Saturday, December 22, 2018

खगनिग्रह: एक अॅबस्ट्रॅक्ट प्रयास...


आयुष्यातील खाचा-खळग्यांतून स्व-शोधाचा
खगनिग्रह
 
महाराष्ट्रात स्पर्धांच्या निमित्ताने सालाबाद शंभर एक नव्या नाट्य संहिता लिहिल्या जातात. भारतातीलच नव्हे तर जगातील रंगभूमीच्या अवकाशात हा एक प्रकारचा विक्रम ठरावा. राज्य नाट्य स्पर्धा जाहीर होण्यापूर्वीच वर्षभर हौशी रंगकर्मींचा नव्या संहितेचा शोध सुरू असतो. कधी ती मिळते, कधी नाही. मग काही जुन्याच संहिता सादर करतात. काही नव्याने स्वत: लिहून घेतात. काहीही असो. नव्या नाट्य संहिता मराठीत सतत येत असतात, त्यांचे प्रयोगही होतात, हे स्तुत्य आहे. नंतर या संहितांचे प्रयोग  प्रायोगिक महोत्सवाच्या निमित्ताने झी, टाइम्स आणि राज्य प्रायोगिक स्पर्धांत होतात.

  

प्रायोगिक नवता, हा प्रायोगिक नाटकाचा मुख्य हेतू असतो/ असावा. नवा विषय मांडणे म्हणजे प्रायोगिकता नव्हे. नवा असो अथवा जुना- तो विषय नव्या पद्धतीने, वेगळ्या दृष्टीकोनातून आणि वेगळ्या घाटात, शैलीत मांडणे म्हणजे प्रायोगिक नवता म्हणता येईल. प्रश्न हा की, सादर होणार्‍या किती संहितांमधून हा प्रायोगिक नवतेचा निकष पाळला जातो? तर फार कमी. त्यामुळे असा एखादा प्रयत्न नजरेत आला, तर त्याची दाखल घेतली पाहिजे. किमान त्याचे पुढील प्रयोग पाहून जुन्या-नव्या रंगकर्मीनी त्यातून काही नव्या शक्यता   पडताळून पाहायला हव्यात.
 
माध्यम, मुंबई आणि अभिषेक कलामंच, महाड निर्मित‍ खगनिग्रह या नाटकाचा प्रयोग या दृष्टीने पाहायला हवा. खगनिग्रहचे लेखन आणि दिग्दर्शन डॉक्टर अनिल बांदिवडेकर यांनी केले आहे. नाटकाला त्या अर्थाने कथानक नाही. नायक, नायिका किंवा खलनायक नाहीत. माणसाचा आत्मशोध हा नाटकाचा विषय. तो मांडलाय खग म्हणजे पक्ष्यांच्या रुपकातून.
 
पक्षांना एकदा, आपल्याला एखादा समर्थ राजा हवा, अशी इच्छा होते. भारद्वाज पक्षी त्यांना सातासमुद्रापार असलेल्या खगेंद्राची कल्पना देतो. त्याच्या भेटीला निघण्याचे सर्वांना आवाहन करतो. आधी उत्साही असलेले पक्षी एक-एक करत मागे होतात. आत्मशोधाचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. पक्ष्यांना हुरूप यावा म्हणून भारद्वाज त्यांना निरनिराळ्या कथा सांगतो आणि शेवटी ते आपल्या राजाला भेटायला निघतात. नाटकात येणार्‍या या कथा देखील तुकड्या-तुकड्यांतून येतात. त्यांतून सरळ अर्थही काढता येत नाही. अॅबस्ट्रॅक्ट नाटकात ते काम प्रेक्षकांवर सोडले जाते. आपल्या प्रेक्षकांना  प्रसंग पाहून स्वत: विचार करणे, अर्थ लावणे यापेक्षा सरळसोट कथानक भावते, उमजते. त्यामुळे इथे नाटक पाहताना त्यांची कसोटी आहे. नाट्यबीज, आलेख, आणि निर्णयन असे काही शोधत गेल्यास या नाटकात फसगत होऊ शकते. विशेषत: दुसर्‍या अंकातील निरनिराळ्या दर्‍यांतील तत्वज्ञान, अर्थ समजून न घेता पहिले, तर व्यर्थ होईल.
 
खगनिग्रह हे एक नृत्य- संगीत नाट्य आहे. ते अॅबस्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये सादर होते. नाटकाच्या स्टेज डिझाइनमधे वस्त्रांच्या तुकड्यांतून निर्मिलेल्या आकाशापासून हे अॅबस्ट्रॅक्शनिझम वापरलेले आहे. नाटकाचा रंगावकाश मोकळा ठेवलेला आहे. हे नाट्य कुठे घडते, ते दुय्यम आहे. पाठीमागे तुकड्यांतील आकाश- ढग, हे पक्षांचे नाटक आहे, असे सुचवते. ते कुठेही किंवा कुठेतरी घडते आहे, ते ही दुय्यम आहे. मोकळ्या रंगावकाशात कलाकारांचे वस्त्रप्रावरण हेच स्टेज प्रॉप बनते, हे वस्त्र रचना सुंदर आणि समर्पक. त्याचाच वापर घटना, प्रसंगांना प्रकाशाच्या सहाय्याने उठाव देण्यासाठी शीतल तळपदे यांनी देखणेपणाने  केलेला आहे.
 
अॅबस्ट्रॅक्ट नाटकात प्रेक्षकांचे सर्व लक्ष कलाकारांकडे हेतुत: वळवले जाते. कलाकारांच्या प्रकटनामध्ये नृत्य आणि संगीत हे महत्वाचे घटक होतात. इथे स्मृति तळपदे यांनी कथ्थक हा बेस धरून, नृत्यातील भावांग आणि नृत्यांग दोन्हींचा समतोल  साधत नाट्याविष्काराचा प्रयत्न केलेला आहे.  या नृत्य नाट्यासाठी मयुरेश माडगावकर यांनी सुयोग्य संगीत तयार केले आहे. विशेषत: त्यातील, खगेंद्र हा, खगेंद्र हो या थीम गीतासाठी  अंतर्‍याच्या शेवटी वापरलेला, उडणार्‍या पक्ष्यांच्या पंखांचा आवाज लाजवाब.

