Wednesday, March 1, 2017

करता नीट, की घालू जाकिट !?


माझे आणि सातार्‍याचे तसे बालपणापासूनचे नाते आहे. मात्र मी सातारला पहिल्यांदा परवाच गेलो.  आता ही काय भानगड आहे? कुणाची नक्कल करत नाही कल्ला नको. 
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, सातारा शाखेतर्फे आयोजित, राज्यस्तरीय समर्थ एकांकिका स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून, परिषदेचे कार्यवाह राजेशजी मोरे यांनी विचारणा केली आणि सोबत कोण आहे? हे विचारल्यावर आशीर्वाद मराठे हे मित्रच आहेत असे समजल्यावर त्वरित होकार दिला. कारण माझे आणि सातार्‍याचे बालपणापासून नाते आहेच.

आम्हा बोरिवलीकर चोगले हायस्कूलाईटसच्या जडण-घडणीत सातारा फार महत्वाचे आहेच. कारण आमचे लाडके पवार मास्तर. शिस्त, खेळ, अभ्यास, धाक आणि प्रेम सारे एकाच वेळी या सरांनी दिले. मुख्य म्हणजे त्यांचा सातारी लेझिम, जो मुंबईतील अनेक शाळांमध्ये नंतर खेळला जाऊ लागला. निवृत्त झाल्यावर सर भायखळा सोडून सातारला राहायला गेले. दोन-चारदा फोनवर बोलणे झाले. ते सातार्‍याला बोलावत होते, तो योग आला नाही. त्या आधीच ते गेले. म्हणूनच राजेशजींचा फोन आल्यावर मी लगेच होकार दिला.

          आशीर्वाद आणि मी जुजबी बोलणे केले की परीक्षक त्रुटी नेमक्या कशा होत असतील? बायस असतो तो कसा काढावा? गुणांकन पद्धती कटाक्षाने का पाळली जात नाही? कमीत कमी त्रुटी असलेला निकाल लावू शकू काय? मग आम्ही गुणांकन कसे करायचे, याची वर्गवारी केली. यात  पन्नास टक्के  संहिता, आशय, विषय आणि सादरि‍करणाचे वेगळे गुण असावेत असा विचार केला. उरलेले पन्नास टक्के अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश, पार्श्वसंगीत असे विभागायचे ठरवले. परीक्षक पक्षपातीपणा टाळायचा तर मा‍झ्या ओळखीचा स्पर्धक आल्यास त्या सादरि‍करणावर आशीर्वादने त्याचे विश्लेषण द्यायचे आणि त्याचा आल्यास माझी टिपणे नीट विचारात घ्यायची असे ठरले. असे करण्यासाठी मूळ एक प्रांजळपणा हवा की, अमुक एक स्पर्धक आपल्या स्नेहात आहे. सहसा स्पर्धेच्या निकालात ८०-९० टक्के सहमती असतेच, कारण नाट्याचे मूलभूत नियम आणि निकष वेगळे असत नाहीत. तरीही दरवेळी स्पर्धेसाठी परिक्षण करताना नव्या अडचणी येतात आणि नव्याने विचार करावा लागतो. या स्पर्धेत  अभिनय, तंत्र यांचा वापर टाळणारी एकांकिका गुणांकात कशी बसवायची ही एक समस्या आली. आणि घटना प्रधान नाटक, मेलोड्रामा, तंत्रातील सफाई हे एकांकिकेच्या यशाचे कारण राहू नये म्हणून आशय-विषय-सादरीकरण यांचे वेगळे गुण ठेवले. तरीही न-नाट्य, अॅब्सर्ड, अॅबस्ट्रॅक्ट, पोस्ट मॉडर्न किंवा देशीवादी या सोबतच एखादे फार्सीकल, वास्तववादी अथवा लोकनाट्य  असे विविध जॉनर्स कुणावरही अन्याय होऊ न देता कसे जोखायचे, याचे उत्तर सापडलेले नाही. मुळात परीक्षकाला या सर्व जॉनर्सबद्धल आस्था असायला हवी म्हणजे उपदेशामृत, संदेश वगैरे व्यर्थ अपेक्षा राहणार नाहीत किंवा प्रायोगिक, मातीतले  करतोय म्हणजे काहीतरी थोर, असे दडपण राहणार नाही, असाही विचार आला.

