Tuesday, October 31, 2017

'निर्वासित' -एक परिपूर्ण नाट्यानुभव....


निर्वासितही एकांकिका पहायला जाण्यापूर्वी काही शंका मनात होत्या. त्या पैकी पहिली- या अभिजितला झालंय तरी काय? आधी दर्दपोरामग दोजखआणि आता निर्वासित’? हा बॉर्डरवरच का रेंगाळतोय? अर्थात हे रेंगाळणे काही सुंदर नाट्यानुभव देते आहे हे तर खरे.

निर्वासित या विषयावर आपल्याकडे कमीच काम झालेले आहे. भालेराव आदींची पुस्तके डॉक्युमेंटेशन पलिकडे जात नाहीत. या विषयावर काहीकाळ काम केलेले असल्याने उत्सुकताही होती की पाहू , हा विषय अभिजित आणि त्याची टीम कुठे नेतेय? शेवटी दिग्दर्शक हा त्याच्या टीम इतकाच चांगला असू शकतो, हे सत्य अभिजित इतके ओळखलेला जनरेशन नेक्स्ट दिग्दर्शक माझ्या पाहण्यात नाही.

उत्तुंग एकांकिका स्पर्धेत, सिडनेहम कॉलेजने केलेली, स्वप्नील जाधव लिखित एकांकिका सुरू होताच लक्षात आले की, निर्वासितहे शीर्षक गिमिकीआहे. म्हणजे दर्दपोरा- दोजख- निर्वासित? असे काही नाही. या एकांकिकेचा टोन नवा नाही, तरीही वेगळा आहे.


लेखक  स्वप्नील जाधवने निवडलेला विषय, त्याची पार्श्वभूमी, व्यक्तिरेखा, घटनासुद्धा परिचित म्हणता येतील. त्यांची भाषाही अपरिहार्यपणे कोकण-रत्नागिरी पट्ट्यातील येते. खरंतर रचनेत मेलोड्रामाकडे जाण्याचा धोका आहे, जो अर्थातच नियंत्रणात ठेवला आहे. पण या परिचित पार्श्वभूमीतून लेखक स्वप्नील जाधव, दिग्दर्शकाच्या सहयोगाने जे नाट्यात्म विधान करतो, जो आशय मांडतो/ जे भाष्य करतो, तो वरचा क्लास आहे. इथेच निर्वासित जिंकते. स्टेटमेंट आणि ट्रीटमेंट हा तिचा आत्मा आहे. या दोहोंच्या सहाय्याने जो नाट्यानुभव निर्वासितदेते, तो मोठा आहे. प्रेक्षकांनी स्वत: अनुभवण्यासारखा आहे.


मुंबईच्या चाळवजा खुराड्यात हे नाट्य घडते पण त्याच्या रचनेपासूनच अभिजित आणि टीम, कल्पकतेचे एका पाठोपाठ एक सुखद धक्के देऊ लागतात.  चाळीच्या सरळसोट खुराड्यात, विस्कळीत, अनियोजित कनिष्ठ मध्यमवर्गीय जगण्याचे जे तपशील भरलेले आहेत, ते कमाल आहेत. अगदी चाळीतील खोल्यांतून आज दिसू लागलेल्या लॅपटॉप ते वॉटर फिल्टरपर्यंत. या घरातील रंग उडालेल्या भिंती, दारे, टेबल, ओटा, सोफा अगदी स्वीचबोर्डसुद्धा, हे त्या घराचे अविभाज्य भाग झालेत. खुराड्याचा बाह्य जगातील प्रगतीशी संबंध नाही. पण ते त्याच आसमंतात जगते आहे, म्हणून तो असणे नाटकाच्या दृष्टीने आवश्यक आहे. यासाठी घराच्या भिंतींना स्कायलाइन कट्स देण्याची कल्पना मस्तच आहे. ती स्कायलाइन धरली तर पाठीमागे दिसणारे अवाढव्य टॉवर्स खुराड्यातील लोकांचा अवकाश व्यापून उरले आहेत, असे म्हणता येईल. बॅकड्रॉपला गिरणगावातून आज दिसणारे टोलेजंग टॉवर्स दिसतात. मुंबई शहर हे अखंड सळसळणारे चैतन्य आहे, मात्र दिग्दर्शक तो पार्श्वभागीचा अवाढव्य अजगर जाणून-बुजून निद्रिस्त ठेवतो. तो जिवंत झाला तर कदाचित खुराड्याला गिळून टाकेल. ही रचनाच एक मोठे भाष्य आहे. इथेच सानिक यांचे नेपथ्य नाट्याचा एक भाग होते. प्रेक्षकांशी संवाद साधू लागते. नियोजित ध्वनी-प्रकाशाच्या। सहाय्याने ते आपल्याशी बोलू लागते. म्हणजे पार्श्वभूमीवर सुस्त निद्रिस्त अजस्त्र शहर आणि त्या पुढे बोलके खुराडे, अशी ही अप्रतिम नेपथ्य रचना निर्वासितमध्ये योजली आहे. हॅट्स ऑफ टू टीम अभिजीत!

          स्वप्नील जाधवने एकांकिका लिहिताना परिचित वातावरणात, मर्यादित स्पेसमध्ये आहे म्हणून तीत नाट्य घडवायचा अजिबात अट्टाहास केलेला नाही, ही जमेची बाजू. त्याने प्रवेशांतील नाट्य शक्य तेवढे सटल ठेवले आहे, जे जरूरी होते. कारण निर्वासित मधील संघर्ष हा व्यक्तींमधील नाही तर तो परिस्थिती सोबत आहे. हे लक्षात घेतले नसते तर या नाट्याचा क्षणात मेलोड्रामा होऊन बसला असता. मग या साध्या, आपल्या घरात रोज घडू शकतील अशा प्रसंगांतून स्वप्नीलने एक कठीण काम सहज करून ठेवले आहे. ते म्हणजे कनेक्ट. या नाट्यातील मुख्य पात्रां सोबत प्रेक्षक चटकन कनेक्ट होतो. त्यातील मुलगा मयूर क्षणात प्रेक्षकांशी कनेक्ट करतो, जेव्हा तो घर शोधायच्या धडपडीला लागतो. काही वेळात प्रेक्षक बापही होतात, जेव्हा संतोष हसोळकर आपली हतबलता सांगू लागतात. ते तेव्हा बाहेरगावाहून मुंबईत जगण्यासाठी निर्वासित झालेल्या करोडो लोकांचे प्रतिनिधी होतात. आई हे खरं तर टिपिकल चाळीतील , कोंकणी, परिचित पात्र- पण ते सुद्धा प्रेक्षकांचे आपले होते. हे होण्यासाठी काही नेमके संवाद तो वापरतो, जसा की तिच्या तोंडी सतत असलेला बाबासाहेबांचा उल्लेख एक भाबडी श्रद्धा आहे किंवा मुलीच्या तोंडी सहज येणारा अॅट्रोसिटीचा उल्लेख, हा तारुण्यसुलभ मानसिक विद्रोह आहे. हे ती पात्रे स्वाभाविकपणे करतात. इथे सहज – साधे लेखन मोठे होते. पुढे ते जेव्हा आशयाकडे वळते तेव्हा ग्रेट होत जाते. छान, स्वप्नील जाधव!

          कलाकारांमध्ये प्रतिमा हसोळकर झालेल्या सायली बांदकरने कमाल केली आहे. या वयात जी समज, बेयरिंग पासून ते देहबोली, संवाद-विराम यातून ती दाखवते, ती लाजवाब आहे. तिचा मुलगा, ‘मयूर झालेल्या करण बेंद्रेकडे नीट पाहून ठेवा. मराठीत एकाच वेळी अभावाने सापडणारे फिजिक, रूप, समज आणि अभिनय यांचा एक अपूर्व मिलाफ मला त्याच्यात दिसतो. त्याने स्वत:ला किंवा दिग्दर्शकांनी त्याला, वेगवेगळ्या वकूबाच्या भूमिकांतून अजमावावे ही विनंती. माइल्स टू गो, करण!