खगनिग्रह मधील अॅबस्ट्रॅक्ट पीसेसना भावपूर्ण आणि एक्स्प्रेसिव्ह नृत्यांनी सजवले आहे, नृत्य स्मृति, मुंबईच्या स्मृति तळपदे यांनी. एका वेगळ्या अंगाने त्यांनी यातील नृत्यांचा केलेला विचार जाणवतो. कर्टन, फीलर, कॉमेंटर आणि  इंटरप्रीटर अशा अंगांनी तो जाऊ शकतो. अॅबस्ट्रॅक्ट संहितेतील प्रसंगांना ऊर्जा देण्याचे काम, त्यांनी केले आहे.

लेखक-दिग्दर्शक अनिल बांदिवडेकर यांनी आपली नेहमीची शैली सोडून इथे प्रासंगिक संहितेतून नाटक बेतले आहे. हे नाटक खरे तर लेखकाच्या कल्पनेतून आधी त्यांच्या मनात उभे राहिले आणि नंतर प्रत्यक्षात उतरले आहे. एक वेगळा अॅबस्ट्रॅक्ट प्रयोग केळ्याचे श्रेय त्यांना द्यायलाच हवे.

खगनिग्रह मधील मोजके सोडून सर्व कलाकार नवे आहेत. पण ते प्रयोग खणखणीत करतात. आता आपला प्रेक्षक अॅबस्ट्रॅक्ट नाटकासाठी किती तयार आहे, हे पाहायला हवे.
- आभास आनंद
******

Tuesday, April 10, 2018

माकड आता देखणे होते आहे...














प्रत्येक नाटक हे त्याच्या गुणदोषा सकट उभे राहते. स्वमग्न रंगकर्मींचे नाटक एकदा उभे राहते, ते सर्वगुणसंपन्न बंदिस्त रूपात. ते उभे राहील की झोपेल हे तेव्हा आणि तिथेच ठरते.

दुसऱ्या प्रकारचा रंगकर्मी, नाटक ही सतत बदलती कृती असते, त्यावरील काम कधीच संपत नाही, हे समजून असतो. त्याला टीकाकार आपल्या नाटकाबद्दल काय म्हणतात, हे ऐकायचे असते. त्यातून योग्य ती आणि तितकी पॉजिटीव्ह एनर्जी मिळवत तो आपले नाटक पुढे नेत राहतो. त्याचे नाटक म्हणूनच प्रयोगागणिक वेगळा आलेख देते. अभिजित झुंझारराव, हा असा दुसऱ्या प्रकारचा रंगकर्मी आहे.


 व्यावसायिक नाटक हे आजवर स्टारवॉर होते, आता ते बदलेल अशी आशा, कधी नव्हे ती निर्माण होते आहे. स्टारपेक्षा नाटक अभिनेत्यांचे असावे. उत्तम नाट्य ही प्रेक्षकांची गरज असायला हवी. नव्या, निष्ठावंत, तरुण रंगकर्मींकडून असे नाटक होते आहे. गरज आहे प्रेक्षकांनी त्यावर विश्वास दाखवण्याची.

माकड हे सर्वप्रथम नावातच फसलेले नाटक वाटत होते. आता या नाटकाला, याहून चपखल नाव सुचवा- अशी स्पर्धाच घेता येईल- इतके ते समर्पक वाटते. तुमच्यासाठी, सरकार तुमच्या घरात, या घोषणा रूपकावर माकडचा डोलारा उभा आहे.


 राजकीय नाटकाची आपली परंपरा नाही. लेखकाची राजकीय समज, इथपासून वानवा आहे. प्रेक्षकांची समज हा दुसरा मुद्दा व्हॅलीड नाही. जेव्हा जेव्हा चांगली राजकीय कृती आली, ती त्यांनी डोक्यावर घेतली आहे. माकड हे रुपकांतून, किंचित अतिवास्तववादाचा आधार घेत ठोस राजकीय भाष्य करण्याचा प्रयत्न करते. ते फॅन्टसी नाही, संभाव्यतेतील काल्पनिका आहे. म्हणूनच काल भरलेल्या सभागृहातील लोकांपर्यंत ते पोहोचत होते. त्यांना स्वतःवरच हसायला, टाळ्या पिटायला लावत होते.


चैतन्य सरदेशपांडे याचे हे पहिले नाटक असेल तर त्याचे कुणीतरी कौतुक करायला हवे. जो फॉर्म त्याने माकडसाठी स्वीकारला आहे, तो विचारांत पडावे असा आहे. मध्यमवर्गाची राजकीय मानसिकता समोर ठेवून हे नाटक लिहिले आहे. त्याची सम्पूर्ण व्यवस्थेकडे तुच्छतेने पाहण्याची, स्व-केंद्री मानसिकता, स्वत: बद्दल असलेला नैतिक श्रेष्ठतेचा भ्रम, त्याच्या साऱ्या नसा त्याने नीट पकडल्या आहेत.





मध्यम फडणीस हे जर संपूर्ण मध्यमवर्गाचे प्रतीक असेल, तर त्याला येणार्‍या फिट्स, हा मध्यमवर्गाचा न्यूनगंड आहे. या न्यूनगंडातून येणाऱ्या श्रेष्ठत्व अहंकाराचा तो नमुना आहे. स्वत: चैतन्य ही भूमिका करत असल्याने, त्यात काय, कसे आणि किती हवे, हे त्याने नीट समजून केले आहे.