राजर्षि शाहू नाट्यगृहात दुपारी तीनला पोहोचलो तेव्हा आम्हाला पाहून आयोजक मंडळी शंकित दिसली. असे पिकनिकला निघाल्यासारखे, हसणारे- खिदळणारे आणि सतत भंकस सुरू असलेले हे लोक परीक्षक आहेत की गोव्याला पिकनिकला निघलेले चुकून इथे आलेत? असा संशय आयोजकांच्या मनात आला असेल. या वेळी यांना बोलावून ही चूक केली, पुन्हा नीट पडताळणी करूनच परीक्षक नेमावा, असे काहीसे त्यांच्या चर्चेत झाले असावे हे त्यांच्या माना आणि नजरा पाहून लक्षात येत होते. त्यांच्या माइम वरून आम्ही त्यांचे संभाषण वर्क केले. ते साधारण असे:
“मुख्य म्हणजे या लोकांनी जाकिट घातलेले नाही. मग हे परीक्षक कसे?”
एकमेव बुजुर्ग, प्रभुणे मास्तर म्हणाले असावेत.   
राजेश, परीक्षक नेमताना किमान त्यांची मॅच्युरीटी तपासायला हवी होतीस.” कुलकर्णी सर.
“ अहो, हे फोनवर बोलताना चांगले गंभीर वाटले हो! म्हणून नेमले! आता मला काय माहीत हे असे निघतील!” राजेशजी यांची कुरकुर.
“बरं नाही घातलं जाकिट तर हरकत नाही, पण निदान गंभीरपणा नको? स्पर्धक हसतील, हे असे परीक्षक पाहून.” एक कार्यकर्ता सातार गडी.
“हे शिकाऊ परीक्षक असावेत. यांच्या हाती स्पर्धा म्हणजे सब राम भरोसे!” प्रभुणे मास्तर.
“शिकाऊ असू देत, विकाऊ नसले म्हणजे झाले.” कुलकर्णी सरांचे लॉजिक.

राजेशजी जरा गंभीरच झाले होते. कारण प्रश्न त्यांच्या निवडीचा होता. त्यांनी एक गृहस्थ आमच्यावर पाळत ठेवायला सोडून दिला. या गृहस्थांचे नाव आम्ही ठेवले, “ए ! आपण चहा घ्यायचा?” उर्फ माटे. हे गृहस्थ आमच्यावर स्पाईंग करत असावेत असा आमचा संशय आहे, कारण रात्री दोन वाजता देखील ते,
“ए ! आपण चहा घ्यायचा?” तितक्याच सहजतेने उच्चारत. उस पट्टयातला हा सातारी चहा कमालीचा गोड असे. यावरून आम्हाला चार दिवस पोसून निकाल के दिन, कत्तल की रात करतील का ? अशी भीतीही वाटली. एकंदर आम्ही आयोजकांना आणि ते आमच्या कुवतीला घाबरले होते असे वाटते. घाबरले नव्हते, ते फक्त स्पर्धक. बर्म्युडा घालून गोव्याला निघलेला परीक्षक आपली एकांकिका बर्म्युडा त्रिकोणात  बुडवणार नाही, अशी खात्री कदाचित त्यांना वाटली असेल. परिषदेचे चिटणीस सर आम्हाला म्हणाले, काही काळजी करू नका. निर्धास्त निकाल द्या. आयोजक कोणतीही सूचना, विनंती वगैरे करणार नाहीत याची मी हमी देतो. ते आयोजकांची हमी देत होते. आमच्या हमीचे काय? परीक्षक हा तसा रोजगार हमी योजनेवर निघलेला रंगकर्मीच! त्याची हमी कोण देणार?  ती आमची आम्हाला सिद्ध करावी लागणार होती.