या दोघांना तोलाची साथ दर्शना- प्रिया खोपकर आणि वडील- संतोष हसोळकर समजून देतात. हसोळकर कुटुंबं हे खरे वाटू लागते, जिवंतपणे वावरू लागते. त्यांच्या शेजारी एक कांबळे नावाचे चाळीतले स्टॉक कॅरेक्टर आहे जे चाळीचे चित्र पूर्ण करते.

 एका सरळसोट खुराड्यात प्रकाश योजना ती काय करता येईल? पण त्या मध्ये चार वेगवेगळी विभाजने शाम चव्हाण करतात. ते एक कुशल प्रकाश संयोजक आहेत, हे आपण वारंवार पाहत आलो आहोत, पण इथे या चतुरस्त्र विभाजनाने ते जो परिणाम साधतात, तो निव्वळ अप्रतिम आहे. फ्रेम्स बोलक्या करण्यात त्यांच्या प्रकाश योजनेचा मोठा हात आहे. या विभाजनातून त्यांनी रंगमंचावर, कोणतीही अॅक्शन नसताना, दिग्दर्शकाच्या सहाय्याने क्लायमॅक्स सिनेमेटिक केला आहे. अप्रतिम काम! 


आपण नाटकासाठी पार्श्वसंगीत हा शब्द सहज वापरतो. जो अपूर्ण आणि कित्येकदा चुकीचा ठरू शकतो. निर्वासित ला केवळ पार्श्वसंगीत दिलेले नाही, तर ध्वनि संयोजन केलेले आहे. पार्श्वभागी निद्रिस्त असलेल्या महाकाय मुंबई शहरापुढे चाळीतले खुराडे जिवंत करण्यासाठी ते अत्यावश्यक होते. अक्षय धांगट यांनी ते काम नेमके केलेले आहे, मग ती चाळीत सहसा वावरणारी मांजर असो की, मोरीतील गळका नळ असो. ते चित्र सजीव करण्याचे आपले काम चोख पार पाडतात. सारे खुराडे आपल्यासमोर जिवंतपणे  उभे करतात.

‘निर्वासित’चा शेवट अपरिहार्य आहे. तो तसा होणार, हे आपल्याला माहीत आहे. आपल्यातील सामान्य, हतबल माणसाला या व्यतिरिक्त दूसरा पर्यायच नाही. जेव्हा निर्वासित आपल्या अटळ आणि अपरिहार्य शेवटाकडे येते, तेव्हा आपण काहीसे निवांत, रीलॅक्स झालेले असतो. कथेमध्ये आता नवे काही घडणे अशक्य आहे. पण दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव यासाठी आपल्या हाती एक हुकूमाचा एक्का ठेवतो. चला संपले नाटक, असे वाटत असतानाच तो त्याच्या पोतडीतून एका मागोमाग एक दृश्यास्त्रे बाहेर काढतो. जी प्रोसिनियम आर्चची सफर आपल्याला जणू कॅमेर्‍यातून घडवून आणतात. फ्रेम आयसोलेशन आणि फ्रेम सिक्वेन्स, उत्कृष्ट मांडलेला आहे. क्षणात या दृष्यांतून ‘निर्वासित’ मोठी ऊंची गाठते. एकांकिकेबाहेरचे, कथेपेक्षा मोठे स्टेटमेंट करते. निवांत झालेले आपण पुन्हा शहारतो. अभिजीत झुंझारराव जाता-जाता, सहजपणे आपल्याला हलवून जातो.

निर्वासित'चा शेवट लेखकाने संवादातून किंवा दिग्दर्शकाने फ्रेम बांधून केलेला नाही, तर तो प्रकाशयोजनाकार शाम चव्हाण यांनी केवळ प्रकाशाच्या सहाय्याने केलेला आहे. या तंत्राने ते फ्रेम्स आयसोलेट करत सिनेमॅटिक मोंताजेस तयार करत जातात आणि अखेरचे कर्टन स्टेटमेंटदेखील प्रकाशाच्या सहाय्याने करतात. केवळ प्रकाशाच्या सहाय्याने केलेला, एवढा अफाट क्लायमॅक्स, या आधी पाहिला नव्हता. ग्रेट वर्क!



मोठ्या कलाकृतीची वीण घट्ट असते. ती आपले गारूड घेऊन येते आणि त्या गारुडातून आपल्याला बाहेर पडू देत नाही. ती आशयाचे अनेक पदर घेऊन येते. प्रतलावर आपल्याला गुंगवते आणि प्रतलाखाली एक मोठा समुद्र आहे, त्यात डोकावून पाहायला हवे अशी जाणीव देत राहते. सिडनेहम कॉलेजची टीम आणि अर्थातच त्यांचा कप्तान अभिजीत झुंझारराव असा परिपूर्ण नाट्यानुभव आपल्याला देतात. सलाम करायला लावतात. म्हणजे दर्दपोरा’, ‘दोजख आणि नंतर निर्वासित हा आशय आणि रचना दृष्ट्‍या चढता आलेखच  आहे. कीप इट अप !!

                                                                             -आभास आनंद

*******


           

Saturday, March 4, 2017

समर्थ एकांकिका स्पर्धे-निमित्ताने... 1




मर्यादित अवडंबर, प्रेक्षक, पात्रे आणि खर्च ही एकांकिका या नाट्य प्रकाराची  अध्याहृत मर्यादा आहे. तिचा फायदा असा की, एकांकिकेच्या प्रांतात वेगवेगळे प्रयोग करता येतात, धोके घेता येतात, मर्यादा प्रयोगशीलतेला जन्म देते. यामुळेच महाराष्ट्रातील एकांकिकेचा प्रवास नक्की कुठल्या दिशेने सुरू आहे, याची नोंद ठेवणे आवश्यक आहे. मुंबई आणि पुणे ही एकेकाळी एकांकिकेसाठी महत्वाची केंद्रे होती. होती अशासाठी की नाट्य दर्पण, आय.एन.टी., मृगजळ, पुरुषोत्तम आणि सवाई या मानाच्या आणि मोठ्या स्पर्धा या केंद्रावर होत. काही आजही होतात. मात्र कॉलेज सोडली तर एकांकिका करणार्‍या हौशी रंगकर्मीसाठी एकांकिका करणे कठीण होऊ लागले. अनिश्चित वेळेची मागणी करणारी नोकरी किंवा फ्री-लान्स, विस्तारीकरणात दूर-दूर पोहोचलेले कलाकार आणि एकत्र तालीम करण्यासाठी आवश्यक जागेचा अभाव, यामुळे बहुतेक एकांकिका, सुविहित सादरीकरण, या पातळीपुढे जात नाहीत. त्याला इलाज नाही. या मुळेच, या केंद्रा बाहेर एकांकिकेच्या क्षेत्रात काय घडते आहे, हे पाहण्याची संधी मिळताच ती घ्यावी अशी इच्छा झाली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सातारा केंद्रावरील समर्थ एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने हा आढावा घेता आला.