त्याला साथ देणारी सोनाली, हे वेगळेच रसायन आहे. आपल्या वाट्याला शो स्टीलिंग कॅरेक्टर नाही, हे ओळखून तिने मिली शेख, हीचे डिटेलिंग करण्यात आपला वेळ सत्कारणी लावला आहे. तिचे डोळे बोलतात. भय, राग, तिरस्कार, करुणा, दु:खाच्या विविध छटा, त्यानुसार डोळे पाणावण्यापासून थेट अश्रु ओघळेपर्यंत भावना व्यक्त करण्यावर तिचा संपूर्ण ताबा आहे, त्यात विविधता आहे. तिने मिली शेखचे मराठी- मुस्लिम असणे उच्चार आणि लय यातून आणले आहे. देह बोलीतून तिची मन:स्थिती ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते. हॅट्स ऑफ, सोनाली! या तिच्या कामाकडे केवळ संवादी भूमिका नाही, म्हणून दुर्लक्ष होत असेल, तर ते योग्य नव्हे.





हवालदार कोडगे झालेला राहुल शिरसाट गुणी अभिनेता आहेच. इथे माकड मध्ये तो एका पिव्हट्ल भूमिकेत आहे, जे कथेला गती देते आणि खेळवत ठेवते. या भूमिकेत एक रिलीफ फॅक्टर आहे, जो त्याने चोख बजावला आहे. मध्यमवर्गीय, हिन्दी पिक्चर्सेक जगण्याची, खिल्ली उडवत, त्याच्या भावनांची हिन्दी फिल्मी गीतांतून चेष्टा करत तो माकड च्या कथानकाला एक रोलर कोस्टर करतो. माकड मधील ताण-तणाव जर असह्य होत नसेल तर तो हवालदार कोडगे या पात्रामुळेच.


मंत्री झालेले हरीश भिसे जी करताहेत ती व्यवस्थेची प्रातिंनिधिक (आर्च टाइप) भूमिका आहे. त्यामुळे त्यांना एक मंत्री उभा करायचा नव्हता तर त्याच्या रूपाने संपूर्ण राजकीय मनोवृत्ती दाखवायची होती. ती त्यांनी करिकेचर होऊ न देता, एक विशिष्ट सूर लावून केली आहे आणि ती पुरेशी प्रभावी आहे.


दिग्दर्शक अभिजीत झुंझारराव माकडबाबत अजूनही विचार करताहेत, हे तुम्हाला माकडचे कोणतेही दोन प्रयोग पाहीले तर दिसेल. माकडमध्ये त्यामुळे जी भर पडते आहे, तिनेच आज माकड हे नाटक अधिक देखणे होऊ लागले आहे.


नेपथ्य, संगीत, प्रकाश ही माकडची तांत्रिक टिम, थेट स्पर्धांतून आलेली आहे, त्यामुळे ती नेहमी प्रमाणेच सशक्त आहे. एखाद्या नाटकाचा प्रकाश योजनाकार देखील त्यात काय मूल्यात्मक भर घालता येईल, याचा सतत विचार करत असतो, तेव्हा ती टिम ऑलरेडी जिंकलेली असते. मग तिला स्पर्धांत यश मिळो- न मिळो.


ते मिळण्याची एक स्टेज नक्कीच आलेली आहे. खात्री आहे, लवकरच ती वेळ येईल.

  - आभास आनंद







Friday, March 9, 2018

Shakespearecha (Prithvicha) Mhatara


Shakespearecha (Prithvicha) Mhatara

Alias...Theatre of conviction.






The fundamental question is, ‘If a Tragedy, when went over the roof, becomes a farce?’ It is said that best of the humor comes with a frill of tragedy attached. If you are not sure while executing, you’ll go by rules. If you are sure of your logline, you will break the rule.
 Theatre as they say, is a great leveler. It can’t be taken for granted as a performer. Every performance demands and demands a great much of creative energy out of an artist. If you are complacent it will not spare you and if you dare to experiment, it is with you. Who else, is an option to break the rule, than Mac, Makarand Deshpande?

The occasion was to setup a cultural hub in the heart of Mumbai, Vileparle, through ‘Madhyam’ his own beloved theatre group, where he marked his steps, some thirty-five years back as a committed soldier of Madhyam Mumbai. He preferred to celebrate the occasion on his birthday, with his new Marathi play, ‘Shaksperecha Mhatara. Wherein he portrayed himself, not as a soldier but the great worrier, King Lear.

Shakespearian  play, ‘King Lear’ have seen many takes on Marathi stage over a century. The original plot of the play is so much eventful & melodramatic that it could have easily been converted in to a farce, a genre foreign to Marathi Theatre in those days. Instead, they picked up the Melodrama out of it as it was essentially suitable to their then social mindset.  Kusumagraj wrote the milestone of a play ‘Natasamrat’ and even great playwright, Vijay Tendulkar took a shot at it with his play, ‘Vitthala.’ The tragical melodramatic elements of both plays were so heavy that it invited a satire for sure. During eighties, playwright, P. L. Mayekar did it in his Malavani version as ‘Pandgo illo re ba illo’. A play that is still remembered for its apt satirical linkage with the original and still opted for an independent plot.

So, a tragedy, when goes over the roof may become comic and may easily be converted in to a farce. Mac declares ‘Mhatara’ as a farcical version of a tragical melodrama, but in the absence of the eventful adoption of situations from King Lear, it remains more of a satire.  A la Pandgo, the play remains swinging on satirical note. That is exactly what the theatre of conviction demands, and Mac fulfills it, say brilliantly as he adopts only the premise & sparingly the plot of King Lear. For long years he has been doing Hindi theatre on the intimate stage of Prithvi. A place where he must have learned the art of theatre of conviction, from his mentor, no need to name, who?

