“सुस्वागतम् , रंगशारदेला वंदन करून आणि बाल रंगभूमीसाठी तन, मन आणि धन अर्पण करून, वर्षानुवर्षे बाल प्रेक्षकांचे रंजन करणार्या समस्त दुर्लक्षित रंगकर्मींना विनम्र अभिवादन करून, ‘शलाका थिएटर्स, मुंबई सहर्ष सादर करीत आहे, ‘पॉकिमॉन्सच्या जंगलात’...”
बाल रंगभूमीच्या मर्यादा अनेक आहेत त्यांचा काल, दिवाळी आणि उन्हाळी सुटया, फार फार तर एक किंवा दीड महिन्यांचे त्यांचे अस्तित्व. सकाळचे प्रयोग हौशी संस्था त्यामुळे होणारी तारखांची मारामार (चांगल्या तारखा मिळतात कशा? विचारायचे नाही, कारण मॅच फिक्सिंगपेक्षा हे प्रकरण ओवळे आहे.) तरी ही एप्रिल उजाडला की बाजारात आंबा आणि नाटयगृहां जवळ शिबिरं दरवळतातच.
नाटयगृहाच्या आडोशाला एक शिबिर. त्यात प्रवेशासाठी अर्ज करणारे पालक रविवारी रांगेत आपल्या पाल्यासह उभे. हजार दीड हजार म्हणजे फार नाहीत हो. मुलांना ऍक्टिविटी पाहिजेच की. जगात आजकाल कॉम्पिटिशन किती आहे? मुलं स्मार्ट नकोत? प्रवेश देणारे तरुण स्वयंसेवक हवेत तरंगत फिरताहेत. मुलं बिचारी मम्मी किंवा डॅडीच्या हट्टापायी आलेली, भांबावून रांगेत उभी. पालक दोघे ही नोकरदार, मुलाला द्यायला आपल्यापाशी वेळच नाही, ही अपराधी भावना वागवत रांगेत उभे. बहुतेकांची इच्छा आपल्या लाडका/की ला एकदा तरी (शिवाजी, गडकरी, साहित्य च्या रंगमंचावर उभे राहिलेले डोळे भरून पहावे. अरे, त्या फळ्यांना काय सोनं चिकटलंय, पोराला तिथे उभं करायला? पण कल्चर रे बाबा! आम्हाला नाही मिळालं ना? म्हणून यांना, बरं! म्हणून सुटी घेऊन, गावी किंवा आउटिंगला न जाता या बालयोद्ध्याना शिबिरात भरती केलं जातं.
शिबिर संचालक अनुभवी. अनेक वर्षे हेच काम केल्याने कॉन्फिडण्ट (पक्षी उध्दट) झालेले. त्यांचेही नाव आहे हेतू रंगभूमीची सेवा... क़ोण तो,(आणि खाणार मेवा) म्हणून खुसखुसतोय? पैसे घेतल्यावर जबाबदारी ही आलीच मुलांना प्रशिक्षित करणे आणि रंगमंच देणे इथे खर्च आलाच. घोळ आहे तो इथेच. इथेच सुरू होते बाल रंगभूमीचे अर्थशास्त्र.
शिबिरार्थींना प्रशिक्षण वगैरे देऊन झाल्यावर रंगमंचावर ‘उभे’ करणे अत्यावश्यक. त्या साठी नाटकं लिहा रे कुणीतरी. शिबिर संचालक तज्ञ. धडाधडा नाटके लिहितात, भडाभडा रंगमंचावर ओततात. दर पंधरा दिवसांनी संस्थेची नाटकं बदलतायत. एका-एकाची, आठ-दहा नाटके सुरू. शिबिरार्थी बदलतात तसा नाटकांचा प्रेक्षक बदलतो क़ारण तोच तर टारगेटेड ऑडिअन्स. ओघानेच आले शिबिरासाठी मुलांनी आणि पालकांनी खस्ता आणि त्यांच्या नातेवाईकांनी तिकिटे काढणे. सकाळच्या प्रयोगासाठी पालकांसह सात आठच्या सुमारास हा ‘बालयोध्दा’,(याचे स्त्री लिंग काय?) जेवणाचा डबा,पाणी घेऊन घर सोडतो. प्रचंड गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये, बसमध्ये गनिमी काव्याने,जीव मुठीत धरून हा बालयोध्दा रंगभूमीच्या सेवेसाठी प्रवास करतो. चार पाच तास वातानुकुलित नाटयगृहात काढून, मे महिन्यातल्या भर दुपारी दीड दोन वाजता, लाल बुंद आणि घामाघूम होऊन कसे बसे, मिळेल तिथे डबा वगैरे खाऊन, घरी साधारण चार-पाच वाजता पोहोचतो. या सर्व व्यापात सोबतचा पालक या उद्याच्या सचिन नाहीतर उर्मिलावर, स्वत:ला झालेल्या त्रासा बद्धल डाफरतो, “तुझ्यासाठी ! तुझ्यासाठी हे करावं लागतं!”