“घाबरू नको! मी दोन जाकिट्स घेऊन आलोय!” आशीर्वाद कानात कुजबुजला.
अरे, माझा वेगळा प्रॉब्लेम आहे. मी जाकिट घातले की कल्हईवाला वाटतो. मागे शाळेच्या गॅदरिंगमध्ये मी कल्हईवाला बनलो होतो, तो जाकिट कृपेनेच.”
“तुझी शाळा मला एकदा तपासायला पाहिजे. हे असलं प्रॉडक्ट काढले ते शिक्षक धन्य!”
“ते पवार मास्तर. सातारचेच होते.”
इथल्या मातीने माती खाल्ली असे काहीतरी आशीर्वाद कुजबुजला. भास असेल.
“ अच्छा! मग यांचा डाऊट फार वाढला, तर आपण सरळ जाकिट घालू आणि सेफ होऊ!” मी
“ बर्म्युडावर जाकिट!” आशीर्वाद इतक्या मोठयाने किंचाळला की माटे आमच्याकडे धावले.
“ए ! आपण चहा घ्यायचा?”
नाही म्हणण्याचा सातार्‍यात प्रश्न नसतो आणि पद्धतही नसते.

“हे बघ आशीर्वाद, स्पर्धक जर आपली अगदीच किंमत करत नाहीत, असे वाटले, तर आपण जाकिटस् चढवू आणि प्रस्थापित परीक्षक होऊ. कसे वाटते?”
“मला वेगळीच भीती आहे. आपण असे आहोत हे पाहून स्पर्धकांनी सादरि‍करणाची लेव्हल आपल्याशी बरोबरी, म्हणून खाली आणली  तर?”  
“घाबरू नको! तसे वाटले की तू दम दे, करता नीट, की घालू जाकिट!?’ की झालं!”
“जाकिटस रेमंडची आहेत. ती तुझ्या नसलेल्या स्टेटसला लेव्हलवर आणतील.” आशीर्वादने भरोसा दिला. मा‍झ्या नजरेसमोर रेमंड मधील कल्हईवाला अशी दृश्ये तरळली.

 राजेशजींनी सेफ साईड म्हणून आता आम्हाला दोन तरुण किंवा लहान म्हणू आयोजकांच्या ताब्यात दिले. एक त्यांचा मुलगा, आदित्य मोरे. दुसरी जिला मी छोटी ताई म्हणत होतो ती, मेघना होशिंग. मेघना कमालीची अभिनेत्री आहे हे मला नंतर, त्यांची एकांकिका सादर झाली, तेव्हा कळले. ही दोन्ही मुले कर्तव्य दक्ष होती. प्रत्येक काम वेळेत, न चुकता आणि  अगत्याने, ते ही चार दिवस, सतत!
  सातार्‍यातील मुलांनी सादर केलेले सुंदर बालनाट्य- अजब-गजब.

तिथून पुढे चार दिवस फक्त नाटक जगलो. दुपारी दोन ते पहिल्या दिवशी रात्री तीन, मग चार आणि शेवटी चक्क पहाटे सहापर्यंत हा नाट्य सोहळा सुरू होता. यातच राजेशजींनी निकालाआधी घरी नेऊन जेवू घातले. मस्त शाकाहारी बेत, काम चांगले केले या अर्थी असावा. आणि जर निकालात काही भंकसबाजी केलीत तर... म्हणू भिंतीवर ब्रिटीश कालीन बंदुका होत्या! राजेशजी जावळीच्या मोर्‍यांचे वंशज. त्यांच्या धर्मपत्नी डॉक्टर आहेत राजेशजींसारख्याच आग्रही. चार दिवस या सर्वांनी आमची घरच्यासारखी बडदास्त ठेवली. स्नेह संबंध असे जमले की परत आल्यावर दोन दिवस चुकल्यासारखे वाटत होते.    