Once upon a time there lived a Mhatara called, 'Prithvicha Mhatara', who lived and taught his disciples the theatre of conviction with a simple logic;

"Your Theatre with Your Conviction and Your way. And Remember there are ways and thus there’s theatre, the life.

Mhatara begins with a prolonged classical vocal melody of a singer, not a part of the play. Why?
Theatre of conviction.
The King Lear enters on stage fighting out a war on field. Why?
Theatre of conviction.
The artists deliver their lines in part verses, Why?
Theatre of conviction.
With the same conviction, Mac the writer, enters in to the plot of King Lear and selectively creates montages out of the original incidents. Even then the first act lasts for well above an hour, something to do with, in the later refinement, sure. What we have seen was a very first show.




Till now, I don’t think we have seen a storyline based entirely on King Lear. Both Natsamrat & Vitthala have had the germ and build upon the plot independently and as a satire of both, Pandgo did the same. So here 'Shakespearecha Mhatara' at least hires the premise and some elements of plot from King Lear, I believe. Then it connects the plot to a present similea and brings in the same characters with different identity, (Body language maintained) as Professor Patil. Again a brilliant idea. Even the scene of Professor Patil in Lear’s body begging on street has direct connection with the original Play. So a delicate balancing of plot adoption and free interpretation is a blend with which Mac approaches the second act. All the present-day characters are replicated from King Lear the play. So, “Me Raja aahe!” becomes “Me Head-master aahe!” and so on. Even the youngest daughter of the King is brought in as Manjusha, the Manaskanya. Through her, the writer has enabled the POV of the now absent third daughter. To culminate the Lear story, the play must go back in to history, again with the writers’ interpretation and complete the fate of the characters.
Turning back to the performance, the play enlightens. A fearful thought mingles with certain uneasiness that what we are laughing at, is our own destiny. Smarter deliveries like,
“Aamhi Rathsamraat banlo nahi.” (I have not become a chariot king.) or
“Samrat Lear ne Shatkanushatkanchya Mhataryanche prarabdh lihun thevle aahe.”
(King Lear has depicted the eternal fate of all the old men coming over the centuries.)
The thought itself Is threatening.
The writing is smart and so are the dialogues. Nothing surprising as it has years of passionate theatre experience behind.


Mac as an actor, as we all knew of him, performs with ease and flair. So brilliant is his Head Master Patil that we sometimes prefer to ignore his student, Rohit, who is an equally brilliant actor. All the girls of King Lear look beautiful and perform nicely. In the absence of other detailed characteristic traits, only so much can be said about. The set is good and compact. Lights as I can say sincerely, are not understood, but they helped the play.


Overall an amusing, different take on King Lear in todays context, performed with own conviction.
(Picture Courtesy: R.D. Joshi &Tanay Varde.)
******




Tuesday, October 31, 2017

'निर्वासित' -एक परिपूर्ण नाट्यानुभव....


निर्वासितही एकांकिका पहायला जाण्यापूर्वी काही शंका मनात होत्या. त्या पैकी पहिली- या अभिजितला झालंय तरी काय? आधी दर्दपोरामग दोजखआणि आता निर्वासित’? हा बॉर्डरवरच का रेंगाळतोय? अर्थात हे रेंगाळणे काही सुंदर नाट्यानुभव देते आहे हे तर खरे.

निर्वासित या विषयावर आपल्याकडे कमीच काम झालेले आहे. भालेराव आदींची पुस्तके डॉक्युमेंटेशन पलिकडे जात नाहीत. या विषयावर काहीकाळ काम केलेले असल्याने उत्सुकताही होती की पाहू , हा विषय अभिजित आणि त्याची टीम कुठे नेतेय? शेवटी दिग्दर्शक हा त्याच्या टीम इतकाच चांगला असू शकतो, हे सत्य अभिजित इतके ओळखलेला जनरेशन नेक्स्ट दिग्दर्शक माझ्या पाहण्यात नाही.

उत्तुंग एकांकिका स्पर्धेत, सिडनेहम कॉलेजने केलेली, स्वप्नील जाधव लिखित एकांकिका सुरू होताच लक्षात आले की, निर्वासितहे शीर्षक गिमिकीआहे. म्हणजे दर्दपोरा- दोजख- निर्वासित? असे काही नाही. या एकांकिकेचा टोन नवा नाही, तरीही वेगळा आहे.


लेखक  स्वप्नील जाधवने निवडलेला विषय, त्याची पार्श्वभूमी, व्यक्तिरेखा, घटनासुद्धा परिचित म्हणता येतील. त्यांची भाषाही अपरिहार्यपणे कोकण-रत्नागिरी पट्ट्यातील येते. खरंतर रचनेत मेलोड्रामाकडे जाण्याचा धोका आहे, जो अर्थातच नियंत्रणात ठेवला आहे. पण या परिचित पार्श्वभूमीतून लेखक स्वप्नील जाधव, दिग्दर्शकाच्या सहयोगाने जे नाट्यात्म विधान करतो, जो आशय मांडतो/ जे भाष्य करतो, तो वरचा क्लास आहे. इथेच निर्वासित जिंकते. स्टेटमेंट आणि ट्रीटमेंट हा तिचा आत्मा आहे. या दोहोंच्या सहाय्याने जो नाट्यानुभव निर्वासितदेते, तो मोठा आहे. प्रेक्षकांनी स्वत: अनुभवण्यासारखा आहे.