“आमच्या वेळी कोणी एवढं करत नव्हतं. तरी ही यांची तोंडं वाकडीच”
सचिन-उर्मिला वगैरे सुरूवातीला ओशाळवाणे. मग त्यांनी पुढल्या प्रयोगाला जायलाच नकार देणे. त्यावर,
“आम्ही तुझ्यासाठी एवढं करतोय तर...” , ची उजळणी.
(खरं तर त्यांनी नाटकात काम करावं हा पालकांचाच आग्रह.)
पण पुढल्या प्रयोगाला पुन्हा याच अग्निदिव्यातून जायला सारे तयार. तरी ही कोणत्याही प्रयोगानंतर पाच- पंधरा आया-ताया,
“आमच्या, ‘बंटी’ किंवा ‘पिंकी’ ला नाटकाची कित्ती- कित्ती आवड आहे, सांगते तुम्हाला; त्याला /तिला एकदा संधी द्या, मग बघा.”
अशी आर्जवं संचालकांकडे करतंच असतात. अनेकांना संधी मिळवून देत-देत संचालक संधी साधतात. सुटी सुरू होताच प्रयोगाचे दिवस. जाहिराती इतक्या, की कोण म्हणेल बाल रंगभूमीची सद्यस्थिति दयनीय आहे? तात्पर्य, बाल रंगभूमीची चळवळ जोमाने सुरू आहे आणि मराठी रंगभूमीची उद्याची पहाट हेच रंगकर्मीं सोनेरी करणार आहेत. आपण कशाला चिंता करायची? मुळात कुणी करायची? अखिल भारतीय संस्थांनी? की सरकारी सुसंस्कृत विभागाने? की व्यावसायिक निर्मात्यांनी ? अशी इथे-तिथे बोटं का दाखवायची? बाल रंगभूमी ,मे महिन्या पुरती तरी बाळसेदार आहे.
आमचं बालपण सुंदर बालनाटयं पाहत सरलं. पुल, तेंडुलकर, मतकरी, मोठ्यामोठ्यांनी इथे नाटके लिहिली, ‘दुर्गा झाली गौरी’तर युनिक. त्या आधी ‘अलबत्या-गलबत्या’, ‘निम्मा शिम्मा राक्षस’, ‘अचाट गावची अफाट मावशी’, ‘वयम् मोठम् खोटम्’ किती नावं घ्यायची? आजच्या दिग्गजांनी तेव्हा ती साकारली. रत्नाकर मतकरी, सुधा करमरकर, विनोद- लीला हडप, वर्षांनुवर्ष बालनाटय करत होते. तेव्हा टीव्ही नव्हता, मिडिआ फोफावला नव्हता,सीरिअल कॅन्सर मेंदूभर पसरला नव्हता. सासवा- सुनासुद्धा घरोघर पोहोचल्या नव्हत्या. कलाकारांपाशी वेळचवेळ असावा. मग करायचे झालं बालनाटय. आजकाल टीव्ही सोकावला, सीरीअल्स माजल्या, परदेशातून टून्सची प्रचंड आयात झाली. आमचे बालनाटय तिथेच! नव्हे तिथून नाहिसेच झालेले. प्रयत्न करणारे रंगकर्मी उपेक्षित. (मेनस्ट्रीमच्या दृष्टीने जणू क्लास फोर.) त्यांना ना अवॉर्डस्, ना सरकारी अनुदाने, ना प्रेक्षक. तरी काही जण पंचवीस-तीस वर्षे बालनाटये करताहेत. हॅटस् ऑफ टू देम! त्यांच्या खीसा जर रिकामा झाला, त्यांनी काय करावं? चळवळ तर सुरू रहायला पाहिजे. मग पुन्हा तेच अर्थशास्त्र.