          पक्वान्नाचे भोजन करायचे, तर आधी थोडे कडू घास खावेत असे म्हणतात. तर ते आधी घेऊन टाकू. अर्ध्याहून जास्त एकांकिका मध्ये स्त्री पात्राचे काय करायचे हे समजलेले दिसले नाही. त्यांना भूमिका, मत, विचार असल्याचे दिसले नाही. आणि त्याहून भयानक म्हणजे त्यातील अर्ध्या एकांकिका मध्ये स्त्रीचे वस्तुकरण केले गेल्याचे दिसत होते. हे वस्तुकरण संहिता आणि दिग्दर्शकाची शैली, या दोन्हीमध्ये जाणवत होते. मित्रांनो आज आपल्या घरात, आजूबाजूला ज्या स्त्रिया आहेत त्या समाज रहाटीत एक महत्त्वाचा घटक आहेत. त्यांचे वस्तुकरण करू नका. अगदी बलात्कारासारखा विषय देखील रंगमंचावर  संयतपणे दाखवता येतो. त्या साठी सारी पुरुष पात्रे वखवखलेली दाखवायची गरज नाही. जेव्हा हा प्रकार आठ-दहा एकांकिका मध्ये पहायला मिळतो तेव्हा सकारण भीती वाटते की स्पर्धेत बक्षीस मिळवण्यासाठी स्त्री पात्राचा विनयभंग होणे सक्तीचे केले आहे काय? मित्रांनो, असे प्रसंग त्या एकांकिकेला इतके बटबटीत आणि ढोबळ करतात की या सर्व एकांकिका  स्पर्धेत टिकणेच अशक्य होते. याचे कारण खूप छान विषय, अनेक स्पर्धक सादर करत आहेत. तेव्हा ट्रिक्स वापरून, आपल्या जुन्या एकांकिका सटीक परफॉर्मन्स करून, जड नेपथ्य उभे करून, तंत्र सहाय्याने वगैरे मारून नेऊ, हे विसरा. खूप रडून, भावनांचा कल्लोळ करून किंवा रागावून, मोठा सोल्यूलॉक त्वेशाने रेटून फारतर अतिरंजित नाट्य निर्माण करता येते. आशय, विषय आणि सदरीकरणात ज्या एकांकिका उजव्या असतात त्यांना हे करावे लागत नाही. सबब संहिता महत्वाची. संहितेचा शोध घेत रहा.

          समर्थ एकांकिका स्पर्धेत सारे प्रयत्न जरी चांगले झाले तरी काही मोजके विशेष उल्लेखनीय प्रयोग जे कदाचित नंबरात बसले नाहीत, ते इथे नोंदवतो. नंबर ही खूप रिलेटीव गोष्ट आहे. ज्या प्रमाणे ऑस्कर मिळालेला चित्रपट उत्कृष्ट असतोच असे नाही तर तो ऑस्कर विजेता चित्रपट असतो, कलाकृती तुलना करून श्रेष्ठ ठरवता येत नाही, त्या प्रमाणेच नंबरात आलेली एकांकिका ही गुणात वरचढ ठरली, इतर एकांकिका वाईट होत्या म्हणून नव्हे, हे लक्षात घ्यायला हवे.

          या स्पर्धेमध्ये अजब-गजब मधील  छोट्या मुलांचे थक्क करणारे सादरीकरण, अनबीटनच्या टीम ने घेतलेली मेहनत, दो बजनीए मध्ये उभा केलेला काळ, कॉलगर्लमध्ये उभारलेले चोख चर्चानाट्य, दैनंदिन मालिकेप्रमाणे नीट सादर झालेली माहेर, आस एका पहाटेची मधील चमकदार कल्पना, तळ्यात-मळ्यात मधील न-नाट्य, उदक शांत मधील पात्र निवड आणि सहजता, साकव मधील सराईतपण, थेंबांचे टपालामध्ये केलेला कवितांचा वापर, सावधान- एक योग कथा मधील नीलम चव्हाणची प्रोजेक्शनची सुंदर शैली, खंडित मधील अॅबस्ट्रॅक्शनलिझमचा प्रयत्न, ती सात वर्ष मधील सत्यघटनेची मिडिया ट्रायल,  बेटर लेट दॅन नेव्हरचा पहिलटकर प्रयास, इब्तिदा मधील रिवर्स ब्रेन वॉशची अनोखी संकल्पना विशेष उल्लेखनीय. या खेरीज पौगंडावस्था, गेईजम असे विषयही स्पर्धक हाताळताना दिसले. हे आश्वासक चित्र आहे. वैयक्तिक कौतुक करत नाही कारण त्यांना पारितोषके मिळालेली आहेतच.

ज्या पाच एकांकिका टोटल परफॉर्मन्स म्हणून सादर झाल्या त्यात थोडक्यात बसू न शकलेली हेल्पिंग बडीज, सांगली यांची वरुण जाधव लिखित-दिग्दर्शित, कॉलगर्ल, एकांकिका नावात फसलेली आहे. ही  एकांकिका लिखाणात उत्कृष्ट उतरलेली आजची एक महत्वाची एकांकिका निश्चित आहे. अति नाट्याचा लवलेशही नसलेली ही एकांकिका चर्चा-नाट्य हा फॉर्म स्वीकारते आणि त्याच्याशी अखेरीपर्यंत प्रामाणिक राहते. एकांकिकेत एका कॉलगर्लचा एजंट आणि एका व्हाईट कॉलर  कॉर्पोरेट समीर यांची व्यवहारा निमित्ताने होणारी दुसरी भेट आहे. यात आमची पहिली सर्व्हिस कशी वाटली? या साध्या प्रश्नांतून चर्चा सुरू होते.  यातून समीरला कळते की हा एजंट डॉलीचा नवरा आहे. तो आतून-बाहेरून हादरतो. ज्या सहजतेने एजंट हे सांगतोय ते पाहून चिडतो. त्याचा राग करू लागतो. नैतिकतेचे प्रश्न उभे करू लागतो.  म्हणजे कॉलगर्ल्सचे एजंट असतात, ते वाईट नाही, त्यांची सर्विस तुम्ही घेता हे वाईट नाही, फक्त ती तुमची पत्नी असेल तर अत्यंत चूक आहे. पांढरपेशा नैतिकतेला याहून अधिक कोड्यात टाकून अस्वस्थ करणारी चर्चा होऊ शकत नाही.  या चर्चेत तुम्ही नपुंसक आहात का? ते तुमची पत्नी तुमच्यापासून समाधानी नाही म्हणून हे करता का? असे अनेक गॉसिपी प्रश्न येतात. समीरला एजंटची चूक सांगता येत नाही. दोघांच्या संमतीने हा व्यवसाय सुरू आहे या कल्पनेने तो हादरलेला आहे. आपली पत्नी आपल्याशी एकनिष्ठ आहे, याची त्याला खात्री आहे. ती चांगल्या कुलशीलाची स्त्री आहे. तो गोंधळलेला आहे. एजंट हा धंदा योग्य आहे, कॉलगर्ल ही सर्विस तर तो स्वत: घेतोय म्हणजे योग्य आहे. दोघांनी वेगवेगळे केले तर हे व्यवसाय ठीक आहेत, पण एकत्र केले तर? नैतिक गोंधळ उडतो आहे. नैतिक-अ नैतिकतेचे प्रश्न विचारणारा समीर स्वत:कडे कोणत्या नैतिक नजरेने पाहतो, हे समजत नाही. समीर म्हणजे तुम्ही-आम्ही सर्व आहोत. चर्चा नाट्यातील प्रश्नाचा वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, नैतिक, कायदेशीर अशा सर्व बाजूने  वेध ही एकांकिका घेते. प्रत्येक कोनातून यावर केलेल्या प्रश्नाला बिनतोड उत्तर देते आणि या  सर्वाच्या मुळाशी असलेल्या आपल्या लैंगिक नैतिकतेवर प्रश्न करते. ते देखील कोणताही आविर्भाव, आवेश, त्वेष न आणता. सहज आणि बिनतोड चर्चेतून. चर्चा संहिता, दिग्दर्शन नियंत्रण, अभिनय सहजता यातून ही एकांकिका फार वरचा दर्जा गाठते. यातील समीर या भूमिकेवर थोडा अधिक विचार केला तर एकांकिका अजून छान होईल असे वाटते.