मुंबईच्या चाळवजा खुराड्यात हे नाट्य घडते पण त्याच्या रचनेपासूनच अभिजित आणि टीम, कल्पकतेचे एका पाठोपाठ एक सुखद धक्के देऊ लागतात.  चाळीच्या सरळसोट खुराड्यात, विस्कळीत, अनियोजित कनिष्ठ मध्यमवर्गीय जगण्याचे जे तपशील भरलेले आहेत, ते कमाल आहेत. अगदी चाळीतील खोल्यांतून आज दिसू लागलेल्या लॅपटॉप ते वॉटर फिल्टरपर्यंत. या घरातील रंग उडालेल्या भिंती, दारे, टेबल, ओटा, सोफा अगदी स्वीचबोर्डसुद्धा, हे त्या घराचे अविभाज्य भाग झालेत. खुराड्याचा बाह्य जगातील प्रगतीशी संबंध नाही. पण ते त्याच आसमंतात जगते आहे, म्हणून तो असणे नाटकाच्या दृष्टीने आवश्यक आहे. यासाठी घराच्या भिंतींना स्कायलाइन कट्स देण्याची कल्पना मस्तच आहे. ती स्कायलाइन धरली तर पाठीमागे दिसणारे अवाढव्य टॉवर्स खुराड्यातील लोकांचा अवकाश व्यापून उरले आहेत, असे म्हणता येईल. बॅकड्रॉपला गिरणगावातून आज दिसणारे टोलेजंग टॉवर्स दिसतात. मुंबई शहर हे अखंड सळसळणारे चैतन्य आहे, मात्र दिग्दर्शक तो पार्श्वभागीचा अवाढव्य अजगर जाणून-बुजून निद्रिस्त ठेवतो. तो जिवंत झाला तर कदाचित खुराड्याला गिळून टाकेल. ही रचनाच एक मोठे भाष्य आहे. इथेच सानिक यांचे नेपथ्य नाट्याचा एक भाग होते. प्रेक्षकांशी संवाद साधू लागते. नियोजित ध्वनी-प्रकाशाच्या। सहाय्याने ते आपल्याशी बोलू लागते. म्हणजे पार्श्वभूमीवर सुस्त निद्रिस्त अजस्त्र शहर आणि त्या पुढे बोलके खुराडे, अशी ही अप्रतिम नेपथ्य रचना निर्वासितमध्ये योजली आहे. हॅट्स ऑफ टू टीम अभिजीत!

          स्वप्नील जाधवने एकांकिका लिहिताना परिचित वातावरणात, मर्यादित स्पेसमध्ये आहे म्हणून तीत नाट्य घडवायचा अजिबात अट्टाहास केलेला नाही, ही जमेची बाजू. त्याने प्रवेशांतील नाट्य शक्य तेवढे सटल ठेवले आहे, जे जरूरी होते. कारण निर्वासित मधील संघर्ष हा व्यक्तींमधील नाही तर तो परिस्थिती सोबत आहे. हे लक्षात घेतले नसते तर या नाट्याचा क्षणात मेलोड्रामा होऊन बसला असता. मग या साध्या, आपल्या घरात रोज घडू शकतील अशा प्रसंगांतून स्वप्नीलने एक कठीण काम सहज करून ठेवले आहे. ते म्हणजे कनेक्ट. या नाट्यातील मुख्य पात्रां सोबत प्रेक्षक चटकन कनेक्ट होतो. त्यातील मुलगा मयूर क्षणात प्रेक्षकांशी कनेक्ट करतो, जेव्हा तो घर शोधायच्या धडपडीला लागतो. काही वेळात प्रेक्षक बापही होतात, जेव्हा संतोष हसोळकर आपली हतबलता सांगू लागतात. ते तेव्हा बाहेरगावाहून मुंबईत जगण्यासाठी निर्वासित झालेल्या करोडो लोकांचे प्रतिनिधी होतात. आई हे खरं तर टिपिकल चाळीतील , कोंकणी, परिचित पात्र- पण ते सुद्धा प्रेक्षकांचे आपले होते. हे होण्यासाठी काही नेमके संवाद तो वापरतो, जसा की तिच्या तोंडी सतत असलेला बाबासाहेबांचा उल्लेख एक भाबडी श्रद्धा आहे किंवा मुलीच्या तोंडी सहज येणारा अॅट्रोसिटीचा उल्लेख, हा तारुण्यसुलभ मानसिक विद्रोह आहे. हे ती पात्रे स्वाभाविकपणे करतात. इथे सहज – साधे लेखन मोठे होते. पुढे ते जेव्हा आशयाकडे वळते तेव्हा ग्रेट होत जाते. छान, स्वप्नील जाधव!

          कलाकारांमध्ये प्रतिमा हसोळकर झालेल्या सायली बांदकरने कमाल केली आहे. या वयात जी समज, बेयरिंग पासून ते देहबोली, संवाद-विराम यातून ती दाखवते, ती लाजवाब आहे. तिचा मुलगा, ‘मयूर झालेल्या करण बेंद्रेकडे नीट पाहून ठेवा. मराठीत एकाच वेळी अभावाने सापडणारे फिजिक, रूप, समज आणि अभिनय यांचा एक अपूर्व मिलाफ मला त्याच्यात दिसतो. त्याने स्वत:ला किंवा दिग्दर्शकांनी त्याला, वेगवेगळ्या वकूबाच्या भूमिकांतून अजमावावे ही विनंती. माइल्स टू गो, करण!

या दोघांना तोलाची साथ दर्शना- प्रिया खोपकर आणि वडील- संतोष हसोळकर समजून देतात. हसोळकर कुटुंबं हे खरे वाटू लागते, जिवंतपणे वावरू लागते. त्यांच्या शेजारी एक कांबळे नावाचे चाळीतले स्टॉक कॅरेक्टर आहे जे चाळीचे चित्र पूर्ण करते.