बाल रंगभूमीच्या समस्या अनेक आहेत. मात्र त्यांच्या वाटयाला मी स्वत: कधी जाईन असं वाटलं नव्हतं. हाती असलेल्या लेखन कामाठीतून (लेखकाला कामाठी असा पूरक शब्द समजावा.) बालनाटय करण्याची इच्छा अन्यथा मला का व्हावी? माझ्या मित्राने, प्रदीप साळुंकेने हे नाटक लिहिले आणि करायचे ठरवले. आधीच्याच वर्षी राजा सिंह आले होते. त्याचाही हिशेब चुकलेला. तरी ही, ‘बाल प्रेक्षकांना एक चांगले नाटक देऊया.’, या इच्छेने हा प्रवास सुरू झाला. बालनाटय करायचं तर मुलांना फसवायचं नाही, त्यांना एक व्यावसायिक दर्जाचे नाटक देऊ, संपूर्ण नाटयानुभव देऊ असा विचार केला) पहिल्याच झटक्याला शिवाजीमंदीरसमोर एकाने-
“हे कसले डोहाळे लागलेत बालनाटयाचे?” हा प्रश्र्न केला.
“तुला काय कामं नायत इन्डस्ट्रीत, तर बालनाटय करतोयस?”
यावर बालनाटय हा माझा जगायचा धंदा नाही हे पटवायला मला त्याला डीपीत न्यायला लागलं असतं.
“राजा सिंह माहित्येय काय? एवढं सॉलिड नाटक , पण विनय धुपला. तुला कोण उभं करणार?”
आमचा हिशेब सुरू,
“प्रदीप बघ, कितीला धुपायची तयारी आहे?”
“मुलांना एक चांगलं नाटक मिळणार असेल, तर मी धुपायला तयार आहे.”
प्रदीप तसा सर्किट डोक्याचा माणूस. त्याला आधी धुपायला तयार केला. नंतर विचार सुरू केला. रिस्क मॅनेज करता येईल का? कोणत्या ही नाटकाचा लेखक जसा मरेस्तोवर री-राइटस् करतो, तितकी री-राइटस् प्रदीपने निर्माता असून केली. नाटकात पाच गाणी, त्यांना पाच वेगळी ट्रीटस् द्यायचं ठरवलं. केवळ व्यावसायिक दर्जाचे रेकॉर्डिंग नको होते. मला त्या गाण्यांचा दर्जा मुलं चॅनल वर ऐकतात त्या संगीतांपर्यंत न्यायचा होता. प्रदीपच्या मदतीला धावून आले सुदेश पाटिल, बाळा मुणगेकर, प्रदीप चिपकर पारंपारिक, फोक, वेस्टर्न, फ्युजन, या लोकांनी काही बाकी ठेवलं नाही. ‘अपर्णा अपराजित’ ने दोन सुंदर गाण्यांचं सोन केलं। ‘प्रीति तोरणे’ या टीमची तेंडुलकर. गाते सुंदर, स्टेजवर वावरते भन्नाट. टायमिंगचा सेन्स तर एवढा परफेक्ट की एक हाती नाटक खांद्यावर वाहून नेईल. खरंच तिने खूप पुढे जावं.
रीहर्सल दादर- माटुंग्याला, म्हणजे मुलं तिथलीच हवीत. पण पॉकिमॉन्सच सापडेनात.
बालनाटयाच्या मिस्मॅनेजमेण्टचा अनुभव असलेले सगळेच येनकेन प्रकारे नकार देत होते. त्यात आमचे शिबिर ही नाही. मुलं शिबिरातली नाहीत म्हणजे त्यांचा खर्च आपण करायचा. इथे नाटकाच्या गाण्यांचे रेकॉर्डिंग, डबिंग, रिमिक्सिंग बजेट ,मराठी आल्बमच्या बजेट एवढे झालेले. मग तालिमीतली कोरिओग्राफी. मला स्टिरीओ टाइप कोरिओग्राफर नको होता. मग आला कुणाल. शिक्षणाने प्रॉडक्शन इंजिनिअर, पण ऍनिमेशन व्यवसाय म्हणून स्वीकारणारा हा मुलगा अप्रतिम कोरिओग्राफर आहे. पाच गाण्यांसाठी डान्स कोरिओग्राफी त्याने एका दिवसात केली! त्याची पावती त्याला सर्व समिक्षकांनी दिलीच आहे. हाच कुणाल बाप व्हिज्युअलायझर आहे. पॉकिमॉन्सची ती भन्नाट ऍड त्याचीच.