          सातारच्या निर्मिती नाट्य-संस्थेचे शोधला शिवाजी तर... हे डॉक्टर भार्गव प्रसाद लिखित आणि  संदीप जंगम दिग्दर्शित एकांकिका पंकज काळे या अभिनेत्याने खरे तर एकहाती सामाजिक विडंबन करून ठेवली. एकांकिका सुरू झाली आणि पहिल्या मिनिटाला पंकज काळेंचा भुजंगराव...सुटला. नंतरची पस्तीस मिनिटे तो एक पंच, एक जागा, एक प्रतिक्रिया टायमिंगमध्ये चुकेल म्हणून आम्ही पाहत होतो. नाही! प्रिसीजन पर्फेक्शन आहे पंकज करत असलेला भुजंगराव म्हणजे. 

एकांकिका लेखनातून मोठी उतरली आहे. हे ही एका अर्थाने चर्चा नाटयच, लेखक आणि भुजंगराव यांच्यात ते रंगते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पावसामुळे पुढे ढकलले जाते आणि तिथेच कार्यकर्त्यांची सोय केलेल्या शाळेच्या वर्गात नाटक घडते. परगावाहून दिडशे कार्यकर्ते साहेबांच्या समारंभासाठी घेऊन आलेला भुजंगराव मात्र तिथे थेट शाळेचा ट्रस्टी असल्यागत वावरतोय. त्याचा रूबाब पाहण्यासारखा आहे आणि महाराज हे त्याचे एकमेव श्रद्धास्थान आहे. भुजंगराव आजच्या कोणत्या समाजातील कार्यकर्त्याचे प्रतिनिधित्व करतो हे वेगळे सांगायची गरज नाही. नंतर अर्धा तास लेखक लिहित असलेले महाराज आणि भुजंगरावाची समाजसेवा आणि वागणूक, याच्या द्वंद्वात हशा आणि टाळ्या फुटत राहतात. पुढे ज्युलीएटच्या रूपाने भुजंगरावाच्या स्त्री दाक्षिण्याचे प्रश्न उठतात. प्रत्येक दृष्टिकोनातून आजच्या मराठी नेतृत्वाचे  खुजेपण आणि महाराजांची भव्यता आशा विसंगतीतून हे सामाजिक विडंबन लेखक डॉक्टर भार्गव प्रसाद यांनी मांडले आहे. दिग्दर्शक संदीप जंगम याने ते चोख, वेगवान आणि स्पार्कलिंग ठेवले आहे. मेघना होशिंगची ज्युलीएट आणि स्वत: लेखकाने साकारलेला लेखक हे पंकज काळे यांना चोख साथ देतात. आजच्या काळाचे हे एक महत्वाचे विडंबन आहे, जे डोळ्यात अंजन घालण्याचे काम चोख करते.  

ही झाली  पाचापैकी राहिलेली दोन नाटके. बाकी पुढे...

-आभास आनंद

Wednesday, March 1, 2017

करता नीट, की घालू जाकिट !?


माझे आणि सातार्‍याचे तसे बालपणापासूनचे नाते आहे. मात्र मी सातारला पहिल्यांदा परवाच गेलो.  आता ही काय भानगड आहे? कुणाची नक्कल करत नाही कल्ला नको. 
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, सातारा शाखेतर्फे आयोजित, राज्यस्तरीय समर्थ एकांकिका स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून, परिषदेचे कार्यवाह राजेशजी मोरे यांनी विचारणा केली आणि सोबत कोण आहे? हे विचारल्यावर आशीर्वाद मराठे हे मित्रच आहेत असे समजल्यावर त्वरित होकार दिला. कारण माझे आणि सातार्‍याचे बालपणापासून नाते आहेच.

आम्हा बोरिवलीकर चोगले हायस्कूलाईटसच्या जडण-घडणीत सातारा फार महत्वाचे आहेच. कारण आमचे लाडके पवार मास्तर. शिस्त, खेळ, अभ्यास, धाक आणि प्रेम सारे एकाच वेळी या सरांनी दिले. मुख्य म्हणजे त्यांचा सातारी लेझिम, जो मुंबईतील अनेक शाळांमध्ये नंतर खेळला जाऊ लागला. निवृत्त झाल्यावर सर भायखळा सोडून सातारला राहायला गेले. दोन-चारदा फोनवर बोलणे झाले. ते सातार्‍याला बोलावत होते, तो योग आला नाही. त्या आधीच ते गेले. म्हणूनच राजेशजींचा फोन आल्यावर मी लगेच होकार दिला.

          आशीर्वाद आणि मी जुजबी बोलणे केले की परीक्षक त्रुटी नेमक्या कशा होत असतील? बायस असतो तो कसा काढावा? गुणांकन पद्धती कटाक्षाने का पाळली जात नाही? कमीत कमी त्रुटी असलेला निकाल लावू शकू काय? मग आम्ही गुणांकन कसे करायचे, याची वर्गवारी केली. यात  पन्नास टक्के  संहिता, आशय, विषय आणि सादरि‍करणाचे वेगळे गुण असावेत असा विचार केला. उरलेले पन्नास टक्के अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश, पार्श्वसंगीत असे विभागायचे ठरवले. परीक्षक पक्षपातीपणा टाळायचा तर मा‍झ्या ओळखीचा स्पर्धक आल्यास त्या सादरि‍करणावर आशीर्वादने त्याचे विश्लेषण द्यायचे आणि त्याचा आल्यास माझी टिपणे नीट विचारात घ्यायची असे ठरले. असे करण्यासाठी मूळ एक प्रांजळपणा हवा की, अमुक एक स्पर्धक आपल्या स्नेहात आहे. सहसा स्पर्धेच्या निकालात ८०-९० टक्के सहमती असतेच, कारण नाट्याचे मूलभूत नियम आणि निकष वेगळे असत नाहीत. तरीही दरवेळी स्पर्धेसाठी परिक्षण करताना नव्या अडचणी येतात आणि नव्याने विचार करावा लागतो. या स्पर्धेत  अभिनय, तंत्र यांचा वापर टाळणारी एकांकिका गुणांकात कशी बसवायची ही एक समस्या आली. आणि घटना प्रधान नाटक, मेलोड्रामा, तंत्रातील सफाई हे एकांकिकेच्या यशाचे कारण राहू नये म्हणून आशय-विषय-सादरीकरण यांचे वेगळे गुण ठेवले. तरीही न-नाट्य, अॅब्सर्ड, अॅबस्ट्रॅक्ट, पोस्ट मॉडर्न किंवा देशीवादी या सोबतच एखादे फार्सीकल, वास्तववादी अथवा लोकनाट्य  असे विविध जॉनर्स कुणावरही अन्याय होऊ न देता कसे जोखायचे, याचे उत्तर सापडलेले नाही. मुळात परीक्षकाला या सर्व जॉनर्सबद्धल आस्था असायला हवी म्हणजे उपदेशामृत, संदेश वगैरे व्यर्थ अपेक्षा राहणार नाहीत किंवा प्रायोगिक, मातीतले  करतोय म्हणजे काहीतरी थोर, असे दडपण राहणार नाही, असाही विचार आला.

राजर्षि शाहू नाट्यगृहात दुपारी तीनला पोहोचलो तेव्हा आम्हाला पाहून आयोजक मंडळी शंकित दिसली. असे पिकनिकला निघाल्यासारखे, हसणारे- खिदळणारे आणि सतत भंकस सुरू असलेले हे लोक परीक्षक आहेत की गोव्याला पिकनिकला निघलेले चुकून इथे आलेत? असा संशय आयोजकांच्या मनात आला असेल. या वेळी यांना बोलावून ही चूक केली, पुन्हा नीट पडताळणी करूनच परीक्षक नेमावा, असे काहीसे त्यांच्या चर्चेत झाले असावे हे त्यांच्या माना आणि नजरा पाहून लक्षात येत होते. त्यांच्या माइम वरून आम्ही त्यांचे संभाषण वर्क केले. ते साधारण असे:
“मुख्य म्हणजे या लोकांनी जाकिट घातलेले नाही. मग हे परीक्षक कसे?”
एकमेव बुजुर्ग, प्रभुणे मास्तर म्हणाले असावेत.   
राजेश, परीक्षक नेमताना किमान त्यांची मॅच्युरीटी तपासायला हवी होतीस.” कुलकर्णी सर.
“ अहो, हे फोनवर बोलताना चांगले गंभीर वाटले हो! म्हणून नेमले! आता मला काय माहीत हे असे निघतील!” राजेशजी यांची कुरकुर.
“बरं नाही घातलं जाकिट तर हरकत नाही, पण निदान गंभीरपणा नको? स्पर्धक हसतील, हे असे परीक्षक पाहून.” एक कार्यकर्ता सातार गडी.
“हे शिकाऊ परीक्षक असावेत. यांच्या हाती स्पर्धा म्हणजे सब राम भरोसे!” प्रभुणे मास्तर.
“शिकाऊ असू देत, विकाऊ नसले म्हणजे झाले.” कुलकर्णी सरांचे लॉजिक.

