एक एकल दीर्घांक : निर्मिती: नाटकघर आणि द बॉक्स.
वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट अशी एक कंपनी, अमेरिकेतून जगभरातील लोकांना एंटरटेन करते. तिच्या ऍथलेट्सच्या करारामध्येच अट असते
की, त्यांना दिले गेलेले कॅरेक्टर, त्यांनी बारा महिने तेरा काळ, अंगावर वागवले पाहिजे. कल्पना करा एका नटाला त्याची वेशभूषा, चरित्र यातून बाहेरच पडू द्यायचे नाही! काय होईल? ही भूमिका त्या नटाला कायमची चिकटेल किंवा
तो नटच ती भूमिका होईल.
डब्ल्यू डब्ल्यू ई च्या बहुतेक सुपरस्टार्सचे
हे झालेले दिसेल.
स्वत:च्या भूमिकेविषयी एक आपुलकी, जिव्हाळा, नर्सिसीजम, अहंकार एक नट कायम जगतोय! त्यातून बाहेर यायची त्याला परवानगी नाही. जो त्यातून बाहेर येऊ पाहील, त्याचा मृत्यू अटळ. करार भंग, चरित्राचा मृत्यू म्हणजे, त्या ॲथलिटचा मृत्यूच. मनोरंजनाच्या दुनियेतील एक मोठी शोकांतिका
म्हणून याकडे पाहता येईल.
२००८ सालचा, डॅरेन ॲरोनफ्स्की दिग्दर्शित, मिकी रोअर्क अभिनित हॉलीवुड पट, द रेसलर, याचे सुंदर उदाहरण आहे.
सांगायचा मुद्दा म्हणजे नट आणि त्याचा
मुखवटा. हे एकमेकांना चिकटण्याचा धोका, त्यांचा 'द मास्क' होण्याचा धोका नटाला असतो, पण नट म्हणजे कोण? आपण सर्व नाही का? आपण आयुष्यभर वेगवेगळ्या भूमिका घेतो किंवा भूमिकाच
जगत नाही का?
प्रत्येक भूमिकेचा जन्म आणि अटळ मृत्यू, आपल्याला त्रास देत नाही का? अशा सर्व शक्यता वेधणारे एकल नाट्य, महेश एलकुंचवार सर , यांनी कधीचे लिहून ठेवले आहे. ती भूमिका करायला नट मिळत नाही आहे! संहितेत शक्यतांचा कोलाज दिसतोय, पण हे करेल कोण?
'एका नटाचा मृत्यू' चे नाट्यसार एलकुंचवार सरांनी संहितेत
सुंदर रीतीने आणले आहे.
कलाकाराच्या भूमिकेचा जन्म - मृत्यू, प्रेक्षकाच्या भूमिकेसोबत जोडून, आपण घेत असलेली भूमिका आपल्याला चिकटते, उतरवता येते की बदलता येते? आपण प्रत्येक जण कैक भूमिका घेत - सोडत तितकेच मृत्यू भोगतोय का? की आपण अखंड मृत्यू या स्टेट्स मध्येच
आहोत आणि त्यालाच जगणं समजतोय?
अशा शक्यता उभ्या करणारी संहिता अफलातून
म्हणायला हवी. अर्थात तिचे लेखक एलकुंचवार सर आहेत , तरीही एक सॅल्युट!
अतुल पेठे, अशी संहिता दिग्दर्शित करायचे ठरवतात. त्यासाठी योग्य नट शोधतात, एकतर तो मिळत नसतो आणि असेल एखादा, तर उपलब्ध नसतो. ते थांबतात. वर्षभर - दीड वर्ष. संहिता त्याहून जास्त वर्षे थांबलेली. एलकुंचवार सरांची असून! म्हणजे मराठीत संहिता आहेत, करू शकणारे नट दुर्मिळ आहेत? की दिग्दर्शकांना ही संहिता करणे रिस्की
वाटल्याने असे झाले?
कोणतीही संहिता प्रयोग उभा राहण्याच्या
प्रोसेसमधून जाते,
तेव्हा सिद्ध होते, हे खरं असेल तर, लेखकांनी स्वत:च्या संहिता, स्वत:च सिद्ध कराव्यात का? हे उपप्रश्न आहेत.
इथे ॲथलेटिक, लवचिक शरीर असलेल्या आणि ते वापरू शकणार्या
नटाच्या शोधात पेठे होते.
