Tuesday, November 25, 2014

नवनाट्याच्या नावानं SSS


 

“साला, मुंबई आपली ! आणि धंद्याला लावली यांनी ! तुम्ही साले बघत राहिलात ! मराठी बुद्धिजीवी, साले !”,  प्राध्यापक नेसवणकर  राजस्थानी वडापाव खाताना माझ्यावर गुरकावले. इतक्या जोरात, की उंदरासारखी घरी पळत निघलेली पब्लिक पण राड्याच्या आशेने स्लो मोशन झाली. जीपीओ समोरच्या स्टेशनरी गल्लीत संध्याकाळी सातला नेसवणकर माझी शाळा घेत होते. हे बोलताना त्यांनी अख्खा वडापाव , पॉइंटर सारखा माझ्यावर रोखला होता. पब्लिकच्या नजरेतून गुन्हेगार हटावा म्हणून मी पॉइंटरच्या रेषेतून बाजूला होऊन मागे पाहू लागलो. ही माझी नेहमीची ट्रिक आहे. त्यामुळे पब्लिक पण पॉइंटरच्या दिशेने महाराज आणि स्टेशनरीच्या दुकानात मांड टाकून बसलेल्या जिग्नेसभायकडे बघू लागली.  जिग्नेसभाय, पब्लिकच्या गळ्यात उल्हासनगर स्टेशनरीच्या पुड्या बांधण्यात मगन हता. रेंजमध्ये जिग्नेसभाय आल्याने नेसवणकर एक्स्प्लोड झाले.


“तो कच्छी, हा मारवाडी ! साली मेहनत पण तुमच्या राज्यात उपर्‍या नायतर घाट्यानेच करावी ! तुम्ही साले फक्त पाट्या टाका मंडे टू मंडे ! युसलेस लोक !” नेसवणकरांचे तोहा मराठी  बरवा.

 

नेसवणकर दादरच्या एका सांस्कृतिक मिसाल कॉलेजमध्ये मंडे टू मंडे इकोपाटी टाकतात.  हे बोलून पब्लिकचा आणखी टाइमपास करता आला असता, पण मला राजस्थानी वडापाव  आवडतो. बाजूलाच आमचा तिसरा मित्र डॉक्टर , हा वडापावच्या आत आपली हायजिनिक नजर घालून तो फस्त करत होता.

 

नेसवणकरांचा हा जो प्रांतवाद उफाळून आला होता तो अचानक नव्हे. फोर्टात तशा मराठी माणसाच्या सीमा-पताका दाखवण्यासारख्या नव्हत्याच. पण नव-नाट्याभिमानी नेसवणकरांचा नम्रपणा नाहीसा होण्यामागे माझाच कावा होता. एकतर माझे आणि नवनाट्याचे बरें नसताना आणि मी कोहिनूरला गहरीचाल बघायची ऑफर दिली असताना – दोस्तीखात्यात आणि फुकट, नाटक दाखवण्याची स्टेक लावून, यांनी मला फोर-एटमध्ये उतरवले होते. वारीला निघलेले भक्त जसे गावाच्या मंदिरात फेर धरून मग निघतात, तसे छबिलदास गल्लीत भेटून, उकाळा चहा हे नाटक्यांचे अमृत मारून आम्ही चर्चगेटकडे निघालो.

 

“आज व्यावसायिक रंगभूमीवर काही घडतच नाही. जे घडते ते इथेच.”,  पोहोचताच मला डॉक्टरने सुवार्ता दिली.

“हा एक मोठा ठेवा आहे आपला.” नेसवणकर एनसीपीएच्या भव्यतेने दीपले की काय ?

“थिएटर टाटाचे , डायरेक्टर हिन्दी आणि मुंबई मराठी माणसाची ?” आपली चकमक.

“कद्रू , जातीयवादी साला !”

“थिएटरची भाषा फक्त रंगभाषा. तिथे जगाची बोली एक होते.” सर.

“मग गुजराती थिएटर-“

“गुजराती थिएटर !!” सर किंचाळले, पब्लिकला त्यांच्या एलिटनेस विषयी डाउट येऊ नये म्हणून पुढे कुजबुजले.

“ते सोडून बाकीच्यांचे बोलतोय आम्ही.”

दोघांनीही प्रचंड धंदो करणार्‍या थिएटरला आपल्यातून वगळले. ही या दोघांची पुर्वीपासून पद्धत आहे. लोक येतात,  व्यवसाय होतो, तो आपला नाही. भिकेचे डोहाळे ! यांची चळवळ अशाने यथावकाश संपेल असे मला वाटले.