इथे नाटक सेट झाले तरी पॉकिमॉन्सचा पत्ताच नाही. मुलांच्या परिक्षा, त्यातून खरे पॉकिमॉन्स चौदा एप्रिलला हाती लागले. वीस तारखेला नाटकाचा शुभारंभ. टीव्हीवरले पॉकिमॉन्स अचाट करामती दाखवणारे. हाडामांसाचे पॉकिमॉन्स रंगमंचावर कसल्या करामती दाखवणार? ते हवेत उडाले तरीही टीव्हीच्या तुलनेत मुलांना त्या करामती पोरकटच वाटणार. मग ठरवलं, पॉकिमॉन्स रंगमंचावर मूर्खपणाचे चमत्कार करणार नाहीत. नाटकाचा फोकस पॉकिमॉन्सवर ठेवूनच त्यातले नाटय दुसर्या बिंदूंकडे वळवायचे.
तालमीतच दादर माटुंगा कल्चरल सेन्टरच्या रानडेंनी आणि सुरेश खरेंनी दाद दिली,
“हे कसं शक्य केलंत?” हा त्यांचा सवाल.
पहिलाच प्रयोग ‘ठाणे गडकरी’ ला अहो आशचर्यम्! बाहेर बाल प्रेक्षकांची ही... रांग.
आमचे पाहुणे पास शिवाय उभे. शेवटी विंगेत खुर्च्या टाकल्या. नाटक रंगत गेले. मुलांना प्रचंड आवडत होते. आपल्याला समाधान, जे ठरवलं ते केलं. सर्वांनी बालनाटय सीरीअसली घेतलं होतं. सर्वांनी म्हणजे नाटक करणार्यांनी, मदत करणार्यांनी आणि बालप्रेक्षकांनी. आता मिडिआ-पब्लिसिटी. मागोवा घ्यायला सुरूवात केली. शोध लागला, बालनाट्याची समिक्षाच होत नाही. काही यायला फोनवर तयार शेवट पर्यंत आलेच नाहीत. सकाळी अकराचा शो, पत्रकारांसाठी त्रासाचा. कसं जमणार यायला? पत्रकार येईपर्यंत मे महिना संपत आलेला. नाटक बंद करायची वेळ आल्यावर समिक्षा. एक चांगला प्रयोग होतोय हे लोकांना कळायच्या आतंच नाटक बंद करायची वेळ आलेली. अपवाद जयंत, संजय डहाळे सारख्या हितचिंतक, पत्रकार मित्रांनी दाखवलेली आस्था. पण दोस्तीत थँक्स द्यायचे नसतात. प्रेस शो ला आले रत्नाकर पिळणकर. दहा जणांपैकी एकटेच. काही समिक्षक मित्रांनी बालनाटय पहायलाच सरळ तोंडावर नकार दिला.
पण नाटक धरले. मुलांचा प्रचंड जोश त्यात दुसर्या अंकात राक्षस आणि मुलांच्या ‘क्वीझ कॉन्टेस्ट’ मध्ये मुलं अक्षरश: नाटकात सामिल व्हायला लागली. नाटकाचा शेवट तर इन्टर ऍक्टिव्ह. पॉकिमॉन्स बाल प्रेक्षकात सामिल झालेले. मुलांच्या चेहर्यावर आनंद आणि हसू पाहून आपल्याला समाधान. ते थोड्याच वेळात विरले. बालनाटयाच्या जाहिरातीचे बजेट नाटकाच्या खर्चाएवढे. इतर सर्व खर्च जवळजवळ तेवढेच, पण तिकिट दर मात्र माफक. बाल नटांना मानधन-प्रवासखर्च द्यायला नको? त्यात नाटक चालले की पाडणारे आलेच. ही नाटकवालीच (?) मंडळी त्यांनी शक्य ते सर्व प्रयत्न करून पाहिले.
मग ऑडिओ-व्हिडिओ राइटस. गाण्यांचे सोडा, नाटकाचेव्हिडिओ राइटस् घ्यायला कोण तयार नाही. का? तर, ‘राजा सिंह’ च्या सीडीज् जात नाहीत! काय मार्केटिंगचे ज्ञान! ज्याला पॉकिमॉन्स मधली मार्केट कॅप्चर करणारी स्ट्रेंग्थ दिसत नाही ते व्हीसीडीच्या व्यवसायात.