राजेशजी जरा गंभीरच झाले होते. कारण प्रश्न त्यांच्या निवडीचा होता. त्यांनी एक गृहस्थ आमच्यावर पाळत ठेवायला सोडून दिला. या गृहस्थांचे नाव आम्ही ठेवले, “ए ! आपण चहा घ्यायचा?” उर्फ माटे. हे गृहस्थ आमच्यावर स्पाईंग करत असावेत असा आमचा संशय आहे, कारण रात्री दोन वाजता देखील ते,
“ए ! आपण चहा घ्यायचा?” तितक्याच सहजतेने उच्चारत. उस पट्टयातला हा सातारी चहा कमालीचा गोड असे. यावरून आम्हाला चार दिवस पोसून निकाल के दिन, कत्तल की रात करतील का ? अशी भीतीही वाटली. एकंदर आम्ही आयोजकांना आणि ते आमच्या कुवतीला घाबरले होते असे वाटते. घाबरले नव्हते, ते फक्त स्पर्धक. बर्म्युडा घालून गोव्याला निघलेला परीक्षक आपली एकांकिका बर्म्युडा त्रिकोणात  बुडवणार नाही, अशी खात्री कदाचित त्यांना वाटली असेल. परिषदेचे चिटणीस सर आम्हाला म्हणाले, काही काळजी करू नका. निर्धास्त निकाल द्या. आयोजक कोणतीही सूचना, विनंती वगैरे करणार नाहीत याची मी हमी देतो. ते आयोजकांची हमी देत होते. आमच्या हमीचे काय? परीक्षक हा तसा रोजगार हमी योजनेवर निघलेला रंगकर्मीच! त्याची हमी कोण देणार?  ती आमची आम्हाला सिद्ध करावी लागणार होती.

“घाबरू नको! मी दोन जाकिट्स घेऊन आलोय!” आशीर्वाद कानात कुजबुजला.
अरे, माझा वेगळा प्रॉब्लेम आहे. मी जाकिट घातले की कल्हईवाला वाटतो. मागे शाळेच्या गॅदरिंगमध्ये मी कल्हईवाला बनलो होतो, तो जाकिट कृपेनेच.”
“तुझी शाळा मला एकदा तपासायला पाहिजे. हे असलं प्रॉडक्ट काढले ते शिक्षक धन्य!”
“ते पवार मास्तर. सातारचेच होते.”
इथल्या मातीने माती खाल्ली असे काहीतरी आशीर्वाद कुजबुजला. भास असेल.
“ अच्छा! मग यांचा डाऊट फार वाढला, तर आपण सरळ जाकिट घालू आणि सेफ होऊ!” मी
“ बर्म्युडावर जाकिट!” आशीर्वाद इतक्या मोठयाने किंचाळला की माटे आमच्याकडे धावले.
“ए ! आपण चहा घ्यायचा?”
नाही म्हणण्याचा सातार्‍यात प्रश्न नसतो आणि पद्धतही नसते.

“हे बघ आशीर्वाद, स्पर्धक जर आपली अगदीच किंमत करत नाहीत, असे वाटले, तर आपण जाकिटस् चढवू आणि प्रस्थापित परीक्षक होऊ. कसे वाटते?”
“मला वेगळीच भीती आहे. आपण असे आहोत हे पाहून स्पर्धकांनी सादरि‍करणाची लेव्हल आपल्याशी बरोबरी, म्हणून खाली आणली  तर?”  
“घाबरू नको! तसे वाटले की तू दम दे, करता नीट, की घालू जाकिट!?’ की झालं!”
“जाकिटस रेमंडची आहेत. ती तुझ्या नसलेल्या स्टेटसला लेव्हलवर आणतील.” आशीर्वादने भरोसा दिला. मा‍झ्या नजरेसमोर रेमंड मधील कल्हईवाला अशी दृश्ये तरळली.

 राजेशजींनी सेफ साईड म्हणून आता आम्हाला दोन तरुण किंवा लहान म्हणू आयोजकांच्या ताब्यात दिले. एक त्यांचा मुलगा, आदित्य मोरे. दुसरी जिला मी छोटी ताई म्हणत होतो ती, मेघना होशिंग. मेघना कमालीची अभिनेत्री आहे हे मला नंतर, त्यांची एकांकिका सादर झाली, तेव्हा कळले. ही दोन्ही मुले कर्तव्य दक्ष होती. प्रत्येक काम वेळेत, न चुकता आणि  अगत्याने, ते ही चार दिवस, सतत!
  सातार्‍यातील मुलांनी सादर केलेले सुंदर बालनाट्य- अजब-गजब.

तिथून पुढे चार दिवस फक्त नाटक जगलो. दुपारी दोन ते पहिल्या दिवशी रात्री तीन, मग चार आणि शेवटी चक्क पहाटे सहापर्यंत हा नाट्य सोहळा सुरू होता. यातच राजेशजींनी निकालाआधी घरी नेऊन जेवू घातले. मस्त शाकाहारी बेत, काम चांगले केले या अर्थी असावा. आणि जर निकालात काही भंकसबाजी केलीत तर... म्हणू भिंतीवर ब्रिटीश कालीन बंदुका होत्या! राजेशजी जावळीच्या मोर्‍यांचे वंशज. त्यांच्या धर्मपत्नी डॉक्टर आहेत राजेशजींसारख्याच आग्रही. चार दिवस या सर्वांनी आमची घरच्यासारखी बडदास्त ठेवली. स्नेह संबंध असे जमले की परत आल्यावर दोन दिवस चुकल्यासारखे वाटत होते.    

 स्पर्धेत एकंदर चाळीस एकांकिका सादर झाल्या. सर्व चांगल्या होत्या. मला एक रजनीकांत अॅक्ट फार आवडला. त्याचा लेखक, दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता रजनीकांतच होता.
“याला बक्षीस दिल्याखेरीज मी राहणार नाही!” असे मी म्हणत होतो. यावर आशीर्वादने,
“स्पर्धेला, मोठ्या ठिकाणी जाऊन असं करू नये. अगदी तुला रजनी थलाईवा वाटत असला तरी.” वगैरे समजावलं. माझा हीरमोड झाला. रजनी करतो तीच फक्त खरी अॅक्टिंग बाकी सारे पुरू राजकुमार, असे माझे स्पष्ट मत आहे. प्रत्यक्षात कुठल्याही स्पर्धेत पुरुष अभिनयाचे पारितोषिक निश्चित करताना ज्याम वांदे होतात. मिमिक्रीपेक्षा स्टाईलाइज्ड अॅक्टिंग कधीही उजवी. रजनी ग्रेट आहे. माझा हा रजनी ज्वर उतरावा म्हणून आशीर्वादने सरळ जाकिट घालणे सुरू केले. काय करेल, त्याचीही मजबूरी होती. हा बर्म्युडातील व्हिमजिकल माणूस खरेच रजनीचे नाटक पहिले आणेल अशी भीती त्याला वाटली असेल. त्याने जाकिट घातल्यामुळे त्याचा एकदम दबदबा निर्माण झाला. स्पर्धक, आयोजक वगैरे त्याचीच विचारपूस करू लागले. मी असिस्टंटसारखा फक्त त्याच्या सोबत (बर्म्युडात) होतो.