“नाटके काय पृथ्वीलाही होतात !” डॉक्टर

पृथ्वी नावाचे एक भले थोरले ग्लोब थिएटर , त्यावर जीवन नावाचे महानाट्य दिसू लागून मी गलबललो.

“छबिलदास आणि पृथ्वीने चळवळीला आधार दिला. आज पृथ्वीला नाटके होतात आणि चांगली होतात.”

“तिथे आपला एक माणूस , तो पण बालनाट्यात. पण मॅक असतो ना तिथे?” मी व्हेग.

“तुला आपले- परके करायची भारी सवय !”  

छबिलदास आणि शिवाजी या अडीचशे फुटाच्या अंतरात प्रचंड अपने-पराये करणार्‍या दोघांनी मला सुनावले.

“आता बघ , कोण –कोण येऊन पाहतात आपले नाटक.” सरांचा अभिमान.

मी पाहिले तर काही परप्रांतीय, एक सरदारजी सपत्नीक आणि एलिट मराठी असा ई-सेन्स पसरला होता. बोलण्यात मराठी, हिन्दी, हिंग्लिश सारे होते.

“क्वालिटी बिगिन्स फ्रॉम माउथ अँड एण्ड्स देअर.”

माझ्याकडे डायरी नव्हती- नाहीतर असली वाक्ये सुचली की मी ती लिहून काढतो.

 

“आता आपण जे नाटक पाहतोय ते वेगळे आहे. तुला समजत नाही, मग शिव्या देतोस- म्हणून आधी सांगतो.”

डॉक्टरने माझ्यावर ट्रीटमेण्ट सुरू केली.

“समजत नाही अशी नाटके मुळात करावीच का ? मग लोकांना फुकट पास वाटून बोलवावे लागते.”

“नशीब समज तुला बोलावतात !” डॉक्टरने माझी काढली.

“उद्या आठवणी काढतील हे लोक. मी येऊन गेलो होतो म्हणून !” मी.

“सेटवर काही चोरी झाली तर नक्कीच काढतील !”

सरांनी मला कॉग्निझिबल केले.

“मला नाही वाटत, इथे चोरण्यासारखे काही असेल. अगदी संहिता ही नाही.”

“तुझ्या कामाची नाहीच ती !”

“का ?”

“ ऐक, या नाटकाला शेवट नाही.”

“का ? लेखकाला पैसे मिळाले नाहीत, म्हणून त्याने शेवट लिहिलाच नाही का ?”

“तुला थोडीफार अक्कल असेल , हे गृहीत धरून तो तुझ्यावर सोडलाय.”  सरांचा मी बॅकबेंचर. 

“ तुम्ही लोक प्रेक्षकाला फार गृहीत धरता.” मी यांची नेहमीची बाजी यांच्यावरच उलटवली.

“त्याला किमान अक्कल असावी, अशी इथे अपेक्षा आहे.” सर.

“लोक शेवटपर्यंत थांबत नाहीत. म्हणून मी शेवटापासून सुरू करून  सुरवातीला संपेल, असे नाटक योजतोय.”

“डॉक्टर ,  मी शेवट बघून घरी जाणार ! शेवट पाहिला की उरलंच काय ? वडे ?

“नाही ! ही चळवळ तुला कळणार नाही. ब्रेख्त कशाशी खातात माहीत आहे ?”

“मला  ब्रेड कशाशी खातात माहीत आहे. आमलेट शक्यतो.” मेरी पसंद

“ ब्रेख्तियन नाटक दोन समांतर ध्रुवांवर चालते. एक घटना आणि दोन त्या घटनेचे  विश्लेषण.”

“म्हणजे टोस्ट ब्रेड आणि आत आम्लेट, तसे ना ?”

“गळा दाब त्याचा ! दाब !”

सरांना हिंसक करणे मला वारंवार आणि सहज जमते.

“गळा दाबलात, तर ही घटना माझ्या बाबतीत, घडेल ना ? मग तिचं विश्लेषण मी कसा करू शकेन ?”

माझी रास्त शंका.

“इतका सहज मारून उपयोग नाही याला !”

“मग नाटके दाखवून-दाखवून मारा !”

“त्यापेक्षा ऐकवून मारतो....  तर जसे इंप्रेशनिस्ट आर्टमध्ये एकातून एक निघणारी अनेक इंप्रेशन्स, एका प्रतलावर- एकाचवेळी मांडली  जातात तसा.. इथे विश्लेषणांचा कोलाज मांडलेला आहे.”

