शरीराचे काही भाग
झाकून ठेवायचे असतात. त्यांना त्यांच्या नावाने उल्लेखायचं देखील नसतं. त्या बद्धल
मित्र-मैत्रिणींतही बोलायचं नसतं आणि आई- वडिलांकडे बोलणे म्हणजे देखील संकोच. शरीराच्या
अशा भागांकडे, जे दुसर्याला दिसत देखील नाहीत, आपले स्वत:चे तरी कितीसे लक्ष असते? बहुतेकदा नसतेच. त्यामुळे अशा अवयवांबाबत काही
समस्या उभी राहिली तर ती आधी स्वत:ला कळणे, नंतर तिचा उल्लेख घरात करू की नको? असे होणे आणि नंतर ती समस्या उपचारांपर्यंत पोहोचणे, यात मौल्यवान वेळ निघून जातोच. ही समस्या ब्रेस्ट
कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराबाबत ( पहा ! स्तनांचा कर्करोग म्हणणे टाळतोच आपण. ) असेल, तर हे वेळ जाणे धोकादायक ठरू शकते. ज्या अवयवाचा संबंध स्त्रीच्या एस्थेटिकल स्वरूपाशी, असतो, जे तिच्या स्त्रीत्वाचे लक्षण
मानले जाते, त्यालाच जीवघेणा आजार होऊ शकतो तेव्हा हा विषय झाकलेला
असण्यातील धोके लक्षात येतात. हा विषय स्त्रियांशी संबंधित असल्याने जर त्यांना या
विषयी काही जाणून घ्यायचे असेल, तर त्यांनी ही माहिती मिळवायची
कुठून? हा ही एक प्रश्नच. कारण ‘त्या’ अवयवांबाबत अगदी त्यांच्या दुखण्यावरसुद्धा चर्चा टाळली
जाते. या विषयाला टाळण्याने, गप्प राहून, उशीर झाल्याने किती स्त्रियांना मोठी किंमत द्यावी
लागली असेल याची आपण कल्पनाच करू शकतो.
अशा
विषयावर सत्तरच्या दशकात, ल्युवीस पेज या लेखिकेने ‘टिश्यू’ लिहिले. नाटकाचा हेतूच स्तनांचा
कर्करोग या विषयी माहिती सर्वांना आणि विशेषत: स्त्रियांना देणे. तो लपविण्याचा
विषय नाही, त्यावर चर्चा होऊ शकते, केली पाहिजे, याचे भान सर्वांना देणे. या विषयावर बोलते होणे-
करणे असा हेतू असल्याने लेखिकेने ‘विषय’ हा केंद्रबिंदू ठेवत, नाट्यलेखनासाठी समस्यानाट्य (problem play) हा घाट न स्वीकारता आत्मकथनपर (self narrative) नाट्य बेतले. याचे काही परिणाम या नाटकातील
नाट्यनिर्मितीवर झाले. आत्मकथनपर नाट्यात, समस्यानाट्यातील संवादी संघर्ष नसल्यामुळे त्यातील नाट्य अन्य जागांतून शोधावे
लागते. हे कंटाळवाणे होऊ नये म्हणून छोट्या एपिसोडीक प्रसंगांची रचना केली आहे.
प्रसंगोपात कथानकात प्रेक्षक अडकू नये म्हणून काळाच्या, मागे-पुढे केलेल्या खंडित तुकड्यांतून नाट्यरचना केली आहे. कथानक दुय्यम करून विषय
ठळकपणे पुढे राहील, हे पाहिले आहे. लेखिकेने जाणीवपूर्वक स्वीकारलेला हा
घाट आहे. तोच या नाटकाचे सादरीकरण महाकठीण करून ठेवतो. यातील मुख्य पात्र, रितूच्या कथनातून हे नाटक पुढे सरकते. या व्यतिरिक्त
जी दोन पात्रे आहेत ती रितूच्या आयुष्याशी संबंधित तेरा वेगवेगळ्या भूमिका करतात.