बालनाटय सीरीअसली कोण करेल आणि का करेल? मनस्ताप तेवढाच आणि उत्पन्नाची आशा शून्य. बालनाटयाच्या समस्या आधी कोणी मांडल्याच कुठे आहेत? आणि कोणासमोर मांडायच्या? बालनाटय परिषदेच्या समिती सभासदांना बोलावून पाहिलं, ते स्वत:च्याच नाटकांना अनुदाने आणि प्रयोग मिळवून देणयाच्या विवंचनेत. नाटय परिषद? ते स्वत:च सरकार-दरबारी कटोरा घेऊन उभे. सरकार दरबारी भीक मागण्यात मराठी चित्रपट आणि नाटयसृष्टी मग्न. बाल प्रेक्षकांचा विचार करायचा कोणी? बालनाटय करणारे रंगकर्मी नाहीत का? का ते कोणीतरी भटके आणि विमुक्त आहेत? त्यांना कोण आपलं मानणार? मोठया नाटयसंस्थांना एखादे बालनाटय करण्याची इच्छा का होत नाही? चित्रपटाला आर्थिक पाठबळ देणारे सरकार, बालनाटयाला सहज मदत करू शकेल पण तसा ठराव मांडायला कोणी प्रतिनिधीच नाही.
मग बाल प्रेक्षकांच्या वाटयाला कोणती करमणूक येते? सुरेश खरेंना मी म्हणालो होतो की आपल्याकडे मुलांसाठी जेवढी म्हणून करमणूक आहे ती आयात केलेली. आपले स्वत:चे काहीच नाही. पॉकिमॉन्सही शेवटी आयातच केलेले. आपल्याकडे बालप्रेक्षकाला मार्केट मानलेच जात नाही. त्याच्या बौद्धिक कुवतीचा अंदाजच कुणाला नाही. आज बाल प्रेक्षकांसाठी जे नाटक होते ते करणार्या रंगकर्मींचे वय साधारण चाळीस ते पन्नास. ते कोणते नाटक करतात? त्यांच्या बालपणी त्यांना भावलेले. राक्षस, परी, चेटकिण, जादुगार आणि प्राणी हे त्यांचे अविभाज्य घटक. आजचा पाच वर्षांचा बाल प्रेक्षक आकलनाने तेव्हाच्या पंधरा वर्षाच्या मुला इतका स्मार्ट आहे, हे कुठेतरी समजून घ्यायला हवं. मग आपण त्यांना आपल्या काळात ओढून नेणे कितपत योग्य आहे? आमचं बालपण आणि आजचा बालप्रेक्षक यांच्या अनुभव विश्वात आणि आकलन शक्तिमध्ये प्रचंड फरक झालेला आहे. मोठयांना कदाचित उमगणार नाहीत अशा पंचेसवर बालप्रेक्षक मनमुराद हसतात हे कशाचे लक्षण मानायचं? आजचे रंगकर्मी रंगभूमीच्या भवितव्याची चर्चा तर करतात. बाल रंगभूमी महत्वाची नाही का? मग ती अशी उपेक्षित का?
सकाळी अकराची वेळ, शनिवार, रविवार सोडून. मुलांना न्यायचं कुणी आणि पालकांनी मुलांना नाटक दाखवायचं कधी? सात-आठ वर्षांची मुलं ‘सही रे सही’ पाहतात, त्यांना आवडतं. तीच मुलं बालनाटय पहायला येतात तेव्हा त्यांना आपण काय देतो? त्यांची फसवणूक होत नाही का? अशी फसवणूक करून कुणाचा आणि किती फायदा होतो? विद्यापीठाच्या नाटयशास्त्र विभागात बालनाटय विभागाला काही स्थान आहे का? आणि जर आहे तर तिथून येणारे कोणी ही बालनाटय का करत नाहीत? बालनाटय प्रशिक्षण शिबिराचे महत्व आपल्या जागी आहेच. ते करणार्यांचा उद्देश जोवर मुलांना प्रशिक्षित करणे हा असेल तोवर काही प्रश्न नाही. त्यांचे अर्थशास्त्र ही गरज म्हणूनच बनले आहे, तेही मान्य करू. पण जेव्हा व्यावसायिक रंगभूमीवर मृतप्राय झालेला रंगकर्मी बालनाटयाला पैसे कमवायचे आणि स्वत:च्या अस्तित्वाचे साधन मानतो आणि बाल कलाकार, त्यांचे पालक आणि नातेवाईकांना वेठीला धरून बालप्रेक्षकांची फसवणूक सुरू करतो तेव्हा खरी समस्या सुरू होते. हे बदलायचा प्रयत्न केलां... आपण फेल!
- आभास आनंद
आम्ही मराठी
दिवाळी-2005

Three Men\'s Titanium Wedding Rings | Tinted
ReplyDeleteThe titanium teeth k9 3 Men\'s Titanium Wedding Rings feature a pair titanium plumbing of gold-plated ring titanium mesh trays for a more intimate ceremony. The three-piece titanium sheet metal ring is titanium apple watch band