“त्या ऐवजी नाटककाराला प्रेक्षकां समोर उभे केले तरी कोलाज म्हणजे काय, हे लगेच कळेल !” मी.

“त्याच्यापर्यन्त पोहोचायला तुला आयुष्य घालवावं लागेल.” डॉक्टर

“नो युज ! याच्या डोक्यातच कोलाज भरलेला आहे.” सर हतबल.

“ मी ट्राय करतो... हे बघ, ही विश्लेषणे समजून, त्यातून अर्थांचा जो विरोध हे नाटक मांडते- त्यामुळे आपण तीन काळात हे नाटक पाहू शकतो.”

“ मी आज पाहणार. मला उद्या वेळ नाही.” माझी तक्रार

“पहा आजच, पण काल-आज आणि उद्या समजून घे !”

“काल मी बरा होतो. आजचं काही खरं नाही. उद्या बघत नाही मी बहुतेक !”  

“साल्या , हे लोक आलेत त्यांचा तरी मान राख ! काय बरळतोयस ?”

 

सारे आमच्या सारखे बोलावलेले फुकटे. पण हे फुकटे पोषमदी’ , इंग्लिश फाडत -  यातील एक मला  स्टान्स्लोव्हस्की सारखा दिसला. मी डॉक्टरला तसे विचारले. त्याने ते हिंदीतले विख्यात दिग्दर्शक असल्याचे सांगितले. त्याना एलिट ब्युटीजचा घेराव होता. त्यात नाट्यविषयक जाणिवेपेक्षा देवदर्शनचं जास्त दिसलं. एक समीक्षक होते.

“हे इथे कशाला ?”

“त्यांना नाटकाची नाळ कळते.” डॉक्टरची एनाटोमी. 

“पण आमची नाटकं बघताना त्यांची नाल जाते !” मी

“टीका करायची तर आधी नाटक कळावं लागतं.” सरांचा टोला.

“अच्छा अच्छा !  म्हणून हे विख्यात दिग्दर्शक आपले नाटक स्वत:लाही कळू नये असे ठेवतात. म्हणजे समीक्षकाने टीका केली तर त्याचेचं  अज्ञान प्रकट होईल !”

 या लोकांची युक्ति मला हळूहळू लक्षात आली होती. मध्येच दोघेजण जीन, खादी झब्बा, शबनम असे दिसले.

“ हे आऊट डेटेड आहे ! हे चालणार नाही ! यांना बाहेर काढा !”  मी.

“ते नाट्यविभाग औरंगाबादचे स्नातक आहेत.” सर अ‍ॅकॅडमिक.

“ते मला माहीत नाही- पण अमेरिकेत मिलरचा काळ सरून आल्बीचा सुरू झालाय याचं काही नाही यांना ? त्या प्रमाणे वेश बदलायला नको ?”  मी गनपावडर पेरली.

“पंथ काय वेशावरून ठरतात का रे ?” डॉक्टर स्वत: नेहमी ट्रेण्ड  सेटपमध्येच असतो.

“मला वाटले खादी, निळी जीन्स आणि शबनम हा छबिलदासचा युनिफॉर्म आहे !” मी ही SSS मारली,  

“आणि श्रीकृष्णचे वडे , हे त्यांचे दोन वेळचे अन्न आहे !”

“तुझा खून होणार. तो पण छबिलदासच्या गल्लीत !”   सर एकाचवेळी ज्योतीर्भास्कर आणि रामनराघव. 

“मला मारून सत्य बदलणार नाही. सत्य हे आहे, की छबिलदास चळवळीतून फक्त एकच माणूस भरभराटीला आला.”

“कोण !?” दोघांचा एकाचवेळी आणि अविश्वासाचा सूर.

“ मंजू.”

“कोण मंजू ?”

“ कोण काय ? वडावाला. त्याच्या टपरीचा फूल ग्राऊंड फ्लोर झाला. चळवळ संपली तरी वडे चालूच आहेत.

बंडे शमली झेंडे राहिले.” आज जिभेवर सरस्वती स्केटींग करत होती.

“मुस्काट दाबून कानफट फोडेन !”  सर.  त्यांना वारंवार हिंसक करणे मला बर्‍यापैकी जमते.

इतक्यात लोक आत जाऊ लागले. आम्ही ही निघालो. गालीचात पाय दुखू लागले, आम्हाला लाकडी जीनेच बरें. आत पब्लिक तुरळक. सारे इतरांना अछूत मानणारे. लांब-लांब जाऊन बसले. आम्हाला चर्चा करत पहायचे असल्याने आम्ही ही उलटे, मागे जाऊन बसलो.  