या मागेही हेतू आहे. प्रेक्षकांनी या व्यक्तिरेखांमध्ये मर्यादेहून अधिक गुंतून
जाऊ नये आणि नाट्याचे केंद्र रितू आणि तिचे निवेदनच रहावे. म्हणजेच या
आत्मनिवेदनातून संपूर्ण नाट्य उभे करणे आणि त्याचवेळी विषय प्रेक्षकांपर्यन्त
पोहोचवणे ही जबाबदारी रितूवर येते. या अर्थाने हे रितूचे नाटक आहे, झाले पाहिजे. जेव्हा हे नाटक , ‘एक रिकामी बाजू’ या नावाने सादर झाले होते,
तेव्हा हे सारे नाट्यबंध नाटककार प्रदीप वैद्य यांनी तसेच ठेवले होते, त्यांचे रूपांतर केले नव्हते. त्यामुळे मूळ नाटक सादरीकरणासाठी
कठीण होते, तसेच त्याचे मराठी रूप ही आहे. नाटकातील नाट्य हे
प्रसंगेतर गोष्टींवर अवलंबून आहे. ते आत्मनिवेदन आणि आत्मवेदनेतून पोहोचायला हवे.
तसे झाले नाही तर नाट्य परिणामात काही न्यून राहील.
हे
नाटक थिएट्रिक्स ग्रुपतर्फे अनिरुद्ध खुटवड यांनी दिग्दर्शित केले होते आणि सात
प्रथम पुरस्कारांसहित ते 2009 सालचे झी गौरव पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट प्रायोगिक
नाटक ठरले होते. गीतांजली कुलकर्णी, वीणा जामकर आणि पद्मनाभ बिंड अशा
तगड्या टीममध्ये ते कसे सादर झाले असेल याची कल्पना येऊ शकते. पण आज इथे लिहितोय, नुकत्याच झालेल्या राज्यनाट्य स्पर्धेत मराठी नाट्यपरिषदेच्या मध्यवर्ती शाखेने सादर केलेल्या
प्रयोगाबद्धल.
विशीतील
रितूला आपल्या ‘त्या’ ठिकाणी गाठ असल्याची शंका येते.
ती आधी घरात सांगितल्यावर, ‘काही नाहीये’ अशी उडवून लावली जाते. मग शंका वाढत गेल्याने ती
स्वत:च डॉक्टरपर्यन्त पोहोचते. तिथेही पुरूष डॉक्टर समोर व्यक्त होण्याच्या
अडचणीतून शेवटी तपासणी होते आणि स्तंनांच्या कर्करोगाचे निदान होते. तिला मास्टेक्टमीला सामोरे जावे लागते आणि उजवा
स्तन काढून टाकावा लागतो. या दरम्यान कथा तिचा एकटीचा भावनिक प्रवास. समाजाचा, कुटुंबीयांचा, दृष्टिकोन, प्रियकराचा त्याग ते उमलत्या वयातील शारीरिक बदलांची
उत्कट हुरहूर या खंडित मागे-पुढे होणार्या आठवणींतून पुन्हा ऑपरेशनपर्यन्त येते.
ऑपरेशन नंतर तिच्यातील भावनिक आंदोलनांसोबत एका सकारात्मक बदलाकडे कथेचा प्रवास
होतो. या मार्गात तिला स्वीकारणारा सखा भेटतो. आपण अपूर्ण नाही तर व्यक्ति म्हणून
संपूर्ण आहोत. आपण नुसते जगू शकतो असे नाही तर सकारात्मकपणे आपल्या इच्छा, ध्येयाकडे
प्रवास करू शकतो या जाणीवेपाशी नाटक संपते.
ऑपरेशन झालेल्या रितूच्या, “का? हे मलाच का?” या प्रश्नातून नाटक सुरू होते. खंडित काळामध्ये मागे-पुढे होत सादरीकरण
करताना हे निवडीचे स्वातंत्र्य दिग्दर्शकाला मिळते. त्या नंतर हा प्रवास रितूच्या
तपासणी, उपचार, रोगाचे निदान होणे ते ‘त्या’ ठिकाणी गाठ येण्यापर्यन्त उलट
दिशेने पुढे सरकतो. आणि दुसर्या अंकात ऑपरेशन ते रितूतील सकारात्मक बदल असा
क्रमवार जाऊन रितूला, पर्यायाने सर्व स्त्रियांना एक नवी उमेद देत संपतो.
