरं तर टिपिकल चाळीतील , कोंकणी, परिचित पात्र- पण ते सुद्धा
प्रेक्षकांचे आपले होते. हे होण्यासाठी काही नेमके संवाद तो वापरतो, जसा की तिच्या तोंडी सतत असलेला
बाबासाहेबांचा उल्लेख एक भाबडी श्रद्धा आहे किंवा मुलीच्या तोंडी सहज येणारा अॅट्रोसिटीचा
उल्लेख, हा तारुण्यसुलभ मानसिक विद्रोह आहे. हे
ती पात्रे स्वाभाविकपणे करतात. इथे सहज – साधे लेखन मोठे होते. पुढे ते जेव्हा
आशयाकडे वळते तेव्हा ग्रेट होत जाते. छान, स्वप्नील जाधव!
कलाकारांमध्ये
प्रतिमा हसोळकर झालेल्या सायली बांदकरने कमाल केली आहे. या वयात जी समज, बेयरिंग पासून ते देहबोली, संवाद-विराम यातून ती दाखवते, ती लाजवाब आहे. तिचा मुलगा, ‘मयूर’ झालेल्या करण बेंद्रेकडे नीट पाहून
ठेवा. मराठीत एकाच वेळी अभावाने सापडणारे फिजिक, रूप, समज आणि अभिनय यांचा एक अपूर्व मिलाफ
मला त्याच्यात दिसतो. त्याने स्वत:ला किंवा दिग्दर्शकांनी त्याला, वेगवेगळ्या वकूबाच्या भूमिकांतून
अजमावावे ही विनंती. माइल्स टू गो, करण!
या दोघांना तोलाची साथ दर्शना- प्रिया
खोपकर आणि वडील- संतोष हसोळकर समजून देतात. हसोळकर कुटुंबं हे खरे वाटू लागते, जिवंतपणे वावरू लागते. त्यांच्या
शेजारी एक कांबळे नावाचे चाळीतले स्टॉक कॅरेक्टर आहे जे चाळीचे चित्र पूर्ण करते.
आपण नाटकासाठी पार्श्वसंगीत हा शब्द
सहज वापरतो. जो अपूर्ण आणि कित्येकदा चुकीचा ठरू शकतो. ‘निर्वासित’ ला केवळ पार्श्वसंगीत दिलेले नाही, तर ध्वनि संयोजन केलेले आहे.
पार्श्वभागी निद्रिस्त असलेल्या महाकाय मुंबई शहरापुढे चाळीतले खुराडे जिवंत
करण्यासाठी ते अत्यावश्यक होते. अक्षय धांगट यांनी ते काम नेमके केलेले आहे, मग ती
चाळीत सहसा वावरणारी मांजर असो की, मोरीतील गळका नळ असो. ते चित्र सजीव करण्याचे आपले
काम चोख पार पाडतात. सारे खुराडे आपल्यासमोर जिवंतपणे उभे करतात.
‘निर्वासित’चा शेवट अपरिहार्य आहे. तो
तसा होणार, हे आपल्याला माहीत आहे. आपल्यातील सामान्य, हतबल माणसाला या व्यतिरिक्त
दूसरा पर्यायच नाही. जेव्हा निर्वासित आपल्या अटळ आणि अपरिहार्य शेवटाकडे येते,
तेव्हा आपण काहीसे निवांत, रीलॅक्स झालेले असतो. कथेमध्ये आता नवे काही घडणे अशक्य
आहे. पण दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव यासाठी आपल्या हाती एक हुकूमाचा एक्का ठेवतो. चला
संपले नाटक, असे वाटत असतानाच तो त्याच्या पोतडीतून एका मागोमाग एक दृश्यास्त्रे
बाहेर काढतो. जी प्रोसिनियम आर्चची सफर आपल्याला जणू कॅमेर्यातून घडवून आणतात. फ्रेम
आयसोलेशन आणि फ्रेम सिक्वेन्स, उत्कृष्ट मांडलेला आहे. क्षणात या दृष्यांतून ‘निर्वासित’
मोठी ऊंची गाठते. एकांकिकेबाहेरचे, कथेपेक्षा मोठे स्टेटमेंट करते. निवांत झालेले
आपण पुन्हा शहारतो. अभिजीत झुंझारराव जाता-जाता, सहजपणे आपल्याला हलवून जातो.
निर्वासित'चा शेवट लेखकाने संवादातून किंवा दिग्दर्शकाने फ्रेम बांधून केलेला नाही, तर तो प्रकाशयोजनाकार शाम चव्हाण यांनी केवळ प्रकाशाच्या सहाय्याने केलेला आहे. या तंत्राने ते फ्रेम्स आयसोलेट करत सिनेमॅटिक मोंताजेस तयार करत जातात आणि अखेरचे कर्टन स्टेटमेंटदेखील प्रकाशाच्या सहाय्याने करतात. केवळ प्रकाशाच्या सहाय्याने केलेला, एवढा अफाट क्लायमॅक्स, या आधी पाहिला नव्हता. ग्रेट वर्क!
निर्वासित'चा शेवट लेखकाने संवादातून किंवा दिग्दर्शकाने फ्रेम बांधून केलेला नाही, तर तो प्रकाशयोजनाकार शाम चव्हाण यांनी केवळ प्रकाशाच्या सहाय्याने केलेला आहे. या तंत्राने ते फ्रेम्स आयसोलेट करत सिनेमॅटिक मोंताजेस तयार करत जातात आणि अखेरचे कर्टन स्टेटमेंटदेखील प्रकाशाच्या सहाय्याने करतात. केवळ प्रकाशाच्या सहाय्याने केलेला, एवढा अफाट क्लायमॅक्स, या आधी पाहिला नव्हता. ग्रेट वर्क!
मोठ्या कलाकृतीची वीण घट्ट असते. ती आपले गारूड घेऊन येते आणि त्या गारुडातून आपल्याला बाहेर पडू देत नाही. ती आशयाचे अनेक पदर घेऊन येते. प्रतलावर आपल्याला गुंगवते आणि प्रतलाखाली एक मोठा समुद्र आहे, त्यात डोकावून पाहायला हवे अशी जाणीव देत राहते. सिडनेहम कॉलेजची टीम आणि अर्थातच त्यांचा कप्तान अभिजीत झुंझारराव असा परिपूर्ण नाट्यानुभव आपल्याला देतात. सलाम करायला लावतात. म्हणजे ‘दर्दपोरा’, ‘दोजख’ आणि नंतर ‘निर्वासित’ हा आशय आणि रचना दृष्ट्या चढता आलेखच आहे. कीप इट अप !!
-आभास
आनंद
*******