 

“यात जी ही मुलगी काम करतेय ती एके दिवशी फार मोठी बनेल.”

डॉक्टर   रोगाच्या डायग्नोसिस सारखा मोघम बोलतो. फ्लू की कावीळ ताकासतूर लागू देत नाही. मोठी काय बनेल हे गुलदस्त्यात ठेवतो. म्हणजे उद्या  बाई दीडशे पौंडाची झाली तरी मोठी. श्रीमंत नवरा गाठला तरी मोठी. पण इथे त्याचे शब्द खरे ठरले, बाई पुढे मोठी लेखिका झाली....

 

... आधी अंधार, त्यात आवाज फक्त खोकल्याचे. आता कुजबुजत बोलण्याशिवाय पर्याय नव्हता.

“ स्टेज ब्लॅंक ठेवायचं नसतं. प्रकाश, संगीत – काहीतरी इंद्रियांना जाणवेल असे घडले पाहिजे.” मी बेसिक.

“इंद्रियांना !! भिकारचोट !!! ते इंद्रिय वगैरे तुमच्या नाटकात !” सर.

“इथे सगळ्या नियमाना चॅलेंज करतो आम्ही. याला प्रेग्नंट पॉज म्हणतात. तो असा अंगावर येतो. पोकळीत नेतो आपल्याला.” डॉक्टरने नाटक पार ऑपरेशन थिएटरमध्ये नेले.

काही वेळाने एक अंधुक दिवा आला , एक जण-  आंधळा असावा- त्या अंधुक उजेडात चाचपडत आला. त्याने गॉगल लावला होता.

“आंधळ्यांचे नाटक बघायला मला का आणलं ? आधी वाद्यवृंद असायचे, हल्ली नाटकं पण असतात?

“चक्षु आपले असले तरी दृष्यावलोकन आपण उधार घेतले असते. समजून घे.”

“डॉक्टर , मला तुझा रेबॅन उधार देतोस ? माझा जीव आलाय त्यावर. वेळ बघून मारणार होतो मी- पण तू कधी तो साइडला ठेवलाच नाहीस.” मला डॉक्टरचा दीर्घ उसासा ऐकू आला.

“ तू नाटकासाठी प्लॉट चोर, गॉगल कशाला. तू मद्रासी हीरो वाटशील रेबॅन लावून, फारतर.”

“पण त्यांना खूप पैसे मिळतात, सर. त्यांच्या एका दिवसाच्या मानधनात तुमची चळवळ वर्षभर चालेल.”

“ बाहेर गेलो की याला तुडवू !”  (अशी कुजबूज मला ऐकू आली) पण तो भास असावा. माझे मित्र ब्रूटस नसावेत.

“ तू इथे मराठीत कामाचा नाहीस- तू साऊथलाच जा.” नेसवणकर मला तडीपार करू पाहत होते.

“सर, मी खाली मैसूरपर्यंत गेलोय नाटके करत. त्याखाली अजून योग आलेला नाही.”

 

माझी आता नाटकाशी नाळ तुटली. मी नंतर सारा वेळ प्रेक्षकांकडे पाहत होतो. माझा नाद सोडून डॉक्टर आणि सर गहन चर्चेत नाटक पाहत होते. स्टेजवरचे आंधळे आता कागदाची होडी करून जमिनीवर चालवत होते !   

“ हे पाहायला मला थेट बोरिवलीहून यायला लावलं तुम्ही ? बदला घेईन मी याचा !  कोहिनूरला गहरीचाल रीपीट रनला आहे. उद्या तीन तिकीटं काढून तुमची ठासतो की नाही बघा.” माझी ढुस.

“ सहा काढ – तीन आपल्याला – तीन आपली डोकी काढून ठेवायला!”

 

मी आजूबाजूला पाहिले- बहुतेक खुर्च्या रिकाम्या होत्या. प्रेक्षकांच्या संख्येने भागले तर प्रत्येक प्रेक्षक आणि खुर्च्या यांचे गुणोत्तर रावणाशी मॅच होत होते.

“इथे खूप आहेत. पण डोके कुणाचेच ठेवले नाहीये.  याचा अर्थ या लोकांना डोके नाही, असा थेट होतो.” काडी.

“ते विसरले असतील. कोहिनूरला !”

एनसीपीए आणि कोहिनूरचे हे असे कनेक्शन आहे. दोन्हीकडे डोक्याचाच प्रॉब्लेम.