ते आपल्याकडे दुर्मिळ आहेत का? शरीर, हे नटाचे प्रमुख आयुध आहे, असे म्हणताना, ते सुसज्ज ठेवणे ही नटाची जबाबदारी नाही
का? असेही उपप्रश्न.
भूमिकेसाठी अभय महाजन मिळाल्यानंतर उघडावी
लागणार होती, एक जिम, मेहनत खूप होती आणि ती सलग करायची होती. एकल नाट्यप्रयोग, हे सोपे काम नाहीच आहे. नट - दिग्दर्शक, दोघांसाठीही तो कठीण प्रयास आहे. हा प्रयास करून झाला. एकलनाट्य सिद्ध झाले. ते बघण्याचा योग आला.
एकलनाट्य हा प्रयोग एका नटाने सादर करायचा
असला तरी, त्या मागे एक टोटल थिएटर उभे रहायला लागते. संहिता, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि नट ही टीम मिळून, तेही उत्तम
झाले. नाट्यविधान?? एडवर्ड आल्बी म्हणतो की, नाट्यविधान हे माझे काम नाही, प्रेक्षकांचे आहे. अनेकदा, अनेक विषयांमध्ये हे खरं आहे. या नाटकासाठी आहेच. त्यामुळे या पुढचे मम प्रेक्षकाचे. उत्तम कलाकृती ती, जी एकाचवेळी अनेकांसाठी स्वसंदर्भित होईल. आणि तरीही आस्वाद/ आकलनात कुणालाही अडचण येणार नाही.
शीर्षक तुमची नाटक पाहण्याची नजर तयार
करणारे,
एका नटाचा मृत्यू. मग तो जन्म - मृत्यू , भूमिकेचा की नश्वर देहाचा? नट म्हणजे कोण? भूमिका म्हणजे काय? आपापले उत्तर ठरवून हे नाट्य अनुभवता येईल. थोडक्यात आपापल्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने
किंवा वेगवेगळ्या.
ते वेगवेगळे आकलन असू शकेल आणि प्रत्येक
वेळी, एक वेगळे नाट्यविधान हाती लागू शकेल.
माझ्यासाठी हा जन्म - मृत्यूचा प्रवास एका वेगळ्या अवकाशात नेणारा
ठरला. मृत्यू पश्चात आणि जन्म पूर्व अवस्थेत. बार्डो स्टेट. अस्तित्वाचे नष्ट होणे. दोन अवस्थांमधले अधांतर. तुर्यावस्था. आणि त्या दृष्टीने नाटक पाहताना कोणतीही
अडचण आली नाही. एक दोन संवाद वगळता. अस्तित्व माणसासाठी एक इगो. तो वाढत जाऊन नर्सिसिजमकडे नेणारा. बहुतेक सारेच तसे. मग हे अस्तित्व नष्ट होताना? ते सहज मान्य होईल? पचेल? की इगो ते मान्यच करणार नाही. एका आवर्तनात भरकटत राहील?
दिग्दर्शक अतुल पेठे, या एकल नाट्यासाठी, रिक्त अवकाश वापरतात. समर्पक. बाकी काही नाही. प्रावरणही नाही. फक्त देह आणि रिक्त अवकाश. मग दृश्यात्मकतेसाठी ते इन्स्टॉलेशन्स वापरतात. पण अवकाश तर रिक्त आहे. मग मानवी देहाचीच इन्स्टॉलेशन्स. इथे नटाच्या शरीराचे महत्व अधोरेखित होते.
अभय महाजन हा प्रशिक्षित नर्तक, मार्शल आर्टिस्ट अभिनेता, इथे भूमिकेत चपखल येऊन बसतो. पण दीड तास नाटकही सादर करायचेय. नट चतुरस्त्र असणे आवश्यक आहे. अभय ते साधतो. एक अत्यंत कठीण भूमिका. नाटककाराचा आशय आणि दिग्दर्शकाचे त्यावरील दृश्य भाषांतर, आपल्यापर्यंत नटाच्याच माध्यमातून तर पोहोचते. त्यावर प्रदीप वैद्य यांची प्रकाश योजना आणि कुशल महंत / श्याम भुतकर यांचे नेपथ्य आणि अमर देगावकर यांचे ध्वनी आरेखन, नाट्य परिपूर्ण करते.
एकलनाट्य हे देखील उत्तम कोलॅबरेटिव टीमवर्क
असायला हवे, हे स्पष्ट करते.
- आभास आनंद.



फारच अर्थपूर्ण. नाटकाच्या गाभ्याला स्पर्श केला आहे. मनापासून धन्यवाद.
ReplyDelete