 एका सरळसोट खुराड्यात प्रकाश योजना ती काय करता येईल? पण त्या मध्ये चार वेगवेगळी विभाजने शाम चव्हाण करतात. ते एक कुशल प्रकाश संयोजक आहेत, हे आपण वारंवार पाहत आलो आहोत, पण इथे या चतुरस्त्र विभाजनाने ते जो परिणाम साधतात, तो निव्वळ अप्रतिम आहे. फ्रेम्स बोलक्या करण्यात त्यांच्या प्रकाश योजनेचा मोठा हात आहे. या विभाजनातून त्यांनी रंगमंचावर, कोणतीही अॅक्शन नसताना, दिग्दर्शकाच्या सहाय्याने क्लायमॅक्स सिनेमेटिक केला आहे. अप्रतिम काम! 


आपण नाटकासाठी पार्श्वसंगीत हा शब्द सहज वापरतो. जो अपूर्ण आणि कित्येकदा चुकीचा ठरू शकतो. निर्वासित ला केवळ पार्श्वसंगीत दिलेले नाही, तर ध्वनि संयोजन केलेले आहे. पार्श्वभागी निद्रिस्त असलेल्या महाकाय मुंबई शहरापुढे चाळीतले खुराडे जिवंत करण्यासाठी ते अत्यावश्यक होते. अक्षय धांगट यांनी ते काम नेमके केलेले आहे, मग ती चाळीत सहसा वावरणारी मांजर असो की, मोरीतील गळका नळ असो. ते चित्र सजीव करण्याचे आपले काम चोख पार पाडतात. सारे खुराडे आपल्यासमोर जिवंतपणे  उभे करतात.

‘निर्वासित’चा शेवट अपरिहार्य आहे. तो तसा होणार, हे आपल्याला माहीत आहे. आपल्यातील सामान्य, हतबल माणसाला या व्यतिरिक्त दूसरा पर्यायच नाही. जेव्हा निर्वासित आपल्या अटळ आणि अपरिहार्य शेवटाकडे येते, तेव्हा आपण काहीसे निवांत, रीलॅक्स झालेले असतो. कथेमध्ये आता नवे काही घडणे अशक्य आहे. पण दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव यासाठी आपल्या हाती एक हुकूमाचा एक्का ठेवतो. चला संपले नाटक, असे वाटत असतानाच तो त्याच्या पोतडीतून एका मागोमाग एक दृश्यास्त्रे बाहेर काढतो. जी प्रोसिनियम आर्चची सफर आपल्याला जणू कॅमेर्‍यातून घडवून आणतात. फ्रेम आयसोलेशन आणि फ्रेम सिक्वेन्स, उत्कृष्ट मांडलेला आहे. क्षणात या दृष्यांतून ‘निर्वासित’ मोठी ऊंची गाठते. एकांकिकेबाहेरचे, कथेपेक्षा मोठे स्टेटमेंट करते. निवांत झालेले आपण पुन्हा शहारतो. अभिजीत झुंझारराव जाता-जाता, सहजपणे आपल्याला हलवून जातो.

निर्वासित'चा शेवट लेखकाने संवादातून किंवा दिग्दर्शकाने फ्रेम बांधून केलेला नाही, तर तो प्रकाशयोजनाकार शाम चव्हाण यांनी केवळ प्रकाशाच्या सहाय्याने केलेला आहे. या तंत्राने ते फ्रेम्स आयसोलेट करत सिनेमॅटिक मोंताजेस तयार करत जातात आणि अखेरचे कर्टन स्टेटमेंटदेखील प्रकाशाच्या सहाय्याने करतात. केवळ प्रकाशाच्या सहाय्याने केलेला, एवढा अफाट क्लायमॅक्स, या आधी पाहिला नव्हता. ग्रेट वर्क!



मोठ्या कलाकृतीची वीण घट्ट असते. ती आपले गारूड घेऊन येते आणि त्या गारुडातून आपल्याला बाहेर पडू देत नाही. ती आशयाचे अनेक पदर घेऊन येते. प्रतलावर आपल्याला गुंगवते आणि प्रतलाखाली एक मोठा समुद्र आहे, त्यात डोकावून पाहायला हवे अशी जाणीव देत राहते. सिडनेहम कॉलेजची टीम आणि अर्थातच त्यांचा कप्तान अभिजीत झुंझारराव असा परिपूर्ण नाट्यानुभव आपल्याला देतात. सलाम करायला लावतात. म्हणजे दर्दपोरा’, ‘दोजख आणि नंतर निर्वासित हा आशय आणि रचना दृष्ट्‍या चढता आलेखच  आहे. कीप इट अप !!

                                                                             -आभास आनंद

*******


           

Saturday, March 4, 2017

समर्थ एकांकिका स्पर्धे-निमित्ताने... 1




मर्यादित अवडंबर, प्रेक्षक, पात्रे आणि खर्च ही एकांकिका या नाट्य प्रकाराची  अध्याहृत मर्यादा आहे. तिचा फायदा असा की, एकांकिकेच्या प्रांतात वेगवेगळे प्रयोग करता येतात, धोके घेता येतात, मर्यादा प्रयोगशीलतेला जन्म देते. यामुळेच महाराष्ट्रातील एकांकिकेचा प्रवास नक्की कुठल्या दिशेने सुरू आहे, याची नोंद ठेवणे आवश्यक आहे. मुंबई आणि पुणे ही एकेकाळी एकांकिकेसाठी महत्वाची केंद्रे होती. होती अशासाठी की नाट्य दर्पण, आय.एन.टी., मृगजळ, पुरुषोत्तम आणि सवाई या मानाच्या आणि मोठ्या स्पर्धा या केंद्रावर होत. काही आजही होतात. मात्र कॉलेज सोडली तर एकांकिका करणार्‍या हौशी रंगकर्मीसाठी एकांकिका करणे कठीण होऊ लागले. अनिश्चित वेळेची मागणी करणारी नोकरी किंवा फ्री-लान्स, विस्तारीकरणात दूर-दूर पोहोचलेले कलाकार आणि एकत्र तालीम करण्यासाठी आवश्यक जागेचा अभाव, यामुळे बहुतेक एकांकिका, सुविहित सादरीकरण, या पातळीपुढे जात नाहीत. त्याला इलाज नाही. या मुळेच, या केंद्रा बाहेर एकांकिकेच्या क्षेत्रात काय घडते आहे, हे पाहण्याची संधी मिळताच ती घ्यावी अशी इच्छा झाली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सातारा केंद्रावरील समर्थ एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने हा आढावा घेता आला.