अंतिम निकाल लावताना वैयक्तिक, तंत्रादी गुणांकन प्रथम तपासून पारितोषिक निश्चित करावे आणि नंतर उलट्या क्रमाने तिसरे, दुसरे आणि पहिले नाटक निवडावे, असे ठरवले होते, त्याप्रमाणे केले. यामुळे अभिनयादी आणि तांत्रिक पारितोषके सर्वाधिक मिळवणार्‍या संघाचे स्थान निश्चित होऊन ते हलणार नाही. मात्र आशय-विषय- सादरीकरण यांचा विचार करून शेवटी विजेता ठरवला जावा, म्हणजे निकाल सर्व बाजूंचा विचार होऊन लागेल, असे ठरवले आणि केले. यामुळे चाळीस पैकी एकूण अठरा संघांना वैयक्तिक गुणवत्तेनुसार सन्मानित केले गेले. आम्ही जरी निर्दोष निकाल लावू शकलो नसलो, ( तसा तो कोणीही लावू शकत नाही.) तरी त्याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न केला हे निश्चित सांगू शकतो. या स्पर्धेत आठ ते नऊ देखणे सादरीकरण असलेल्या एकांकिका पाहायला मिळाल्या. मात्र  ज्याला टोटल परफॉर्मन्स म्हणता येईल अशा पाच एकांकिका होत्या. त्या पैकी सातारची स्वत:ची आणि ऐनवेळी प्रवेश दिलेली एकांकिका आयोजकांनी मोठेपण दाखवून मागे घेतली आणि परीक्षकांचे काम सोपे केले याचे विशेष कौतुक. दिग्दर्शक संदीप जंगमने क्षणाचाही विचार न करता ते मान्य केले, हे विशेष. तो एक चांगला माणूस आहे, अशी त्याची ओळख करून दिली होती. तो आहेचं!  एकांकिका सादर करणार्‍या प्रत्येक संघाशी परीक्षक मुद्दा म्हणून बोललो. त्यांच्या चांगल्या गोष्टींचे कौतुक केले. काही कमी वाटले असेल तर त्यावर काय होऊ शकते- यावर चर्चा केली. हे रात्री तीन वाजता देखील केले. कोणत्याही संघाला आपले प्रयत्न परीक्षकांपर्यंत पोहोचले याचे समाधान याने मिळेल असे वाटते. अगदी एक-दोन संघ राहिले, ते त्यांच्या वेळेच्या अडचणीने.  यातील उल्लेखनीय एकांकिकेविषयी पुढे लिहू ...

  

सातारहून परत येतानाही राजेश मोरे सर, प्रभुणे सर आणि राजेश कुलकर्णी सर, यांनी सोडले नाहीच. अगदी प्रेमाच्या तासभराच्या गप्पा-भेटीनंतरच आम्हाला जाऊ दिले. परतताना आशीर्वाद ड्राइव्ह करताना मध्येच झोपत होता! मला उद्याच्या पेपरातील मथळा दिसत होता.
निकाल लावून परतणारे बोगस परीक्षक देवाने वाटेतच उचलून रंगभूमीचे भले केले.  
-आभास आनंद

Sunday, January 22, 2017

दक्षिण आधुनिक


         
          मानवी जीवन हेच अ‍ॅब्सर्डीटीने भरलेले आहे, त्याचे नाटक करणे ही त्याहून मोठी अ‍ॅब्सर्डीटी आहे. नाटककार हा एक युनिव्हर्सल ट्रोल असतो. कथाकार किंवा कवी तसा असेलच असे नाही. मी असे म्हणतो, याला एक कारण आहे. कवीकडे असलेली प्रतिमा आणि रुपके आणि कथाकाराकडे असलेला निवेदकाचा मुखवटा, त्यांना ट्रोल बनण्यापासून वाचवू शकतो. नाटककाराला ही संधि नाही.  त्यामुळे नाटककार हा ध्रुवांच्या शोधात असतो. नाट्य संघर्षाचे दोन्ही ध्रुव समजून घेणे, हे त्याच्यासाठी अत्यावश्यक असते. दोन ध्रुवांतील मधला भाग तो कल्पनेने रंगवू शकतो, पण जर ध्रुवांना गुणदोषाच्या काट्यावर घेतले नाही, तर त्याला संघर्ष सापडत नाही. थोडक्यात त्याचा संघर्षाचा शोध हे एक युनिवर्सल ट्रोलिंग होते. राहुल बनसोडे लिखित आणि अनिल कोष्टी दिग्दर्शित, दक्षिण आधुनिक आपल्याला उत्तर आणि त्याला विषम म्हणून दक्षिण आधुनिक या दोन विचारसरणी मधील फरक अधोरेखित करण्याची आशा दाखवत दोन्ही ध्रुवांतील सम धर्म दाखवून देते. अ‍ॅब्सर्डीटीचे दोन्हीकडे मौजुद असणे आपल्याला अराजकता हा सर्व कालचा महिमा आहे हे दाखवते. दोन्ही ध्रुवांतील सुवर्णमध्य चाचपण्याचा प्रयास करणे, हेच या नाटकाचे ध्येय होते. अराजकता ही स्थायी स्थिती होती- आहे आणि राहणार, असा प्रतिवाद करताना दोन्ही शैली मधील विरोध सांभाळत हे नाटक संक्रमण काळावर नेण्याचा नाटककाराचा प्रयास आहे. 
          पोस्ट मॉडर्निजम ही संकल्पना जर रचनेचा कलात्मक नसून टीकात्मक शोध असेल, तर आपल्याला त्यातील संभाव्य लक्षणे  दिसू शकतील, समजू शकतील. नाटका पुरते बोलायचे झाले, तर त्यातील वास्तव, हे स्थिर नसून बदलते आहे, असे गृहीत धरून त्याच्या अनेक आवृत्ती काढता येतील. एक वास्तव व्यक्ति, समूह, धर्म, राष्ट्र आपल्या तत्कालीन गृहीतकातून निर्माण करेल, दुसरा वैज्ञानिक पद्धतीने प्रयोग-निष्कर्ष-प्रयोग यातून वास्तव शोध घेईल, जो अर्थातच स्थिर नसेल. तिसरा संस्कृतीच्या जतनात वास्तव शोध घेईल. त्या पलीकडे वास्तव नाहीच असा काहीसा दावा करेल. पण हे संस्कृती जतन अनेक मिथकांचे बनले असल्याने पुन्हा स्थिर नसेल. चौथे आध्यात्मिक वास्तव असेल, जे निसर्ग आणि आत्मा याच्या रीजोनान्स मधून स्थिर वास्तवाच्या शोधात अखंड असेल. एकूण वास्तव असे कवेत, आकलनात येणार नाहीच आणि शोध सुरूच राहील.
          दक्षिण आधुनिक या नाटकातील मध्यवर्ती कल्पनेला असे अनेक प्रकारे भिडता येईल, आले असते. पण नाटकाच्या रचनेतच तसे भिडता येणार नाही अशी व्यवस्था आहे. दोन ध्रुवीय संघर्षाच्या शोधातून संघर्षाऐवजी सुसंगतीच सापडत जाते. या नाटकाची लॉग लाइन आहे, ‘उत्तर आधुनिक नाटककाराचे अर्धे नाटक परंपरावादी नाटककार पूर्ण करतो. मुळात ही कल्पना अफाट आहे आणि ती मध्ये एका चांगल्या विडंबनाचे बीज दडलेले आहे. अर्थात नाटककाराने सामाजिक विडंबन हा जॉनर न स्वीकारल्याने ते त्या अंगाने जात नाही. त्या ऐवजी नाटककार,  नाटकातील नाटक हा घाट स्वीकारतो. हा तर हमखास फार्सचा विषय. नाटककार या ही अंगाने जात नाही. त्या ऐवजी तो मोंताजेस द्वारे अनेक विषयांना टॅन्जेन्शियली स्पर्श करत राहतो. पहिल्या अंकातील रचनेला ठहराव येऊ नये, असा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो. मोंताजेसना लॉजिकली लिंक करत नाही आणि आपल्याला नाटक जीवनाचे प्रतिबिंब असल्याने ते मिथ्या आहे, असा फील देतो. या सहजपणे मिथ्या होत चाललेल्या प्रयोगाला नेपथ्यकाराने पार्श्वभूमी दिलेली आहे, एका तालीम कम  लग्न हॉलची. जो पार्श्वभूमीवर एका शिळ्या लग्नाची, पोपडे उडलेली, सुकलेली सजावट आणि तुटलेल्या थर्मोकोल मधून दाखवतो. संसार मूल्यहीन आणि निरर्थक आहे.  