दिग्दर्शक डॉक्टर अनिल बांदिवडेकर यांचे स्वत: एक डॉक्टर असणे या विषयाला एक वेगळे
परिमाण देते. जो मूळ ‘टिश्यू’ मध्ये देखील अपेक्षित आहे. डॉक्टर, नर्ससहित वॉर्डबॉयने एक रूक्ष, भावनाशून्य व्यवहार रूग्णासोबत करणे हे इथे ही
होतेचं. आणि हेचं साधारण कमी अधिक प्रमाणात घरातील माणसांतही आणून नाटक आपल्याला
रितूच्या समस्येत अडकवत जाते, तिला मिळणार्या सहानुभूतीतून
नाही. ही सहानुभूती वर्ज्य ठेवून दिग्दर्शक रितूची समस्या आपल्यापर्यंत दाहकपणे
पोहोचवतो. रितू आणि तिची समस्या नव्हे तर स्तनांचा कर्करोग हा विषय आपल्याला
अस्वस्थ करत जातो. ज्यांनी आपल्या कुटुंबात कॅन्सर अनुभवलाही नसेल, असे प्रेक्षकही कमालीचे अस्वस्थ होतील असा परिणाम
नाटक साधते आणि हीच अस्वस्थता कायम राखत शेवटाकडे येते. या अस्वस्थतेतूनच विषयाची
दाहकता आपल्याला जाणवत राहते.
घाटातच
कठिण असलेल्या या नाटकाचा प्रयोग करणारे मूळ कलाकार मोठ्या क्षमतेचे होते. इथे
दिग्दर्शक नव्या, अननुभवी कलाकारांवर ही जबाबदारी सोपवतो. हे करताना
आपले कठिण काम आणखीनच कठिण होणार, हे त्याला माहीत आहे. तरीही एक
सुविहित, परिणामकारक नाटक आपण पाहतो. घटनानाट्य नसल्याने इथे दिग्दर्शकाला
निवेदनातील नाट्य-परिणाम साधण्यासाठी तंत्राची मदत घ्यावी लागते. अतिशय सुंदर, सूचक आणि नेमके नेपथ्य उभे करून शीर्षकातील एक
रिकामी बाजू सतत जाणवत राहील असे नेपथ्य उभारून ते साधले जाते. या जोडीला मोजकीच
पण परिणामकारक प्रकाशयोजना आणि नाटकाची लय पकडणारे पार्श्वसंगीत सतत जाणवत ठेवून
नाटक दृकश्राव्य परिणामात कुठे उणे राहणार नाही, याची काळजी दिग्दर्शक घेतो. रितूच्या सुंदर, निरागस असण्यातून, तसेच गोड आवाजातील आत्मनिवेदनातून
नाट्यविषय परिणामकारकपणे पोहोचवण्याची काळजी घेतलेली आहे. नाट्यप्रयोगात एक सहजता
आहे. मग प्रयोगात काही उणे, राहिले का? तर हो. तसे ते कोणत्याही प्रयोगात
राहते. ते काय?
नव्या कलाकारांच्या अनुभवातील मर्यादा
त्यांना सहा-सात भूमिका करताना ते छोटे–नेमके बदल करून मोनोटोनी ब्रेक करू देत नाहीत. ते अनुभवी सक्षम
अभिनेत्यांचे काम आहे. हे छोटे छोटे बदल, जसे आवाजाचा पोत, संवादाची फेक, शरीरभाषा यात केलेला छोटासा बदल परिणाम
साधू शकेल.
रितूच्या भावनासोबत
जोडलेले तिचे नृत्य, पदन्यास यांचा अधिक वापर करता आला तर विषयाच्या
ताणातून प्रेक्षकांना क्षणभर मोकळे करता येईल. सतत ताण असलेल्या नाटकात ते आवश्यक
वाटते. रितूच्या भूमिकेवर, संवादफेकीवर आणखी काम करता येईल, कारण तेच या नाटकाचे मध्यवर्ती आणि निवेदक असे
दुहेरी केंद्र आहे. महत्वाचे म्हणजे एपिसोडीक नाटकातील अन्य प्रसंग वेगवान असायला
हवेत. तरच भावनिक प्रसंगांतील लयबदल साधून जास्ती परिणाम साधता येईल. संहितेच्या शेवटाकडे
जाताना रितूला पुन्हा उभे करणारे सकारात्मक प्रसंग जास्ती उठून येतील असे पाहायला
हवे, अन्यथा दीड तासांच्या मूळ नाटकाचे हे दोन तासाचे
सादरीकरण, त्यातून येणारी अस्वस्थता झेलणे प्रेक्षकांना कठीण
जाईल.
- आभास आनंद
- 9821091946