          पक्वान्नाचे भोजन करायचे, तर आधी थोडे कडू घास खावेत असे म्हणतात. तर ते आधी घेऊन टाकू. अर्ध्याहून जास्त एकांकिका मध्ये स्त्री पात्राचे काय करायचे हे समजलेले दिसले नाही. त्यांना भूमिका, मत, विचार असल्याचे दिसले नाही. आणि त्याहून भयानक म्हणजे त्यातील अर्ध्या एकांकिका मध्ये स्त्रीचे वस्तुकरण केले गेल्याचे दिसत होते. हे वस्तुकरण संहिता आणि दिग्दर्शकाची शैली, या दोन्हीमध्ये जाणवत होते. मित्रांनो आज आपल्या घरात, आजूबाजूला ज्या स्त्रिया आहेत त्या समाज रहाटीत एक महत्त्वाचा घटक आहेत. त्यांचे वस्तुकरण करू नका. अगदी बलात्कारासारखा विषय देखील रंगमंचावर  संयतपणे दाखवता येतो. त्या साठी सारी पुरुष पात्रे वखवखलेली दाखवायची गरज नाही. जेव्हा हा प्रकार आठ-दहा एकांकिका मध्ये पहायला मिळतो तेव्हा सकारण भीती वाटते की स्पर्धेत बक्षीस मिळवण्यासाठी स्त्री पात्राचा विनयभंग होणे सक्तीचे केले आहे काय? मित्रांनो, असे प्रसंग त्या एकांकिकेला इतके बटबटीत आणि ढोबळ करतात की या सर्व एकांकिका  स्पर्धेत टिकणेच अशक्य होते. याचे कारण खूप छान विषय, अनेक स्पर्धक सादर करत आहेत. तेव्हा ट्रिक्स वापरून, आपल्या जुन्या एकांकिका सटीक परफॉर्मन्स करून, जड नेपथ्य उभे करून, तंत्र सहाय्याने वगैरे मारून नेऊ, हे विसरा. खूप रडून, भावनांचा कल्लोळ करून किंवा रागावून, मोठा सोल्यूलॉक त्वेशाने रेटून फारतर अतिरंजित नाट्य निर्माण करता येते. आशय, विषय आणि सदरीकरणात ज्या एकांकिका उजव्या असतात त्यांना हे करावे लागत नाही. सबब संहिता महत्वाची. संहितेचा शोध घेत रहा.

          समर्थ एकांकिका स्पर्धेत सारे प्रयत्न जरी चांगले झाले तरी काही मोजके विशेष उल्लेखनीय प्रयोग जे कदाचित नंबरात बसले नाहीत, ते इथे नोंदवतो. नंबर ही खूप रिलेटीव गोष्ट आहे. ज्या प्रमाणे ऑस्कर मिळालेला चित्रपट उत्कृष्ट असतोच असे नाही तर तो ऑस्कर विजेता चित्रपट असतो, कलाकृती तुलना करून श्रेष्ठ ठरवता येत नाही, त्या प्रमाणेच नंबरात आलेली एकांकिका ही गुणात वरचढ ठरली, इतर एकांकिका वाईट होत्या म्हणून नव्हे, हे लक्षात घ्यायला हवे.

          या स्पर्धेमध्ये अजब-गजब मधील  छोट्या मुलांचे थक्क करणारे सादरीकरण, अनबीटनच्या टीम ने घेतलेली मेहनत, दो बजनीए मध्ये उभा केलेला काळ, कॉलगर्लमध्ये उभारलेले चोख चर्चानाट्य, दैनंदिन मालिकेप्रमाणे नीट सादर झालेली माहेर, आस एका पहाटेची मधील चमकदार कल्पना, तळ्यात-मळ्यात मधील न-नाट्य, उदक शांत मधील पात्र निवड आणि सहजता, साकव मधील सराईतपण, थेंबांचे टपालामध्ये केलेला कवितांचा वापर, सावधान- एक योग कथा मधील नीलम चव्हाणची प्रोजेक्शनची सुंदर शैली, खंडित मधील अॅबस्ट्रॅक्शनलिझमचा प्रयत्न, ती सात वर्ष मधील सत्यघटनेची मिडिया ट्रायल,  बेटर लेट दॅन नेव्हरचा पहिलटकर प्रयास, इब्तिदा मधील रिवर्स ब्रेन वॉशची अनोखी संकल्पना विशेष उल्लेखनीय. या खेरीज पौगंडावस्था, गेईजम असे विषयही स्पर्धक हाताळताना दिसले. हे आश्वासक चित्र आहे. वैयक्तिक कौतुक करत नाही कारण त्यांना पारितोषके मिळालेली आहेतच.