 स्पर्धेत एकंदर चाळीस एकांकिका सादर झाल्या. सर्व चांगल्या होत्या. मला एक रजनीकांत अॅक्ट फार आवडला. त्याचा लेखक, दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता रजनीकांतच होता.
“याला बक्षीस दिल्याखेरीज मी राहणार नाही!” असे मी म्हणत होतो. यावर आशीर्वादने,
“स्पर्धेला, मोठ्या ठिकाणी जाऊन असं करू नये. अगदी तुला रजनी थलाईवा वाटत असला तरी.” वगैरे समजावलं. माझा हीरमोड झाला. रजनी करतो तीच फक्त खरी अॅक्टिंग बाकी सारे पुरू राजकुमार, असे माझे स्पष्ट मत आहे. प्रत्यक्षात कुठल्याही स्पर्धेत पुरुष अभिनयाचे पारितोषिक निश्चित करताना ज्याम वांदे होतात. मिमिक्रीपेक्षा स्टाईलाइज्ड अॅक्टिंग कधीही उजवी. रजनी ग्रेट आहे. माझा हा रजनी ज्वर उतरावा म्हणून आशीर्वादने सरळ जाकिट घालणे सुरू केले. काय करेल, त्याचीही मजबूरी होती. हा बर्म्युडातील व्हिमजिकल माणूस खरेच रजनीचे नाटक पहिले आणेल अशी भीती त्याला वाटली असेल. त्याने जाकिट घातल्यामुळे त्याचा एकदम दबदबा निर्माण झाला. स्पर्धक, आयोजक वगैरे त्याचीच विचारपूस करू लागले. मी असिस्टंटसारखा फक्त त्याच्या सोबत (बर्म्युडात) होतो.


अंतिम निकाल लावताना वैयक्तिक, तंत्रादी गुणांकन प्रथम तपासून पारितोषिक निश्चित करावे आणि नंतर उलट्या क्रमाने तिसरे, दुसरे आणि पहिले नाटक निवडावे, असे ठरवले होते, त्याप्रमाणे केले. यामुळे अभिनयादी आणि तांत्रिक पारितोषके सर्वाधिक मिळवणार्‍या संघाचे स्थान निश्चित होऊन ते हलणार नाही. मात्र आशय-विषय- सादरीकरण यांचा विचार करून शेवटी विजेता ठरवला जावा, म्हणजे निकाल सर्व बाजूंचा विचार होऊन लागेल, असे ठरवले आणि केले. यामुळे चाळीस पैकी एकूण अठरा संघांना वैयक्तिक गुणवत्तेनुसार सन्मानित केले गेले. आम्ही जरी निर्दोष निकाल लावू शकलो नसलो, ( तसा तो कोणीही लावू शकत नाही.) तरी त्याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न केला हे निश्चित सांगू शकतो. या स्पर्धेत आठ ते नऊ देखणे सादरीकरण असलेल्या एकांकिका पाहायला मिळाल्या. मात्र  ज्याला टोटल परफॉर्मन्स म्हणता येईल अशा पाच एकांकिका होत्या. त्या पैकी सातारची स्वत:ची आणि ऐनवेळी प्रवेश दिलेली एकांकिका आयोजकांनी मोठेपण दाखवून मागे घेतली आणि परीक्षकांचे काम सोपे केले याचे विशेष कौतुक. दिग्दर्शक संदीप जंगमने क्षणाचाही विचार न करता ते मान्य केले, हे विशेष. तो एक चांगला माणूस आहे, अशी त्याची ओळख करून दिली होती. तो आहेचं!  एकांकिका सादर करणार्‍या प्रत्येक संघाशी परीक्षक मुद्दा म्हणून बोललो. त्यांच्या चांगल्या गोष्टींचे कौतुक केले. काही कमी वाटले असेल तर त्यावर काय होऊ शकते- यावर चर्चा केली. हे रात्री तीन वाजता देखील केले. कोणत्याही संघाला आपले प्रयत्न परीक्षकांपर्यंत पोहोचले याचे समाधान याने मिळेल असे वाटते. अगदी एक-दोन संघ राहिले, ते त्यांच्या वेळेच्या अडचणीने.  यातील उल्लेखनीय एकांकिकेविषयी पुढे लिहू ...

  

सातारहून परत येतानाही राजेश मोरे सर, प्रभुणे सर आणि राजेश कुलकर्णी सर, यांनी सोडले नाहीच. अगदी प्रेमाच्या तासभराच्या गप्पा-भेटीनंतरच आम्हाला जाऊ दिले. परतताना आशीर्वाद ड्राइव्ह करताना मध्येच झोपत होता! मला उद्याच्या पेपरातील मथळा दिसत होता.
निकाल लावून परतणारे बोगस परीक्षक देवाने वाटेतच उचलून रंगभूमीचे भले केले.  
-आभास आनंद

No comments:

Post a Comment