 

          नाटकातील नाटककार, हा अनेक वर्षे नाटके लिहून एका कठीण स्थितीला पोहोचलेला आहे. लिहिणे त्याच्यासाठी कठीण काम झालेले आहे. नाटकातील पात्रांना नाव, रंग, रूप दिलं की, त्यांचे कार्य साधत नाही, ही त्याची खात्री आहे. तो त्यांना नंबर देतो. त्यांचे चरित्र उभे करतो आणि खोडतो. त्याच्याच विचारातील दोष त्याला दिसू लागलेत आणि ते दूर व्हावेत या प्रयत्नांत त्याची रचनाच विस्कळीत, ठहराव नसलेली, संदर्भ नसलेली होते आहे. या नाटकातील दिग्दर्शकाला स्पर्धेसाठी नाटक करणे आवश्यक आहे, ती त्याची एकमेव ओळख आहे. हा दिग्दर्शक मात्र काहीही द्या, पण पूर्ण करा- बाकी मी पाहतो- या तयारीचा आहे. केंद्रातील ही दोन्ही पात्रे उत्तम फार्सचे रसायन आहेत. पण ते चर्चा नाट्य करीत आहेत. यातून प्रथम उभी राहते प्रत्येक जन्म पहाणारी एक नर्स. तिला स्मरण दोष आहे. म्हणजे लोकांना विस्मरणाचा असतो तसा. तिला जन्मापासून सारे लख्ख आठवते. इथे जन्म होतो, आत्मा शरीर रूपाने प्रकट होतो म्हणजे आपल्या स्वातंत्र्याचा मृत्यू होतो, हे लक्षात येते. लेखकाचा सफेद उंदीर मिकी हा स्टेजवर आहे कारण त्याला आत्मा आहे. अॅनिमिझमच्या कल्पनेनुसार विश्वाचा आत्मा एक आहे, यामुळे पाच हा तृतीयपंथी त्याचे कुणीच ऐकत नसल्याने मिकीला म्हणजे स्वतःलाच आत्म-दु:ख सांगतो. हट के लिहिण्याच्या नादात आपण हे जे लिहिले, त्याचे पुढे काय करायचे, हे लेखकाला माहीत नाही. तो हे पात्रच कट करू म्हणतो. आणखी काही लिहून तो ब्लॉक होतो. त्याला इन्स्पिरेशन मिळत नाही. पण नाटक ही दिग्दर्शकाची गरज आहे. नाटक नसले तर त्याला शहरात कुत्री ही ओळखणार नाही. कुत्री देखील ओळखतात ती तालमींतून उशिरा रात्री घरी जातो म्हणून.  

       एकाच वेळी या नाटकाची संहिता, अर्थकारण, समाजकारण, प्रेम, नाट्य वेड, ह्युमनीज्म, वैयर्थ, विषमता, स्त्री मुक्ति, नव निर्मिती, सामाजिक ध्रुवीकरण अशी फिरत राहते. कदाचित आजच्या भोगवादी समाजाची प्रतिनिधी बनते. या संहितेतील ठळक विसंगतीत एक अंतर्गत सुसंगती आहे. मात्र ती प्रयोगात पकडता आली पाहिजे. जी पकडण्याचा प्रयत्न दुसर्‍या अंकात बर्‍यापैकी होतो. याचे कारण पहिल्या अंकाच्या शेवटी पुढचा प्रसंग येण्याऐवजी नाटककार मेल्याची पोस्ट येते. हे मध्यंतराच्या पताका बिंदुचे विडंबन आहे. तुम्हाला क्लायमॅक्स लागतो ना! हा घ्या अॅंटी क्लायमॅक्स! तो ही होतो फेसबुकच्या पोस्टने.
          दुसर्‍या अंकाची सुरुवातच नाटकाच्या, ‘संक्रांतीचा सूर्य या नावाच्या घोषणेने होते.  एक परंपरावादी नाटककार हमखास यशस्वी प्रयोगाचे ठोकताळे घेऊन येतो. त्याच्या मते मानवी जीवनाचे संपूर्ण सार आपल्या पुराणात आहे. त्यातून फक्त उचलायचे आणि आजच्या परिप्रेक्ष्यात मांडायचे. इथे सहजच आधुनिक स्त्रियांच्या लिखाणात वारंवार आणि हमखास दिसणारी राधा-कृष्ण किंवा कृष्ण- मीरा ही रुपके आठवली. स्त्री-पुरुष संबंधात स्वत:चे मत आजच्या संगतीत मांडण्याचे धाडस न करता, जसे काही ते ऐतिहासिक महाकाव्यात किंवा पोथी-पुराणात आधीच लिहून ठेवले आहे, अशा अविर्भावात त्या आणि त्याच रुपकात मांडले जाते. आधुनिकता अशी परंपरेला धरून येते. पुनरुज्जीवनवादाचे आणि  जगण्याचा अर्थ परंपरेत शोधणार्‍या देशीवादाचे देखील ते विडंबन आहे. पण नाटककार अशी कोणतीही भूमिका घेत नाही. किंबहुना भूमिका न घेणे, हाच त्याचा स्टान्स आहे. दुसर्‍या अंकात नाटक परिचित असा ठहराव घेते. तरीही आधीच्या संहितेतील पात्रे आणि नव्या संहितेत त्यांना दिलेले लॉजिक अशा घोळात नाटक आपल्याच शैलीत पुढे जात राहते. कधी अपेक्षित परिणाम साधते. कधी अचानक वेगळा विषय आणून त्यावर विचार करायला लावते. थोडक्यात प्रेक्षकाला स्थिर होऊ न देता बरासा ठहराव आणू पाहते. इथे दक्षिण आधुनिक काळातील जीव जन्माची कथा आहे- जी वास्तविक जीवन-मृत्यू खेळ आहे. संभोगाचे एक फलित तृतीयपंथी असू शकते असा सूचक इशाराही आहे.
        युद्धास तयार झालेला एक राजा आहे, जो प्रजेला युद्धानेच प्रगती होईल अशी आशा दाखवतो आहे. राज वधू मोहिनी, हे वैभवाचे प्रतीक आहे. तिच्या सौंदर्यात त्रैमासिक भर पडत राहते जोवर राजा वज्र वापरत नाही. हा देशाचा त्रैमासिक जीडीपी आहे, जो वाढता राहणे यावर राजाचे अस्तित्व आहे. मात्र युद्धखोर  राजाला वज्रही वापरायचे आहे आणि मोहिनीचे सौंदर्य ही चिरंतन वाढते हवे आहे. राजा संक्रांत ओढवून घेतो आहे. त्याचे गुरुदेव त्याला पाहिजे तशी वैभवाची आकडेमोड करून देतात आणि राजा युद्धसज्ज होतो. आता कलाकारांना हे नाटक युद्ध समर्थनाकडे चालले आहे याची कल्पना येते. ते काम करण्यास नकार देतात. लेखकाला बोलवून आणा, नाहीतर हे नाटक करू नका असे सांगतात. युद्धखोरीचे समर्थन होते म्हणून कलाकार बिथरलेत. त्यांना बरं वाटावं म्हणून  लेखकाला बोलावले जाते, इथे नाटक कोणतेही विधान न करता संपते, जो त्याचा सुरुवातीपासूनचा रोख आहे.   