ज्या पाच एकांकिका टोटल परफॉर्मन्स म्हणून सादर झाल्या त्यात थोडक्यात बसू न शकलेली हेल्पिंग बडीज, सांगली यांची वरुण जाधव लिखित-दिग्दर्शित, कॉलगर्ल, एकांकिका नावात फसलेली आहे. ही  एकांकिका लिखाणात उत्कृष्ट उतरलेली आजची एक महत्वाची एकांकिका निश्चित आहे. अति नाट्याचा लवलेशही नसलेली ही एकांकिका चर्चा-नाट्य हा फॉर्म स्वीकारते आणि त्याच्याशी अखेरीपर्यंत प्रामाणिक राहते. एकांकिकेत एका कॉलगर्लचा एजंट आणि एका व्हाईट कॉलर  कॉर्पोरेट समीर यांची व्यवहारा निमित्ताने होणारी दुसरी भेट आहे. यात आमची पहिली सर्व्हिस कशी वाटली? या साध्या प्रश्नांतून चर्चा सुरू होते.  यातून समीरला कळते की हा एजंट डॉलीचा नवरा आहे. तो आतून-बाहेरून हादरतो. ज्या सहजतेने एजंट हे सांगतोय ते पाहून चिडतो. त्याचा राग करू लागतो. नैतिकतेचे प्रश्न उभे करू लागतो.  म्हणजे कॉलगर्ल्सचे एजंट असतात, ते वाईट नाही, त्यांची सर्विस तुम्ही घेता हे वाईट नाही, फक्त ती तुमची पत्नी असेल तर अत्यंत चूक आहे. पांढरपेशा नैतिकतेला याहून अधिक कोड्यात टाकून अस्वस्थ करणारी चर्चा होऊ शकत नाही.  या चर्चेत तुम्ही नपुंसक आहात का? ते तुमची पत्नी तुमच्यापासून समाधानी नाही म्हणून हे करता का? असे अनेक गॉसिपी प्रश्न येतात. समीरला एजंटची चूक सांगता येत नाही. दोघांच्या संमतीने हा व्यवसाय सुरू आहे या कल्पनेने तो हादरलेला आहे. आपली पत्नी आपल्याशी एकनिष्ठ आहे, याची त्याला खात्री आहे. ती चांगल्या कुलशीलाची स्त्री आहे. तो गोंधळलेला आहे. एजंट हा धंदा योग्य आहे, कॉलगर्ल ही सर्विस तर तो स्वत: घेतोय म्हणजे योग्य आहे. दोघांनी वेगवेगळे केले तर हे व्यवसाय ठीक आहेत, पण एकत्र केले तर? नैतिक गोंधळ उडतो आहे. नैतिक-अ नैतिकतेचे प्रश्न विचारणारा समीर स्वत:कडे कोणत्या नैतिक नजरेने पाहतो, हे समजत नाही. समीर म्हणजे तुम्ही-आम्ही सर्व आहोत. चर्चा नाट्यातील प्रश्नाचा वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, नैतिक, कायदेशीर अशा सर्व बाजूने  वेध ही एकांकिका घेते. प्रत्येक कोनातून यावर केलेल्या प्रश्नाला बिनतोड उत्तर देते आणि या  सर्वाच्या मुळाशी असलेल्या आपल्या लैंगिक नैतिकतेवर प्रश्न करते. ते देखील कोणताही आविर्भाव, आवेश, त्वेष न आणता. सहज आणि बिनतोड चर्चेतून. चर्चा संहिता, दिग्दर्शन नियंत्रण, अभिनय सहजता यातून ही एकांकिका फार वरचा दर्जा गाठते. यातील समीर या भूमिकेवर थोडा अधिक विचार केला तर एकांकिका अजून छान होईल असे वाटते.

          सातारच्या निर्मिती नाट्य-संस्थेचे शोधला शिवाजी तर... हे डॉक्टर भार्गव प्रसाद लिखित आणि  संदीप जंगम दिग्दर्शित एकांकिका पंकज काळे या अभिनेत्याने खरे तर एकहाती सामाजिक विडंबन करून ठेवली. एकांकिका सुरू झाली आणि पहिल्या मिनिटाला पंकज काळेंचा भुजंगराव...सुटला. नंतरची पस्तीस मिनिटे तो एक पंच, एक जागा, एक प्रतिक्रिया टायमिंगमध्ये चुकेल म्हणून आम्ही पाहत होतो. नाही! प्रिसीजन पर्फेक्शन आहे पंकज करत असलेला भुजंगराव म्हणजे. 

एकांकिका लेखनातून मोठी उतरली आहे. हे ही एका अर्थाने चर्चा नाटयच, लेखक आणि भुजंगराव यांच्यात ते रंगते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पावसामुळे पुढे ढकलले जाते आणि तिथेच कार्यकर्त्यांची सोय केलेल्या शाळेच्या वर्गात नाटक घडते. परगावाहून दिडशे कार्यकर्ते साहेबांच्या समारंभासाठी घेऊन आलेला भुजंगराव मात्र तिथे थेट शाळेचा ट्रस्टी असल्यागत वावरतोय. त्याचा रूबाब पाहण्यासारखा आहे आणि महाराज हे त्याचे एकमेव श्रद्धास्थान आहे. भुजंगराव आजच्या कोणत्या समाजातील कार्यकर्त्याचे प्रतिनिधित्व करतो हे वेगळे सांगायची गरज नाही. नंतर अर्धा तास लेखक लिहित असलेले महाराज आणि भुजंगरावाची समाजसेवा आणि वागणूक, याच्या द्वंद्वात हशा आणि टाळ्या फुटत राहतात. पुढे ज्युलीएटच्या रूपाने भुजंगरावाच्या स्त्री दाक्षिण्याचे प्रश्न उठतात. प्रत्येक दृष्टिकोनातून आजच्या मराठी नेतृत्वाचे  खुजेपण आणि महाराजांची भव्यता आशा विसंगतीतून हे सामाजिक विडंबन लेखक डॉक्टर भार्गव प्रसाद यांनी मांडले आहे. दिग्दर्शक संदीप जंगम याने ते चोख, वेगवान आणि स्पार्कलिंग ठेवले आहे. मेघना होशिंगची ज्युलीएट आणि स्वत: लेखकाने साकारलेला लेखक हे पंकज काळे यांना चोख साथ देतात. आजच्या काळाचे हे एक महत्वाचे विडंबन आहे, जे डोळ्यात अंजन घालण्याचे काम चोख करते.  

ही झाली  पाचापैकी राहिलेली दोन नाटके. बाकी पुढे...

-आभास आनंद