 

अचानक समोर जे काही सुरू होते ते थांबले. असे मध्येच का थांबले, मला कळेना.

“उठ ! संपलं नाटक.”

“असं कसं संपलं ? हा अन्याय आहे ? अर्धंच दाखवलं मला.”

 मी जोरात बोलल्याने सगळे मागे पाहू लागले. त्यामुळे दोघे  ओशाळून मागे-पुढे पाहू लागले.

“चल, भेटून जाऊ. "
आम्ही स्टेजवर. तिथे सारे एलिट , काय ग्रेट अनुभव होता, थाटाने कौतुक करत होते.

“ हे लोक यांची मारताहेत... यामुळे  हे पुन्हा असलेच नाटक करतील.” माझी भीती.

“लक्ष देऊ नको- हा गुडघीरोग आहे.” सर डॉक्टरला.  

 

सारे स्पेसिफिकली नटीकडे तिची तारीफ करायला जमले. तिने नेमकं काय केलं ते तिला आणि मला माहीत नव्हतं, पण लोकांना ती आवडली होती हे नक्की.

“तुझ्या खीशात पेपर कटर आहे का ?”

 मी डॉक्टरला धंद्यातला प्रश्न केला.

“का ? उपटायचेत ?”

“नाही- अंधारात हिला टेकवतो- विचारतो- क्युं रे , अभिनय करेगी ? बोल ! आणि अभि नय करेगी- कब्बी नय करेगी- असे वदवून घेतो तिच्याकडून”

“ तो बघ तुझा मित्र आहे तिथे- भेट त्याला.”

दोघांनी मला कलटी केले. मी नट मित्राकडे- तो अजूनही नाटक न संपल्यागत कंफ्यूज होता. बाजूलाच एक त्याच्याहून कंफ्यूज माणूस उभा होता. हा नाटककार असणार. मी हात मिळवला.

“चांगलं लिहिलंय तुम्ही.”

नेम सही लागला !

“चांगलं !?? मी लिहिलंय हे ?? मी लिहिलंय ??”

“तू जर तुझी कलाकृती डिसओन करत असशील तर हरकत नाही. पण तूच तो !”

त्याने आपले केस भसाभासा विस्कटवले आणि तिथून देवदास बनून,  खांदे पाडून  जाऊ लागला.

“हा प्रकार युरोप, अमेरिकेत सुरू झाला, तेव्हाच त्याच्यावर बॅन का नाही आणला ?” मी.

“तो इथे आणून तुला दाखवायचा होता म्हणून.”

असे म्हणून मित्र आलेल्या साहित्यिक कंपूशी बोलू लागल्याने मी एकटा पडलो. तिथून मी दोघांना खुणा करत होतो- त्यांनी नटीला घेरले होते. नटीच्या सौंदर्याने त्यांना घेरले होते. माझा तिथेच हुतात्मा चौक. दर्शनाने तृप्त होत्साते दोघेही आले, आम्ही पायी व्हीटीला निघालो. सरांना सोडून आम्ही दादरला चेंज करणार होतो. वाटेत सर, ज्ञानाचे, निरीक्षणाचे आणि विश्लेषणाचे मुख्य साधन चक्षू आहेत असे मला वारंवार बजावत होते. मी संध्याकाळच्या फोर्टात ते काम इमाने इतबारे करत होतो. सारे शांत होत होते. आता काय करावे?

“या नाटकामुळे फक्त एनसीपीए चे नाव होतेय. तुम्ही चळवळवाले फक्त पालखीचे भोई ठरताय !”  

राडा !!

“सुमार माणसा, अशा प्रयोगांनी मेंदूला खुराक मिळून बुद्धीची भूक भागते, तुला नाही कळणार !”

“तुझा अजून सांस्कृतिक जन्मच झालेला नाही.”

 

माझा सांस्कृतिक जन्म झालेलाच नाही- या निष्कर्षापर्यंत दोघेही आले.

 

“मला भूक लागलीय... राजस्थानी वडापाव !

 मी पोटार्थी किडा झालो- दोघांना फरफटत गल्लीत नेले ...

 

... वडापाव खाताना सरांच्या पॉइंटरमध्ये महाराज आणि जिग्नेसभाय एकाचवेळी आले....

कच्छीला शिव्या, राजस्थानी वडा आणि तंबीची कटींग मारून आमची मराठी अस्मिता शांत झाली.

 

  • आभास आनंद 

No comments:

Post a Comment