        अशा संहितेचा रिलेवांस सहसा बाह्य प्रतिकांत शोधावा लागतो. इथे तालीम हॉलमध्ये एका पक्षाचा  झेंडा लावलेला आहे. तो काढायची नाटयकर्मींची इच्छा आहे पण हिम्मत नाही. हा झेंडा कधी आडवा येतो, कधी मान टाकतो. त्याला प्रयत्नपूर्वक उभा ठेवणे हे एक मूक विधान आहे. सायक्लोरामाच्या प्रसंगी थेट प्रेक्षकांच्या डोळ्यांत स्पॉट टाकून  याचे तुम्ही केवळ साक्षी नाही तर हे तुमचेच नाटक सुरू आहे हे सांगणे. याची पेरणी म्हणू एक पात्र प्रेक्षकांतून आधीच उभे करणे अशा सुंदर जागा दिग्दर्शकाने काढल्यात. त्या एकाच वेळी परिणाम साधतात आणि स्पर्धेतील सायक्लोरामा तंत्रादीच्या अट्टाहासाला चिमटा घेतात. अशा गोष्टी नाटकात  येत राहतात. काही जागा आहेत, जसे गर्भाशयातील अर्भकाचे स्वगत उभ्याने बोलले जाते. पात्रावर बदलते रंग-प्रकाश सोडून स्थिर आशयाचे स्वगत येते, यावर विचार होऊ शकेल. परंपरावादी, पुनरुज्जीवनवादी काय किंवा आधुनिक, उत्तर आधुनिक काय- सर्वच आपल्या विचारांचे कालातीत सत्यात रूपांतर करत त्यात गोठून जातात. हा एक मानवी पॅटर्न आहे. डावा-उजवा, आधुनिक-परंपरावादी कोणीही त्याला अपवाद नाहीत. या अवस्थेतून बाहेर येऊन आपल्या धारणांनाच प्रश्न विचारायला हवेत. तसे प्रश्न विचारण्याची ऊर्मी कलाकारांना पर्यायाने प्रेक्षकांना देत नाटक संपते.
          स्पर्धेचे नाटक उभारण्याच्या प्रक्रियेला घेतलेले चिमटे यामध्ये सतत येत राहतात. स्पर्धा करणारी मंडळी ही ठार वेडी असतात, हे स्पष्ट आहे. हा वेडेपणा कलाकारांनी पांघरला नाही तर मुरवलेला आहे. लेखकद्वयी, दिग्दर्शक हे या वेडेपणाचे अर्क नमुने आहेत. लेखकाच्या भूमिकेत दिग्दर्शक अनिल कोष्टी उत्तर आधुनिक भरकटणे सहज आणतात. स्पर्धेचा दिग्दर्शक श्रीकांत कुलकर्णी तो वेडेपणा, कशाही प्रसंगाला तोंड देण्याचा चिवटपणा आणि तरी या सार्‍यात एक हरवलेला भाव कायम चेहर्‍यावर घेऊन वावरतात. अभिनेत्या कलाकारांत ही वेडेपणाची सीमा कमी आहे कारण त्यांना काही भूमिकादेखील करायच्या आहेत. आणि या भूमिका ते मनापासून करतात. विशेष उल्लेख प्रवीणच्या भूमिकेतील सुशील पाटील यांचे चांगले व्यक्तिमत्व आणि सहजता उल्लेखनीय. सरिता झालेली प्रियंका साळी चांगल्या तयारीची अभिनेत्री आहे. यांना साथ देताना जीवन (कुंदन तावडे), अवंति ( जयश्री भारंबे) आणि मेघना (स्वरदा गाडगीळ) आपापल्या भूमिका चोख करतात. या नाटकात सर्वच कलाकारांना क्षणात स्वीच होत तालिमीतील नाटकातल्या भूमिकेत समरसून शिरायचे आहे. ही चांगल्या तयारीची टीम ते सहज साधते आणि या रचनेतील कठीण नाटकाला सांभाळत किनार्‍याला लावते. मात्र अखेरचे नाट्य-विधान हे ठसठशीतपणे समोर येत नाही. तसे ते न येणे- हे एक प्रकारे अपरिहार्य देखील आहे. स्पर्धेच्या अथक प्रयासातून शेवटी हाती काहीच लागत नाही, असे ते विधान असू शकेल.

          नाटकाचा दक्षिण आधुनिक भाग संक्रमणाच्या शोधात आहे. स्त्री- पुरुष वादातील समन्वय म्हणून तृतीयपंथी हा संक्रमण रेषेवर आहे, या अर्थाने संक्रांत हे रूपक येते. युद्ध आणि समृद्धी वाढ एकाच वेळी होईल अशा वरदानाच्या शोधात राजादेखील संक्रमण बिंदूच्या शोधात आहे. दक्षिण आधुनिक स्त्री वादी प्रत्येक चरा चरात लिंग शोधते. लिंगाचा शोध हा स्त्री वादाचा अखंड सायास आहे. राजाही युद्ध आणि समृद्धी याच्या मधली स्थिती शोधायच्या प्रयत्नात आहे, जिथे संक्रांत उभी आहे. तिथून पुढे दिशा बदल अभिप्रेत आहे. उत्तर आणि दक्षिण आधुनिक हे नाटक असे समन्वयाच्या शोधातून संक्रमण करू पहाते आहे.

          नव्या नाटककाराच्या सुरुवातीच्या संहिता शब्द प्रधान असतात. तशी ही देखील आहे. पण प्रयोगशीलता हा राज्य नाट्य स्पर्धेला अपेक्षित असलेला नियम ती पाळते. तिच्या कल्पनेत महा नाट्याच्या शक्यता आहेत. मात्र नाटकाच्या मूलभूत रचनेची मोडतोड करण्याच्या नादात तिचा शोध घेतलेला नाही. अशी मोडतोड जेव्हा रचनेचे भान असलेला लेखक करतो, तेव्हा ती सुसंगत होऊ शकते. सत्य नसतेच तर त्याची कालानुरूप  स्थितीस्थापक रुपे असतात हे परंपरेपासून उत्तर आधुनिकतेपर्यंत सर्वांनाच मान्य आहे. आधीच्या प्रयोगांची मर्मस्थाने फेटाळून लावत, कधी त्यांना चिमटे काढत केलेला हा प्रयोग, त्याचे उद्दिष्ट पाहता, अजून बराच पुढे जायला हवा.

-आभास आनंद.


उत्कर्ष कलाविष्कार, भुसावळ निर्मित,
दक्षिण आधुनिक

लेखक- राहुल बनसोडे
दिग्दर्शक – अनिल कोष्टी

नेपथ्य- धर्मराज देवकर
प्रकाश- प्रथमेश जोशी
संगीत- नयन पवार
रंगभूषा- संजय चव्हाण

कलाकार

बच्चू – पुष्कराज शेळके
वॉचमन – शुभम जोशी
नवा लेखक- देवेश कुलकर्णी
विध्याधर- दीपक नाईक
नवीन   : अक्षय नेहे
लेखक – अनिल कोष्टी
दिग्दर्शक – श्रीकांत कुलकर्णी
प्रवीण – सुशील पाटील
जीवन – कुंदन तावडे
सरिता – प्रियंका साळी
मेघना- स्वरदा गाडगीळ
अवंति- जयश्री भारंबे
विनीता – पद्मिनी पाटील